esakal | तेरी मिट्टी मे मिल जावा, गुल बनके मैं खिल जावा...
sakal

बोलून बातमी शोधा

तेरी मिट्टी मे मिल जावा, गुल बनके मैं खिल जावा...

लासूर (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील निवृत्त सैनिक प्रकाश संतोष माळी यांना तंतोतंत लागू पडतात. राकट, दणकट, तेवढ्याच मोकळ्या-ढाकळ्या स्‍वभावाचे माळी पंचक्रोशीत फौजी नाना म्हणूनच परिचित आहेत.

तेरी मिट्टी मे मिल जावा, गुल बनके मैं खिल जावा...

sakal_logo
By
चंद्रकांत जाधव

लासूर (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील निवृत्त सैनिक प्रकाश संतोष माळी भारतमातेची सेवा केल्यानंतर आता शेती-मातीच्या सेवेत रमले आहेत. सोबतच जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील सेवेच्या माध्यमातून पशुधनाची सेवाही ते करीत आहेत.

तेरी मिट्टी मे मिल जावा, गुल बनके मैं खिल जावा,
इतनी सी है दिल की.. आरजू...
तेरी नदियों मे बह जावा, तेरे खेतों मे लहरावा,
इतनी सी है दिल की.. आरजू...

अक्षयकुमार अभिनित केसरी या हिंदी चित्रपटातील मनोज मुंतशीर यांच्या गीताच्या या ओळी लासूर (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील निवृत्त सैनिक प्रकाश संतोष माळी यांना तंतोतंत लागू पडतात. राकट, दणकट, तेवढ्याच मोकळ्या-ढाकळ्या स्‍वभावाचे माळी पंचक्रोशीत फौजी नाना म्हणूनच परिचित आहेत. रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकाला दंडवत म्हटल्याशिवाय ते पुढे जात नाहीत. आईवडिलांच्या आजही आज्ञेत असलेले नाना लहान बंधू शरद यांच्यासोबत शेतीचे व्यवस्थापन पाहतात. 

भरतीचा रंजक किस्सा 
नानांचा फौजीतला प्रवास तसा रंजक. दहावीत ते नापास झाले. वडील संतोष मिरचीचे प्रसिद्ध व्यापारी. पोरगा कामधंद्याला लागावा म्हणून आठवडी बाजारात लसूण, मिरची विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला. साधारण १९८६ ची ही घटना. शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायांकित प्रत घेण्याच्या निमित्ताने चोपडा शहरात असतानाच पंचायत समितीत भारतीय सैन्य भरतीची वार्ता नानांच्या कानी आली. कमी वजन भरल्याने सैन्य अधिकाऱ्यांनी त्यांना नकार दिला. पण नानांचा आत्मविश्‍वास मोठा... अधिकाऱ्यांना म्हणाले, मैं वजन अभी बढा सकता हूं! गावात जाऊन ते साडेतीन किलो केळी खाऊन, ढसाढसा पाणी पिऊन भरतीच्या ठिकाणी पुन्हा आले. म्हणाले, मेरा वजन बढ गया. त्या वेळी तब्बल साडेतीन किलो वजन अधिक भरले. अधिकाऱ्यांनाही कौतुक वाटले. मग चाळीसगावात वैद्यकीय चाचणी झाली. मराठा रेजिमेंटच्या दुसऱ्या तुकडीत नाना भरती झाले देखील. त्या वेळेस मोबाईल वा  संवादाची प्रभावी माध्यमे नव्हती. एका गृहस्थाने नाना सैन्यात भरती झाल्याची बातमी दिली. घरच्यांना विश्‍वास बसेना... असा सगळा रोमांच सुरुवातीपासूनच!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

श्रीलंकेतील रोमांच  
नानांना शांती सेनेत श्रीलंकेत पाठविण्यात आले. तेथे आठ जिल्ह्यांचा ताबा लिट्टे संघटनेने घेतला होता. म्होरक्या वेलुपिलाई प्रभाकरनशी भारतीय सैन्याच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. दरम्यान, प्रभाकरनशी भटीकोला कॅम्पमध्ये प्रत्यक्ष भेटीचा योग नानांना आला. चर्चा फिसकटली व युद्ध सुरू झाले. एकदा त्रिंकोमाली भागात सैन्याच्या वाहनांची ये-जा सुरू होती. सायंकाळी वाहनातून उतरून अधिकारी व अन्य दोघांसोबत पाणी पिण्यासाठी काही अंतरावर आले. तोच पुलानजीक भीषण स्फोट होऊन वाहनातील १२ जण जागीच मृत्यमुखी पडले. सातारचे श्री. माने व बुलडाण्यातील श्री. घुगे दोघे थोडक्यात बचावले. माने नजीकच्या समुद्रात भिरकावले गेले तर घुगे झाडावर जाऊन अडकले.  त्यांच्या छातीच्या बरगड्या बाहेर आल्या. 

