जिद्दीतून उभा केला गीर दूध व्यवसाय

जिद्दीतून उभा केला गीर दूध व्यवसाय

सातारा जिल्ह्यातील एकसळ (ता. कोरेगाव) येथील सुरेश, तुळशीदास व अशोक या शेलार बंधूंचे संयुक्त कुटुंब आहे. त्यांची २६ एकर जमीन असून बहुतांशी क्षेत्र बागायत आहे. ऊस, आले, हळद, डाळिंब व हंगामनिहाय पिके होतात. 

दुग्धव्यवसायाचे मार्केट जाणले  
सुरेश यांचा मुलगा विनोद यांनी मुंबईत खासगी कंपनीत २००३ ते २०१४ या कालावधीत नोकरी केली. त्यावेळी अतिरिक्त उत्पन्नाची सोय म्हणून ते घरोघरी दूध वितरणाचे काम करायचे. 

त्या वेळी गावी एचएफ व जर्सी अशा सुमारे २० गायींचे संगोपन केले जायचे. त्या वेळी शेतकऱ्याला मिळणारा दर व ग्राहकांचे दर यातील तफावत जाणवायची. देशी दुधाला असलेली वाढती मागणी व बदलती बाजारपेठही विनोद अभ्यासत होते. या व्यवसायात चांगले ‘पोटॅंशियल’ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पवई आयआयटी व हिरानंदानी भागात अधिक पैसे मोजून दूध खरेदी करणारे ग्राहक विनोद यांनी शोधले होते. मग नोकरी सोडून देशी गोपालन व्यवसाय करण्याचा विचार केला. त्यातील जोखीम, नफा, तोटा, गुंतवणूक आदी बाबींचा अभ्यास केला. आपले बंधू सचिन, पांडूरंग, नागेश यांनाही व्यवसायाचे महत्त्व पटवून दिले. वडिलधारी मंडळीना मात्र हा प्रस्ताव मान्य नव्हता. अखेर सर्वांचे एकमत झाल्यानंतर व्यवसायाला दिशा मिळाली. 

आजचा देशी गोपालन व्यवसाय
लहान-मोठी मिळून सुमारे ९० ते ९५ देशी गायी 
१०० बाय ३० फूट आकाराच्या गोठ्यातच होते संगोपन
प्रति गाय दूध उत्पादन- ८ लिटर (दोन्ही वेळचे मिळून)
दररोजचे एकूण संकलन - १५० लिटर
मुंबई पवई आयआयटी व हिरानंदानी गार्डन परिसरात सुमारे २०० ग्राहक
दुधाचा सध्याचा दर- १०० रुपये प्रति लिटर
पॅकिंग- ग्लास बॉटल

अर्थशास्त्र
प्रति दिन सरासरी १५० लिटर दूध उपलब्ध
जुन्या ग्राहकांना प्रतिलिटर ८२ रुपये दर पकडल्यास तीन लाख ६९ हजार रुपये उत्पन्न 
चाऱ्यासाठी ५० हजार, विक्रीसाठी ३० हजार, प्रक्रिया, पॅकिंग २० हजार, मजुरी ३५ हजार, वाहतूक २५ हजार, खुराकासाठी २५ हजार व अन्य असा खर्च पकडल्यास २० ते ३० टक्के नफा 

गुंतवणूक  
 विनोद यांनी नोकरीतून मिळालेला ‘फंड’ व घरूनही अर्थसाह्य घेत गुजरात येथून गीर गायी टप्प्याटप्प्याने खरेदी केल्या. गोठ्यातही अनेक कालवडींची पैदास केल्याने त्यावरील मोठा खर्च वाचवला. दूधप्रक्रिया करण्यासाठी (पाश्चरायझेशन) २५० लिटर क्षमतेचे युनिट खरेदी केले. त्या अनुषंगाने सुमारे २० लाख रुपयांपर्यत खर्च आला. 

शेतीही समृद्ध 
मुबलक शेणखताचा वापर घरच्याच शेतीत. यामुळे ऊस, आले, हळद पिकांच्या उत्पादनात वाढ. रासायनिक खतांचा वापर, खर्च कमी झाला. जमिनीचा पोतही सुधारला. सध्या शेतीची जबाबदारी बंधू सचीन व नागेश पाहतात. 
लागवडीच्या उसाचे उत्पादन एकरी ७० ते ७५ टन तर आल्याचे एकरी ५० गाड्या (प्रति गाडी ५०० किलो) 
विनोद व सहकाऱ्यांचा कोरेगावात ‘स्वराज आॅरगनिक ग्रुप’ आहे. त्याद्वारे दर रविवारी मुंबई व स्थानिक बाजारात थेट ग्राहकांना भाजीपाला विक्री.   

शेणींची निर्यात करणार 
गीर गायीच्या शेणीस परदेशात मागणी असल्याचे कळल्यानंतर विनोद यांनी त्याचे उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. बिस्किटाप्रमाणे त्यांचा आकार आहे. व्यापाऱ्यांशी बोलणे झाले आहे.  धूपकांडी, गोमूत्र अर्क निर्मितीचाही विचार आहे. 

मार्गदर्शन,  मदत
वडिलांसह चुलतेही मार्गदर्शन करतात. पत्नी सौ. कविता, बहीण शुभांगी व जयेंद्र यादव, डॉ. मनोहर केदार, मित्र अभिजित माने यांचीही मदत होते.  

ठळक बाबी      
मुक्तसंचार पद्धतीचा गोठा. यातील तीन युनिटपैकी पहिल्या युनिटमध्ये दुभत्या गायी, दुसऱ्यामध्ये गाभण व तिसऱ्या युनिटमध्ये वासरे.  
गरजेनुसार पाणी पिता यावे यासाठी मध्यभागी पाण्याचा हौद
दर्जेदार चाऱ्यासाठी मूरघास, हत्ती घास, कर्नाटकातून हरभरा, तुरीचा भूसा 
गोठ्यात तसेच पाश्चरायझेशन युनिटमध्ये स्वच्छता 
विनोद चार दिवस गावी व तीन दिवस मुंबई येथे. बंधू पांडुरंग ट्रॅक्टर व्यवसाय सांभाळून गोठा व्यवस्थापन पाहतात. पाच मजुरांची मदत.  
एक व अर्धा लिटरमध्ये बॅाटल भरल्यानंतर दूध सायंकाळी चार वाजता स्वतःच्या वाहनातून सातारा येथे व तेथून दुधाच्या गाडीतून मुंबई येथे पाठवले जाते. 
मुंबईत दूध वितरणासाठी ‘पार्टटाईम जॅाब’ करणाऱ्या तरुणांना संघटित केले. मिळणाऱ्या दरातून त्यांना मोबदला. अशी विक्री व्यवस्था उभारली.  
ग्राहकांना काही सूचना अथवा तक्रार करायची असल्याचा विनोद यांनी आपला मोबाईल क्रमांक उत्पादनावर छापला आहे.
विनोद सांगतात की सेंद्रिय पद्धतीने शेती करीत असल्याने प्लॅस्टिकचा वापर शक्यतो नको अशी माझी धारणा होती. म्हणूनच काचेच्या बॉटल्सचा वापर करण्यात येतो. 

 विनोद शेलार - ८१०८१६४४१६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com