एकी, नियोजनातून बदलले शेतीचे रूप

एकी, नियोजनातून बदलले शेतीचे रूप

जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्‍यामध्ये वसलेलं म्हसला हे गाव. सुमारे एक हजार लोकवस्तीच्या या गावातील म्हसलेकर बंधू म्हणजे एकी आणि कष्टाला प्राधान्य देत शेतीतून विकास म्हणत जगणाऱ्या कुटुंबाचे मूर्तिमंत उदाहरण. तीन भावडांचे कुटूंब सात मुलांपर्यंत विस्तारलं, तरी एकी कायम. दररोज सायंकाळी भावंडांची भेट ठरलेली. या भेटीमध्ये दुसऱ्या दिवशीच्या शेती कामाचे नियोजन होते. २०१८ च्या एप्रिलमध्ये सातही भावंडं विभक्‍त झाली असली तरी नात्यातला गोडवा, शेती कामातील एकी कायम. याच एकीच्या बळावर उत्तरोत्तर प्रगतीचा मार्ग म्हसलेकर कुटुंबाला गवसला आहे.

एकत्रितपणे जपली शेती 
नारायणराव, सदाशिवराव आणि महादूजी ही तीन भावंडं. या तीन भावंडात वडिलोपार्जीत वीस एकर शेती. या शेतीत कपाशी, बाजरी, मका, तूर या पारंपरिक पिकांची लागवड. या तीन भावंडांची सात मुले. नारायणरावांना ज्ञानेश्वर, निवृत्ती, लक्ष्मण आणि विठ्‌ठल अशी मुले., सदाशिवरावांना रामेश्वर आणि कृष्णा, महादूजी यांचा पांडूरंग हा मुलगा. सातही मुलांचे विवाह झाले असल्याने  म्हसलेकर कुटुंबातील सदस्य संख्या वीस. योग्य शेती नियोजन आणि श्रमाच्या उत्पन्नातून म्हसलेकर कुटुंबाने एकीच्या बळावर पाउलवाट करत २०१० ते २०१८ दरम्यान वडिलोपार्जीत शेतीमध्ये आणखी १५ एकरांची भर घालत ३५ एकरांवर नेली आहे.

पीक बदल ठरला फायदेशीर  
शेतीत वाढ करत असताना काळानुसार पारंपरिक पिकातही म्हसलेकर बंधूंनी बदल केले. २०११ मध्ये दोन एकरावरील भगवा डाळिंबाचे क्षेत्र आजघडीला सात एकरांपर्यंत विस्तारले आहे. २०१५ मध्ये तीन एकरांवर द्राक्ष लागवड करण्यात आली. १९९८ पासून दहा एकरांवर आल्याची लागवड असते. याचबरोबरीने दहा एकरांवर कापूस, चार एकरांवर मका आणि एक एकरावर बाजरी लागवड आहे. योग्य नियोजनातून पीक उत्पादन वाढीवर भर असतो. आल्याची विक्री औरंगाबाद बाजारपेठेत केली जाते.  मक्याची विक्री जालना मार्केटमध्ये केली जाते.

पशुपालनाचा आधार 
म्हसलेकर कुटुंबाकडे २०१२ पासून आठ गायी आहेत. सध्या चार गाई दुभत्या आहेत. दररोज ५० लिटर दूध डेअरीला जाते. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत दुग्धव्यवसाय कुटुंबासाठी अर्थार्जनाचा मोठा आधार आहे. याचबरोबरीने शेतीला पुरेसे शेणखतही उपलब्ध होते.
 ज्ञानेश्वर म्हसलेकर, ७५८८८५०८७७

मजुरांची पडत नाही गरज
म्हसलेकर कुटुंबातील जवळपास २० सदस्य शेतीमध्ये राबतात. सर्वांना पीक व्यवस्थापनाची चांगली माहिती आहे. त्यामुळे एखादं दुसरा अपवाद वगळता कधीही मजुरांची गरज म्हसलेकर कुटूंबाला पडत नाही. जे कुटूंब स्वत: शेतीत राबते, त्याचीच शेती फायद्याची ठरू शकते, यावर सर्व भावंडांचा विश्वास आहे. एकी, काटकसरीपणा, एकविचार असलेली सातही भावंडे शेतीतून कुटुंबाचा चांगला आर्थिक विकास करत आहेत. 

