निर्यातक्षम केळी उत्पादनाचा घेतलाय ध्यास

निर्यातक्षम केळी उत्पादनाचा घेतलाय ध्यास

जळगाव जिल्ह्यातील गोरगावले (ता. चोपडा) तालुक्यापासून १० कि.मी. अंतरावरील गाव. येथील तरुण शेतकरी महेश दिलीप महाजन यांच्याकडे वडिलोपार्जित १३ एकर शेती आहे. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आयटीआय करून पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत होते. मात्र, लहान भाऊ आणि वडिलांच्या लागोपाठ झालेल्या मृत्यूमुळे सन २०११ मध्ये त्यांना गावी परत यावे लागले. सुरवातीला गावातील जाणकार शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेत सोयाबीन, तूर, मूग, कापूस, ऊस आणि केळी अशा पारंपरिक पिके घेऊ लागले. आजवरच्या शेती प्रवासामध्ये, आई मंगलाबाई, पत्नी उज्ज्वला यांची खंबीर साथ मिळाली.

 पारंपरिकतेकडून निर्यातक्षम शेतीकडे 
पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करताना प्रामुख्याने ऊस, कापूस, कडधान्य पिके यांची लागवड असे. त्यातून समाधानकारक उत्पादन मिळत असले तरी नवे प्रयोग करण्याचा प्रयत्न महेश यांनी सुरू केला. गावामध्ये निर्यातक्षम केळी उत्पादन करून खासगी कंपनीला देणारे एक दोन शेतकरी होते. त्यांच्याशी चर्चा करत, माहिती घेत निर्यातक्षम केळी उत्पादनाचा निर्णय घेतला. त्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभागातील जाणकार व्यक्तींकडून शास्त्रीय अद्ययावत माहिती मिळवली. अगदी लागवड, रोपांची निवड, खत व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण आणि मार्केटिंग अशा प्रत्येक बाबी हळूहळू शिकून घेतल्या. आत्मसात केल्या. 

   निर्यातक्षम केळी पिकाचे नियोजन 
   लागवड     १.६.२०१७, 
   क्षेत्र    ४ एकर
   रोपे    ५२००  
   लागवडीवेळी रोपाभोवती धैंचा पिकाची पेरणी केली. त्यामुळे हिरवळीचे खताचा फायदा झाला. 
   लागवडीचे अंतर- ६ x ५ फूट, गादीवाफा पद्धतीने. 
   खत व्यवस्थान व कीड रोग नियंत्रण- आवश्‍यकतेप्रमाणे विद्राव्य खते वापरली. 
   घडाची गुणवत्ता सुधारावी यासाठी
   निसवनीच्या वेळी केळ फूल दिसल्यावर आंतरप्रवाही कीडनाशकाचा वापर केला.  
   केळी निसवल्यावर ८ फणी ठेवून केळ फुल मोडले.
   घडावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकडे वेळीच लक्ष दिले. 
   केळी घडाचे उष्णतेपासून संरक्षणासाठी स्कर्टिंग बॅगेचा वापर.
   योग्य प्रकारे तण नियंत्रण.
   प्रतिओळ दोन इनलाइन लॅटरलद्वारे ठिबक सिंचन केले आहे. 
   निर्यातक्षम केळीला मिळाले २०० रुपये अधिक 

१० व्या महिन्यापासून केळी काढणीस सुरवात करून २४ मार्च ते २५ एप्रिल या काळात काढणी पूर्ण केली. योग्य प्रकारे नियोजन केल्यामुळे घडाची गुणवत्ता उत्तम मिळाली. एका खासगी कंपनीने बाजारभावापेक्षा प्रतिक्विंटल २०० रुपये अधिक दर देत निर्यातीसाठी केळीची खरेदी केली. ही केळी पुढे सौदी अरेबियाला पाठवण्यात आली.   

