उपक्रमशील, प्रयोगशीलतेचा आदर्श- जातेगाव  

उपक्रमशील, प्रयोगशीलतेचा आदर्श- जातेगाव  

पुणे जिल्ह्यातील जातेगाव (ता. शिरूर) हा परिसर म्हणजे जिल्ह्याच्या पूर्व भागातील पर्जन्यछायेचा प्रदेश. जातेगावची सरासरी जमीनधारणा सुमारे दोन ते पाच एकरांपर्यंत. खरिपात पावसावर आणि रब्बीमध्ये चासकमान धरणाच्या कालव्याद्वारे उपलब्ध पाण्यावर शेती अवलंबून. काळानुसार इथले शेतकरीही  शेतीतील नवे तंत्रज्ञान अभ्यासू लागले. काटेकोर पाण्यात व्यावसायिक पिकांकडे वळू लागले. त्यातूनच काही वर्षांपूर्वी पॉलिहाऊस उभारणीला सुरुवात झाली. एकाचा प्रयोग यशस्वी होतोय, हे पाहून दुसऱ्याला प्रेरणा मिळाली. पाहता पाहता गावात पॉलिहाऊसची संख्या सुमारे ५८ पर्यंत पोचली आहे.

गुलाबासह भाजीपाला 
गावातील तरुण शेतकरी दिगंबर कामठे म्हणाले, की सर्वज्ञ कृषी सेवा मंडळाच्या माध्यमातून शरद उमाप, गाेरक्ष पवार, रेवण फणसे, नितीन इंगवले यांच्या माध्यमातून गावात पॉलिहाऊस उभारणी सुरू झाली. पहिल्या टप्प्यात गुलाबशेती सुरू केली. फुलांचे दर, मागणी पुरवठा यांचा ताळमेळ पुढे बसेना. मग रंगीत ढाेबळी मिरची, काकडी, ब्राेकोली घेणे सुरू झाले. मी तीन वर्षांपूर्वी पॉलिहाऊस उभारले. रंगीत ढाेबळी मिरची, ब्राेकोली घेतली. गुलाब पुणे बाजार समितीत, तर ढाेबळी मिरची, ब्राेकोली शिक्रापूर येथील व्यापाऱ्यांना विकली जाते. विविध पिकांमधून महिन्याला सरासरी ३० ते ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.  

तीन हजार लिटर दूध संकलन
 पाण्याच्या उपलब्धतेमुळे चारा पिके घेतली जातात. संकरित गायीपालनाकडे शेतकऱ्यांचा कल  आहे. सध्या गावात पुणे जिल्हा सहकारी दूध संघासह स्थानिक व एका देशपातळीवरील दूध कंपनीची संकलन केंद्रे आहेत. दरराेज एकूण तीन हजार लिटर दूध संकलन हाेते. सामूहिक गाेठा उभारणीचाही प्रयत्न गावातील काही तरुणांनी केला. मात्र, दुष्काळ आणि साथीच्या राेगांमुळे हा प्रयोग चालवणे शक्य झाले नाही. प्रशांत इंगवले यांना जनावरे आरोग्यसंबंधी प्रशिक्षण देण्यात आल्याने पशुपालकांना रास्त दरात आैषधाेपचार आणि इंगवले यांना राेजगार उपलब्ध झाला. यासाठी दिगंबर कामठे आणि गाैतम फणसे यांचे मार्गदर्शन लाभले.

 जलयुक्त शिवारची कामे 
 उन्हाळ्यात पाण्याची समस्या जाणवे. अनेक वर्षे आेढा, तलाव आणि चासकमान धरणाच्या कालव्यांच्या पाेटचाऱ्या बुजल्या हाेत्या. त्यामध्ये झाडेझुडपे वाढल्याने पाणीधारण क्षमता कमी झाली हाेती. गेल्या वर्षी ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ संस्थेच्या पुढाकाराने गावालगतच्या आेढ्याचे साडेपाच किलाेमीटर खाेली व रुंदीकरण केले. त्यातून ०.२७ टीएमसी पाणीसाठी वाढल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणानुसार समाेर आले. भूगर्भातील व विहिरींची पाणीपातळी वाढली. सरपंच मंगल इंगवले यांच्यासह सुरेश उमाप, प्रभाकर खळदकर, सुभाष माेरे, सुरेश माेरे यांनी या कामांत पुढाकार घेतला. गावाचा कारभार सांभाळून मंगलताई शेतीकामातही व्यस्त असतात. सध्या त्या गवार ताेडणीत गुंतल्या आहेत.  