म्हसलेकर बंधुंचे नियोजन
  दररोज सायंकाळी सात भावंडांची वडिलांसह शेती नियोजनाची बैठक.
  प्रत्येकाकडे नियोजनाची जबाबदारी, विभागणीमुळे सर्व कामे वेळच्या वेळी पूर्ण.
  जमीन सुपीकतेवर भर, सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर.
  काटेकोर पाणी वापर, एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रण.
  तीस एकरांमध्ये ठिबकसिंचन. पाणीबचतीसाठी आच्छादनाचा वापर.
  फळबाग, हंगामी पिकांच्या उत्पादनासाठी सुधारित तंत्राचा अवलंब.
  २०१८ मध्ये  दोन विहिरींचे स्वमेहनतीतून खोदकाम व बांधकाम. 
  आल्यामध्ये मका आणि कपाशीत मुगाचे आंतरपीक.
  शेतमालवाहतुकीसाठी दहा वर्षांपासून टेम्पो. इतरांच्याही शेतमालाचीही वाहतूक.
  शेतीकामासाठी तीन ट्रॅक्‍टर. वाहन चालविण्यात घरातील सर्वजण पारंगत.
  अन्नधान्याची गरज शेतीतून पूर्ण करण्यावर भर.
  कुटूंबाला लागणाऱ्या गोष्टींची एकाचवेळी खरेदी.
  २००८ ते २०११ दरम्यान मळणीयंत्राचा उद्योग.
  सर्वांसाठी राहण्याची स्वतंत्र सोय.

शेततळ्यातून संरक्षित पाणी
पस्तीस एकर शेतीच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी सात विहिरी आहेत. याशिवाय ३० मीटर बाय ३० मीटर  बाय ३ मीटर आकाराची सहा शेततळी आहेत. विशेष म्हणजे पहिले शेततळे त्यांनी २०१२-१३ च्या दुष्काळात स्वखर्च आणि स्वमेहनतीने खोदले. त्याला नंतर प्लॅस्टिक आच्छादनासाठी अनुदान मिळाल्याने थोडा हातभार लागला. त्यानंतर दोन शेततळी एमआरईजीएस आणि तीन शेततळी मागेल त्याला शेततळे या योजनेतून पूर्ण करण्यात आली. ही शेततळी पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या भरवश्‍यावर भरून घेतली जातात. संपूर्ण शेती ठिबक सिंचनाखाली आणल्याने कटेकोर पाणी वापरावर त्यांचा भर आहे. म्हसलेकरांनी घेतलेल्या पहिल्या शेततळ्यानंतर गावातील शेतकऱ्यांना शाश्वत पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व पटले आणि प्रत्येक जण शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी शेततळ्याकडे वळला. काही वर्षांत गावामध्ये शंभराहून अधिक शेततळी तयार झाली आहेत. यामुळे जालना जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेततळी घेणाऱ्या गावांमध्ये म्हसल्याची नोंद झाली. डिसेंबर ते जानेवारीपर्यंत विहिरीतील पाणी पीक व्यवस्थापनासाठी उपलब्ध होते. त्यानंतर मात्र शेततळ्यातील पाण्याच्या भरवश्‍यावरच पिकाचे नियोजन केले जाते, असे ज्ञानेश्वर म्हसलेकर सांगतात.

फळबागेने दिली साथ 
२०१५ च्या दुष्काळात अर्धवट भरलेल्या शेततळ्यामुळे डाळिंबाची ६०० झाडं जगली. केवळ जगलीच नाही तर चांगले उत्पादनही  म्हसलेकर बंधुंना मिळाले. सगळीकडे पीक उत्पादनात घट असल्याने डाळिंबाला दरही चांगला मिळाला. डाळिंबाने चांगला आर्थिक नफा दिल्याने कुटुंबाचा हुरूप वाढला. दुष्काळात शेततळ्याचं महत्त्व अधोरेखीत झालं. याचबरोबरीने एकाच फळपिकावर अवलंबून राहणं योग्य नाही म्हणून म्हसलेकर बंधू द्राक्ष लागवडीकडे वळले. २०१५ मध्ये म्हसलेकर बंधुंनी तीन एकरावर द्राक्ष लागवड केली. द्राक्ष लागवडीतून  सरासरी एकरी दहा टनांचे उत्पादन मिळते. व्यापारी बागेत येऊन द्राक्ष खरेदी करतात.  यंदा आगाप द्राक्षाला ५५ रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. डाळिंबाचे एकरी १४ टन उत्पादन मिळते. डाळिंबाची विक्री नाशिक बाजारपेठेत केली जाते. आत्तापर्यंत सरासरी ५५ रुपये ते १२५ रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com