सुपीक जमीन, नियोजनातून  वाढविली द्राक्षाची गोडी

अभिजित डाके
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

हणमंतवडिये (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील राहुल साहेबराव मोरे यांनी जमीन सुपीकता, पाण्याचा काटेकोर वापर आणि बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन द्राक्ष शेती चांगल्या पद्धतीने केली आहे. केवळ द्राक्ष उत्पादनावर मर्यादित न राहता दर्जेदार बेदाणानिर्मितीवरही लक्ष केंद्रित केले आहे.

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका हा सुरवातीपासून द्राक्षासाठी प्रसिद्ध. परंतु मधल्या काळात दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे द्राक्ष बागा कमी होऊ लागल्या. परंतु या भागातील शेतकऱ्यांनी कष्टाने दुष्काळी स्थितीवर मात करत द्राक्ष बाग टिकविल्या आहेत. यापैकीच एक आहेत हणमंतवडिये गावातील प्रयोगशील शेतकरी साहेबराव मोरे. हणमंतवडिये गावशिवारात साहेबराव मोरे यांची २२ एकर शेती आहे. त्यांनी येरळा नदीवरून पाइपलाइन करून शेती बागायती केली. संपूर्ण क्षेत्रात पाच विहिरी आहेत. साहेबराव मोरे यांनी १९८१-८२ च्यादरम्यान एक एकर द्राक्षाची बाग लावली. त्यानंतर पाण्याची टंचाई भासू लागली. पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बागेला पाणी कमी पडून दिले नाही. त्यानंतर गावशिवारात ताकारी योजनेचे पाणी आले. शेतीला शाश्वत पाण्याची सोय केली. टप्प्याटप्प्याने एकर एकर द्राक्षाची बाग आज सोळा एकरांवर पसरली आहे. याचबरोबरीने चार एकरावर ऊस लागवड आणि दोन एकरांवर चारा पिकांची लागवड असते. साहेबराव मोरे यांचा मुलगा राहुल हा आता द्राक्ष शेतीचे व्यवस्थापन करत आहे.

शेती नियोजनाबाबत राहुल मोरे म्हणाले, की, माझ्या वडिलांना पहिल्यापासून शेतीची आवड होते. त्यांना नोकरीची संधी होती. परंतु नोकरी न स्वीकारता त्यांनी जिरायती शेती बागायती करण्यास सुरवात केली. कुटुंबानेही त्यांना चांगली साथ दिली. त्यातून आमच्या शेतीचा चांगला विकास झाला. मोहोळ (जि. सोलापूर) येथील दादासाहेब बोडके यांची शेती आम्ही पाहिली. त्यांच्याकडूनही आम्ही मार्गदर्शन घेतले. टप्प्याटप्प्याने पाण्याच्या उपलब्धेतेनुसार एक एकरावरून आता सोळा एकरावर द्राक्ष शेती वाढवीत नेली आहे. द्राक्ष विक्रीच्या बरोबरीने बेदाणा निर्मितीवरही आम्ही भर दिला. होणाऱ्या नफ्यातून शेत जमीन विकत घेतली, पाण्याची सोयही केली. आता संपूर्ण २२ एकर शेती ठिबक सिंचनाखाली आणली आहे.

मजुरांची साथ महत्त्वाची 
आज सोळा एकर द्राक्ष शेतीच्या विकासामध्ये मोरे यांचे नियोजन आणि त्यांना मजुरांची मिळालेली साथदेखील महत्त्वाची आहे. याबाबत राहुल मोरे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष शेतीमध्ये कुशल मजुरांची समस्या भेडसावत आहे. परंतु आमच्या शेतीवरच आम्ही चार मजूर कुटुंबांची अगदी घरच्यासारखी रहाण्याची सोय केली आहे. एक मजूर कुटुंब आमच्याकडे गेल्या २७ वर्षांपासून आहे, तर बाकीची तीन मजूर कुटुंबे अकरा वर्षांपासून आहेत. मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय आम्ही केली आहे. त्याचबरोबरीने त्यांना गरजेनुसार तसेच मुला-मुलींच्या लग्नालाही पैसेही दिले जातात. मजुरांना आम्ही द्राक्ष शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाची माहिती देतो. वेळप्रसंगी प्रक्षिक्षणाची सोय देखील करतो. त्यामुळे द्राक्ष शेती आणि बेदाणानिर्मितीतील काम अडत नाही. कुशल मजुरांचा द्राक्ष उत्पादन आणि गुणवत्ता वाढीला फायदा झाला आहे.

