ध्यास, अभ्यासातून फुलवले अंजीर बागेचे नंदनवन

ध्यास, अभ्यासातून फुलवले अंजीर बागेचे नंदनवन

निंबूत (जि. पुणे) येथील दीपक आणि गणेश या जगताप बंधूंनी अत्यंत मन लावून, कष्टपूर्वक, ध्यास व अभ्यासातून दुष्काळी माळरानावर अंजीर बागेचे नंदनवन फुलवले आहे. लागवडीपासून ते मार्केटिंगपर्यंत चोख व्यवस्थापन ठेवत दर्जेदार अंजिरासाठी खात्रीशीर बाजारपेठही उभारली आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी शेतीत एकमेकांना साथ देत कर्तृत्वाच्या जोरावर आर्थिक व सामाजिक प्रगतीही साधली आहे.

पुणे जिल्ह्यातील निंबूत (ता. बारामती) येथील दीपक व गणेश या जगताप बंधूंची एकूण दहा एकर शेती आहे. पैकी चार एकरांत ऊस, सहा एकरांत अंजीर आहे. त्यांच्या आजोबांनी दुष्काळी भागात टेकडीवर जमीन खरेदी केली होती. काटेरी झाडे, मोठमोठे दगड गोटे काढून २००३ मध्ये चार एकरांचे सपाटीकरण केले. त्यात भाजीपाला घेण्यास सुरुवात केली. सन २००९ मध्ये प्रत्येकी एक एकरांत डाळिंब, संत्रा आणि अंजीर यांची लागवड केली. संत्रा पिकाला हवामान मानवले नाही. बाजारपेठही मिळाली नाही. डाळिंबाचे उत्पादन चांगले आले, मात्र तेलकट डाग व मर रोगावर नियंत्रण ठेवता आले नाही. अंजीर मात्र किफायतशीर ठरले. आजगायत जगताप कुटुंबाचे हेच मुख्य पीक ठरले आहे. 

अंजीर बागेची शेती 
लागवड २००९ मध्ये. २०११ मध्ये बहार येण्यास सुरुवात. 
डाळिंब, संत्रा बाग काढून त्या क्षेत्रात अंजीर  
अंजिरातील उत्पन्नातून जमीन विकसित करून त्याच पिकाखालील क्षेत्राचा विस्तार  

लागवड टप्पे व झाडे
पहिली लागवड- २००९- एक एकर- १५ बाय १५ फूट
त्यानंतर २०१४-१५ व २०१७ मध्ये विस्तार 
बाग आता सहा एकरांपर्यंत. एकूण झाडे सुमारे ८५० 
सध्याची लागवड- १८ बाय १८ फूट. झाडाचा विस्तार होत असल्याने हवा खेळती राहावी, यासाठी हे नियोजन.  
दोन प्लाॅटमध्ये २५ फुटांची मोकळी जागा. एखाद्या बागेत रोग आल्यास त्याचा प्रादुर्भाव दुसऱ्या बागेवर सहज होऊ नये, असे नियोजन.  

उत्पादन
एकरी १५ ते १८ टन ( अधिक वयाची झाडे)
खर्च- एकरी दीड ते दोन लाख रु.

माळरानावर आणले पाणी
वीर धरणाच्या कालव्याजवळ जमिनीत असलेल्या विहिरीमधून दोन किलोमीटरवरील डोंगर माळरानावर पाणी आणले. अंजीर बागेजवळच्या बोअरवेलचाही उपयोग होतो. ठिबक सिंचन पद्धती आहे. मात्र, दीपक म्हणतात, की मुरमाड रानाला ठिबकपेक्षा प्रवाही पद्धतीने पाणी देणे अधिक फायदेशीर ठरते. फळे काढणीस सुरुवात झाली की अधिक पाणी द्यावे लागते.

खट्टा, मिठा दोन्ही बहार 
खट्टा आणि मिठा अशा दोन्ही बहारात उत्पादन घेतले जाते. सध्या खट्टा बहाराच्या फळांची विक्री सुरू आहे. छाटणीपूर्वी एक ते दीड महिना पाणी बंद करून बागेला ताण दिला जातो. या बहारात अंजिरांना गोडी कमी असते. चार महिने पावसाळा असल्याने बागेला धोका अधिक असतो. तांबेरा, करपा आणि थ्रीप्स यांच्या प्रादुर्भावाचा धोका असतो. मात्र, या बहरात चांगले दर मिळतात. मिठा बहारातील फळांना गोडी जास्त असते. उत्पादन जास्त येत असले, तरी दर तुलनेने कमी असतात. 