निर्यातक्षम केळी पिकाचा आर्थिक ताळेबंद
केळी लागवड सरासरी खर्च     ८० रु. प्रतिझाड  
लागवड केलेली रोपे     ५२०० 
प्रत्यक्ष काढणी केलेली झाडे     ४९५०
सरासरी प्रतिझाड उत्पादन     २४ किलो 
एकूण उत्पादन ः ४९५० झाडे  x २४ किलो    ११८८ क्विंटल
दर प्रतिक्विंटल     रु. १२००   
एकूण उत्पन्न (रुपये).    १४,२५,६००
एकूण खर्च (रुपये)     ४,१६,०००
एकूण फायदा (रुपये)    १०,३६,६०० 

निर्यातक्षम केळीतून मिळालेल्या उत्तम फायद्यामुळे या वर्षी केळीच्या क्षेत्र ८ एकरने वाढवलेले आहे. 

निर्यातक्षम उत्पादनाची व काटेकोर व्यवस्थापनाची तंत्रे अद्यापही शिकत आहे. त्यामध्ये गावातील जाणकार शेतकरी, पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय तज्ज्ञ, कृषी विभागातील अधिकारी वर्ष यांची मदत होते. नव्या तंत्रांचा शेतीमध्ये वापर करण्याचा आवर्जून प्रयत्न करतो. भविष्यात त्रिची (तमिळनाडू) येथील राष्ट्रीय केळी संशोधन संस्थेमध्ये निर्यातक्षम केळीबाबतचे प्रशिक्षण घेण्याचा मानस आहे. 
- महेश दिलीप महाजन, शेतकरी. 

शेतीचे नियोजन 
   महाजन यांच्याकडील १३ एकर क्षेत्रापैकी ४ एकर क्षेत्रावर पूर्व हंगामी कापूस पिकाची लागवड करतात. त्यांना ४९ क्विंटल उत्पादन मिळाले. त्याला ४६०० प्रतिक्विंटल या दराने २,२७,७०० रुपये उत्पन्न मिळाले. पिकाचा उत्पादन खर्च ७० हजार रुपये वजा करता निव्वळ नफा १,५७,७०० रुपये मिळाले. याच शेतावर ४५०० केळी रोपांची लागवड केली.  
   जानेवारी महिन्यात काढणी करून मे महिन्यात केळी रोपांची लागवड केली जाते. या पिकाची काढणी पुढील महिन्यात सुरू होईल.
   ४ एकर क्षेत्रावर खरीप हंगामात मूग पिकाची लागवड करतात. त्याचे १० क्विंटल उत्पादन मिळाले. त्याचा नाफेडच्या हमीभावाने मुगाची खरेदी झाल्यास चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. याच क्षेत्रावर ६००० केळी रोपे लावली असून, मृग बाग केला आहे.
   मागील रब्बी हंगामात हरभरा पिकातून (क्षेत्र ४ एकर) ४० क्विंटल उत्पादन मिळाले. त्यातून निव्वळ नफा १,६१,२४० रुपये मिळाला.  
   उर्वरित ४ एकर क्षेत्रावर केळी पिकाची नवीन लागवड दि. २४ सप्टेंबर २०१८ रोजी केली आहे. 
   तसेच मुख्य पिकासोबत धैंचा पिकाची लागवड केली जाते. त्याचप्रमाणे चवळी, मूग यांसारखी आंतरपिके घेतात. त्यातून उत्पादनासोबत बेवडही चांगले मिळते. 

असे असते नियोजन
   केवळ शेतीवर कुटुंबीयांचा प्रपंच चालवत असल्याने शेतीचे संपूर्ण नियोजन त्या अनुषंगाने करतो. 
   शेतीमध्ये कायमस्वरूपी कामगार (सालदार) असून, त्याला ८५ हजार रुपये प्रतिवर्ष दिले जातात. 
   सध्या मुलगी जिया ही केवळ ज्यू. केजीमध्ये आहे. मात्र, तिच्या शिक्षणासाठी  वार्षिक ४० हजारापर्यंत खर्च येतो. हा खर्च भविष्यात वाढत जाणार आहे. त्यामुळे त्याचे नियोजन आतापर्यंत करत आहे.  
   शेतीमध्ये सुधारणा करणे, यंत्रे व अवजारे यासाठी प्रतिवर्ष १ ते १.५ लाख रु. काढून ठेवतो. 
 घरातील आजारपण, विमा यासंदर्भात योग्य ती तरतूद करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com