जमीन सुपीकतेवर दिला भर
वेलीची चांगली वाढ आणि दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी मोरे यांनी जमीन सुपीकतेवर भर दिला आहे. याबाबत राहुल म्हणाले, की गेल्या पाच वर्षांपासून आम्ही रासायनिक खतांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करत नेला. यंदाच्या वर्षी आम्ही रासायनिक खते वापरलेली नाहीत. दरवर्षी खरड छाटणीच्या वेळी बागेत योग्य प्रमाणात शेणखत दिले जाते. काही वेळा आम्ही मेंढ्यादेखील बसवितो. याचबरोबरीने बागेत दर पंधरा दिवसांनी जीवामृत स्लरी प्रत्येक वेलीला देतो. जमिनीत सेंद्रिय घटकांची चांगली उपलब्धता झाल्याने वेल सशक्त झाली आहे. द्राक्ष, बेदाण्यातील गर आणि गोडी वाढली आहे. फक्त आम्ही गरजेपुरती शिफारशीत बुरशीनाशके वापरतो. त्यांची फवारणीदेखील इतरांपेक्षा कमी झाली आहे. पानांच्या तपासणीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करतो. योग्य नियोजनामुळे खर्चात चांगली बचत होत आहे.

तयार केली वेबसाइट 
राहुल मोरे यांनी वेबसाइट तयार केली आहे. याबाबत ते म्हणाले, की गेल्या सहा महिन्यांपूर्वी भंडारा जिल्ह्याचे न्यायाधीश संजय देशमुख आमची शेती पाहण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आमची शेती आणि द्राक्ष, बेदाणा उत्पादनाची माहिती होण्यासाठी वेबसाइट तयार करण्यास सुरवात केली. या वेबसाइटमुळे देश, विदेशात माझ्या उत्पादनाची माहिती ग्राहकांच्यापर्यंत थेट पोचविणे शक्य होणार आहे.

ॲग्रोवनची साथ 
ॲग्रोवन माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. ॲग्रोवनमधील द्राक्ष पीक सल्ला, सेंद्रिय शेती, हवामान अंदाज, विविध पिकांचे व्यवस्थापन आणि नवीन तंत्रज्ञानाबाबत सविस्तर माहिती असते. ही सर्व कात्रणे काढून आम्ही संग्रही ठेवली असल्याने त्याचा वापर योग्य वेळी करतो. आमच्या मजुरांनादेखील ॲग्रोवन वाचायला देतो. त्यामुळे त्यांनाही शेतीमधील माहिती मिळते, असे साहेबराव मोरे सांगतात.

देशी गाईंचा गोठा
द्राक्ष बागेला पुरेशा प्रमाणात शेणखत आणि स्लरी उपलब्ध होण्यासाठी मोरे यांनी पाच वर्षांपुर्वी देशी गाईंचा गोठा केला. सध्या गोठ्यामध्ये १० खिल्लार, दोन गीर आणि एक साहिवाल गाय आहे. या गाईंच्या शेण, गोमूत्रापासून जीवामृत स्लरी तयार केली जाते. या स्लरीमध्ये ताकदेखील मिसळतात. स्लरी तयार करण्यासाठी टाकी बांधली आहे. शेणखत आणि स्लरीच्या वापरामुळे मोरे यांनी रासायनिक खतांचा वापर थांबविला आहे.  देशी गाईंच्या संगोपनाची माहिती होण्यासाठी गोकूळ गोपालन संस्था सुरू केली आहे.

मोरे यांची शेती 
  सुपर सोनाका - १० एकर
  थॉमसन - २ एकर
  तास ए गणेश - २ एकर
  सोनाका - २
  ऊस - ४ एकर
  चारापिके - १ एकर 
  बेदाण्यासाठी जाती - तास ए गणेश, थॉमन्सन,  सोनाका
  सात एकरावरील द्राक्षापासून बेदाणानिर्मिती
  खरड छाटणी - 
२० मार्च ते १० एप्रिल
  फळ छाटणी - 
२० सप्टेंबर ते १० ऑक्टोंबर
  एकरी द्राक्ष उत्पादन - १६ टन
  दरवर्षी बेदाण्याचे उत्पादन - 
२५ ते ३० टन
  बेदाण्यास मिळणार दर - 
    १७० रुपये प्रति किलो 
  पुणे, मुंबई येथील व्यापाऱ्यांना 
    थेट द्राक्ष विक्री. 
  तासगाव बाजारपेठेत बेदाणा विक्री. तसेच मिठाई उत्पादकांना थेट 
बेदाणा विक्री.

 राहुल मोरे - ९८२२८९६३३७


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon special story Rahul more did good grape farming