कोल्हापूर, सांगली बाजारपेठ 
सकाळी सात वाजता तोडणी सुरू होते. घरची माणसे आणि चार ते पाच मजुरांच्या साहाय्याने दुपारी एक वाजेपर्यंत ती पूर्ण होते. मोठी, छोटी, उकलेली अशी मालाची प्रतवारी होते. दररोज सायंकाळी ५०० ते ७००, ८०० किलोपर्यंत अंजीरे नीरा (ता. पुरंदर) स्थानकावरून रेल्वेने कोल्हापूर, मिरज, सांगलीला रवाना केली जातात. व्यापाऱ्यांना १४ किलोच्या पाटीमध्ये माल द्यावा लागतो. पाटीसाठी ३५ रुपये खर्च येतो. मात्र, ती व्यापाऱ्यांकडून परत मिळते. दर वर्षी ८०० पाट्या विकत घ्याव्या लागतात. पुणे, मुंबईला दोन किलोचे पॅकिंग पाठवावे लागते. त्यामुळे मजूर जास्त लागतात. त्याचा खर्च वाढतो. लहान, उकललेल्या फळांचे प्रमाण कमी असून, त्यांची रेल्वे स्थानक आणि स्थानिक बाजारात विक्री होते. 

मिळणारे दर
प्रतिकिलो ४० ते ६०, ७० रुपये
यंदा- ७३ रुपये.
आतापर्यंत उच्चांकी दर- ९० रुपये.
बंगल्यापर्यंत प्रवास
आई सुमन, वडील विनायक, चार बहिणी, दोघे भाऊ, असे आठ जणांचे कुटुंब पूर्वी छपराच्या छोट्या घरात राहायचे. आर्थिक विवंचना प्रचंड जाणवायची. कष्टपूर्वक ध्यास, अभ्यासातून यशस्वी केलेल्या अंजीर पिकाने आता आर्थिक सक्षमता दिली आहे. आता हे कुटुंब बंगल्यात राहते. गणेश यांची पत्नी सौ. धनश्री, तर दीपक यांची पत्नी सौ. नीलम यादेखील शेतीत राबतात. सर्वांची एकी हेच यशाचे गमक ठरले आहे. 
 दीपक जगताप, ९७६३४३७४०७

व्यवस्थापनातील मुद्दे 
दर वर्षी मेच्या अखेरीस छाटणी. त्यानंतर दुसऱ्या प्लाॅटचे नियोजन. दोन प्लॉटमध्ये छाटणी करताना १५ ते २१ दिवसांचे अंतर.  
छाटणीमुळे झाडाला चांगले फुटवे येतात. फळांची संख्या वाढते, प्रत्येक पानात फळ येते. झाडांचा विस्तार वाढल्यानंतर उत्पादनात वाढ. 
कॅनोपी व्यवस्थापन चांगले केल्याने झाडावर न चढता, फांदी वाकवून फळे काढता येतात.
छाटणी केल्यानंतर झाडांना होणाऱ्या जखमा भरून काढण्यासाठी बोर्डोची फवारणी 
पानांचा फुटवा आल्यानंतर दर आठ दिवसांनी कीटकनाशक, बुरशीनाशक, संजीवके, सूक्ष्मअन्नद्रव्ये यांची गरजेनुसार मात्रा 
फळ सुरू होण्यापूर्वी जीवामृत आणि स्लरी. पंधरा दिवसांनी एकदा निंबोळी अर्काची फवारणी
छाटणी झाल्यावर प्रत्येक झाडाला ५० ते ६० किलो शेणखत
खोडकीडा लागू नये खोडांना गेरू, चुना, कीटकनाशक यांच्या मिश्रणाचा लेप 
अन्य पिकांपेक्षा अंजीर हळवे. आभाळ आणि पावसामुळे चिलटांचा प्रादुर्भाव वाढतो. फळात पाणी होऊन खराब होण्याचा धोका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com