तलाव आणि रस्तेबांधणी  
पाणीसाठ्यात वाढ झाल्यानंतर रब्बी हंगामात शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले. खाेलीकरण करताना गावालगतचे आणि शिवाररस्ते डांबरी आणि सिमेंटचे झाले. यासाठी माजी उपसरपंच विशाल उमाप, पांडुरंग माेरे, लहू पातेले, दिलीप हाेळकर यांनी पुढाकार घेतला.   

जलशुद्धीकरण प्रकल्प 
‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ संस्थेच्या वतीने जलशुद्धीकरण युनीट देण्यात आले आहे. त्याची व्यवस्था नीलेश उमाप या तरुणाकडे असून, त्याच्या घरपरिसरातच युनिट उभारले आहे. त्याद्वारे ग्रामस्थांना पाच  रुपयांना ४० लिटर पाणी देण्यात येते. भविष्यात सकाळी आणि संध्याकाळी दाेन वेळेस प्रत्येकी ४० लिटर पाणी वितरणासाठी वाहन व्यवस्था उभारण्याचे प्रयत्न आहेत.

साैरऊर्जेद्वारे स्वयंपूर्णतः
गावातील रस्ते, वीज, शाळा, ग्रामपंचायत, मंदिरे, चाैक या ठिकाणी साैरऊर्जेवरील ४५ युनिट्‌स आणि ९० दिवे लावण्यात आले आहेत. साैरऊर्जेचे पॅनेल घरांवर लावले आहे. त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित घरमालकांकडे सोपविली आहे. त्या माेबदल्यात घरटी साैरदिवा लावला आहे. साैरदिवे उभारणी व देखभाल जबाबदारी साहेबराव सातपुते, साहेबराव खळदकर, प्रवीण आणि संताेष पटेकर यांच्याकडे आहे.  

फळझाडांची लागवड
गेल्या वर्षी ‘आर्ट अाॅफ लिव्हिंग’,  ‘बॅंक आॅफ न्यूयाॅर्क’, ग्रामपंचायत आणि लाेकसहभागातून तीन हजार झाडे लावण्यात आली. प्रतिझाड २० रुपये या अल्पदरात २० झाडे घरटी देण्यात आली. यात आंबा (केशर, हापूस), चिकू, नारळ, जांभळ आदींचा समावेश हाेता. काही शाेभिवंत झाडे रस्ते, आेढे, नाले, तलाव, स्मशानभूमीलगत लावली. झाडांसाठी ठिबकची साेय करण्यात आली आहे. यासाठी सुनील वारे, अविनाश उमाप, गणेश कामठे, शुभम हंबीर या युवकांनी परिश्रम घेतले. 

तिघेही बंधू प्रशासकीय सेवेत 
पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप, भारतीय पाेलिस सेवेतील अधिकारी शहाजी उमाप आणि नुकताच विक्रीकर उपायुक्त पदाचा राजीनामा देऊन व्यवसायात लक्ष गुंतवलेले संभाजी उमाप हे तिघे बंधू जातेगावचेच. कांतिलाल यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारपदी कार्यरत असताना रस्ते, ग्रामपंचायत इमारत, सांस्कृतिक भवनासाठी मदत केली. 

आयएसआे २०१५ मानांकन शाळा 
गावात अनावश्यक हाेणारा खर्च कमी करत बचत झालेल्या पैशांचा वापर शाळा सुधारणांवर केला. यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संताेष क्षीरसागर व वाबळेवाडीच्या ‘झीराे एनर्जी’ शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. शाळेची इमारत सुसज्ज, तसेच प्रसाधनगृहे आधुनिक बांधली आहेत. ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ सह शाळा साैरऊर्जेवर नियंत्रित करण्यात आली आहे. शालेय पाेषण आहारासाठी आधुनिक स्वयंपाकघर व्यवस्था उभारली आहे. भविष्यात राज्य शासनाच्या आंतरराष्ट्रीय शाळा प्रकल्पांतर्गत सहभाग नाेंदवून १२ वीपर्यंतचे शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. महाराष्‍ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रमही सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे माजी उपसरपंच देवा उमाप यांनी सांगितले. 

दिगंबर कामठे, ८८८८८३५००१ 
देवा उमाप, ९९२२६२०८८८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com