काश्मीर, कारगिल युद्धाचा थरार
अठरा महिन्यांचा शांती सेनेतील खडतर अनुभवानंतर काश्मिरातील बारामुल्लातही तसाच थरार अनुभवला. गोळीबार, चौक्या उद्‍ध्वस्त करणे असा रोजचा संघर्ष असायचा. हिवाळ्यात प्यायला पाणी नसायचे. बर्फ गोळा करून पातेल्यात तापवायचा आणि पाणी प्यायचे. कारगिल युद्ध सुरू झाले तेव्हा पत्नी व आई पुण्यातील सैन्य दवाखान्यात आजारपणामुळे दाखल होत्या. अशा संकटात नाना देशाच्या रक्षणासाठी झुंजले. १८ वर्षे सैन्यात सेवा बजावली.

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मातीची सेवा 
नाना सैन्यात कार्यरत असताना वडील शेतीचे व्यवस्थापन पाहायचे. परंतु नानांनी आता शेती-मातीच्या सेवेला वाहून घेतले आहे. वडिलोपार्जित दीड एकर शेतीचा मधल्या कालावधीत १५ एकरांपर्यंत विस्तार झाला. एकत्र कुटुंब आहे. वडिलांचे वय ८२ वर्षे आहे. कुठलाच व्यवहार वडिलांना सांगितल्याशिवाय नाना करीत नाहीत. दादर ज्वारी, भुईमूग, कांदा, हरभरा यांच्या शेतीला आता भाजीपाला शेतीची जोड दिली आहे. पंधरा लहान-मोठ्या गायी, दोन बैलजोड्या, तीन कूपनलिका, मोठे ट्रॅक्टर, एक सालगडी, तीन टन क्षमतेचे मालवाहू वाहन आहे. शेती बागायती केली आहे. रासायनिक कीडनाशकांऐवजी गायींचे शेण, मूत्र व वनस्पतींपासून दशपर्णी अर्क तयार करून वापर करतात. चांगला गोठा त्यासाठी उभारला आहे. बंधू शरदसह सेंद्रिय शेतीचा अभ्यास केला आहे. कापसाचे एकरी आठ क्विंटल, गव्हाचे एकरी १० क्विंटल, तर दादर ज्वारीचे एकरी सहा ते सात क्विंटल उत्पादन घेतात. दादर ज्वारीचा कडबा, गव्हाची काड पशुधनासाठी उपयोगात येतो. बंधू शरद यांच्यासोबत नाना देखील शेतीचा आनंद घेतात

टोमॅटो व काकडी 
चुंचाळे येथील भाजीपाला, फळांची उत्तम शेती करणारे अवधूत महाजन यांचे  मार्गदर्शन ते घेतात. दरवर्षी दोन एकरांत टोमॅटो, तीन-ते चार एकरांत काकडी असते. कांदा खरीप व रब्बीत दोन ते अडीच एकरांत असतो. कांदा, टोमॅटो व काकडीची विक्री इंदूर (मध्य प्रदेश) येथील बाजारात करतात. तेथे दर धुळे, जळगाव जिल्ह्यांतील बाजाराच्या तुलनेत अधिक दर मिळतात. शिवाय इंदूरची बाजार समिती २४ तास कार्यरत असते. आपल्या मालवाहू वाहनाचा तिथपर्यंत वाहतूक करण्यासाठी चांगला उपयोग होत आहे. हातात नेहमी पैसा उपलब्ध राहण्यासाठी भाजीपाला शेती त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. दरवर्षी पाच ते साडेपाच लाख रुपये उत्पन्न शेतीतून साध्य करण्याचा प्रयत्न असतो. लॉकडाउन व अन्य समस्यांमुळे यंदा टोमॅटो, काकडीचे पीक फारसे परवडले नाही. तरीही  नाना पुढील हंगामासाठी आशावादी असतात. परिसरात आदिवासी मजूर अधिक आहेत. त्यांच्याशी सलोखा, सौहार्द असावे यासाठी त्यांनी आदिवासी बोली शिकून घेतली आहे. 

दवाखान्यात सेवारत
निवृत्तीनंतर विविध नोकऱ्यांची संधी आली. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचा श्रेणी १ चा दवाखाना लासूर येथे आहे. नानांनी येथे २००५ पासून परिचर म्हणून कार्यरत आहेत. त्या निमित्ताने पशुधनाची सेवा होते. ग्रामस्थांशी जुळून राहून शेती, मातीत रुजवात सुरू राहते. बारा गावांमध्ये ते सेवा बजावतात. रात्री अपरात्रीही पशुधनाच्या सेवेसाठी पोहोचतात. नोकरी, कामानिमित्त दीडशे किलोमीटर दुचाकीवरूनचा प्रवास हा ५४ वर्षीय तरुण विनातक्रार करीत असतो. जिज्ञासा व शिकण्याच्या वृत्तीतून त्यांनी डेअरी विषयातील पदविकेचे शिक्षण घेतले आहे. पशुधनावरील विविध उपचार, तपासणी, सलाईन लावणे, मार्गदर्शन आदी सेवा ते तत्परतेने करतात. 
प्रकाश माळी  ९८२२८०१४८०