दुग्ध व्यवसायातून डौलापूरने उंचावला आर्थिक डौल

दुग्ध व्यवसायातून डौलापूरने उंचावला आर्थिक डौल

वर्धा जिल्ह्यातील डौलापूर (ता. हिंगणघाट) गावाची लोकसंख्या आठशेच्या घरात आहे. शेतीला पूरक म्हणून गावात साधारण १९८४-८५ च्या दरम्यान दुग्ध व्यवसायाची चळवळ सुरू झाली. त्या वेळी सात ते आठ शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. हिंगणघाट तसेच गावशिवारात भरणाऱ्या बाजारातून जर्सी गायींची खरेदी झाली. दारिद्र्य रेषेखालील व्यक्‍तींना बॅंक ऑफ इंडियाकडून कर्ज रकमेच्या स्वरूपात गायींची खरेदी करता आली. दूधविक्रीतून मिळणाऱ्या पैशाच्या बळावर कर्जाची परतफेड करणे अपेक्षित होते. गावातील अन्य शेतकऱ्यांनीही स्वतः दुधाळ जनावरांची खरेदी केली. हळूहळू व्यवसायाने गती पकडली. गावात दूध संकलनाचा आकडा ४०० लिटरवर पोचला. 

शासकीय दुग्ध योजनेला पुरवठा 
डौलापूरपासून नजीक कानगाव येथे शासकीय दूध संकलन केंद्र होते. त्या ठिकाणी दुधाचा पुरवठा केला जायचा. सुरवातीला चांगला दर मिळत असला तरी पुढील काळात शासकीय दुग्ध योजनेला घरघर लागली. त्याचा परिणाम गावातील दूध उत्पादनावर झाला. २००१-०२ काळात डौलापूर सोबतच अन्य गावांतील दुधाचा पुरवठा बंद झाल्याने कानगाव येथील संकलन केंद्रही बंद करण्यात आले.

बजाज फाउंडेशनने दिले बळ 
कधीकाळी दुग्धोत्पादनात चांगले काम केलेल्या डौलापूरविषयी वर्धा येथील जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेला माहिती मिळाली. संस्थेचे विनेश काकडे यांनी पुढाकार घेत गावात पुन्हा दुग्धोत्पादनाला चालना देताना जनावरांच्या खरेदीसाठी अनुदानाचे बळ दिले. पूर्वी वीसहजार रुपये प्रतिम्हैस तर प्रतिगायीसाठी पाच हजार रुपये अनुदान होते. त्यात संस्थेने वाढ करून गायीसाठीदेखील २० हजार रुपये अनुदान दिले. आता गावात सुमारे ३० म्हशी तर दहा जर्सी गायी हेत. दूध संकलन सुमारे २०० लिटरवर पोचले आहे. उन्हाळ्यामुळे मात्र उत्पादनात काहीशी घट झाली आहे. 

दुग्धजन्य पदार्थांना बाजारपेठ  
डौलापुरातील काही शेतकरी दुधाची तर काही दुग्धजन्य पदार्थांची विक्री करतात. अरुण चौधरी यांनी दही (६० रुपये प्रतिलिटर) तर लोणी (५०० रु. प्रतिलि.) विक्रीवर भर दिला आहे. 

कानगाव, कानोली, कात्री, मोजरी या गावांमध्ये या पदार्थांना बाजारपेठ मिळाली आहे. दररोज सकाळी कुटुंबातील सदस्य विक्रीसाठी घराबाहेर पडतो. दुधाला अपेक्षित दर व बाजारपेठ नसल्याने हा पर्याय शोधल्याचे चौधरी यांनी सांगितले. 

पूरक व्यवसायामुळेच चार पैसे अधिक  
अरुण चौधरी यांच्याकडे दहा जनावरे आहेत. साधारण ३० लिटर एकूण दूध मिळते. शक्यतो दही तयार करूनच विक्री केली जाते. त्यांची जेमतेम पाच एकर शेती आहे. पूरक व्यवसायामुळेच चार पैसे अधिक मिळतात असे चौधरी सांगतात. 

उभाटे यांनी केली नव्याने सुरवात 
दीपक उभाटे यांमी सरासरी प्रति ८० हजार रुपये दराने मुऱ्हा म्हशींची खरेदी कळमणा (नागपूर) तसेच यवतमाळ येथील बाजारातून त्यांनी केली. सरासरी एकूण २० ते २५ लिटर दूध मिळते. गावापासून १७ किलोमीटरवरील झाडेगाव येथील हॉटेल व्यावसायिकास ३० रुपये प्रतिलिटर दराने दूध विकले जाते. ग्रामीण भागात दुधाला ग्राहक शोधणे अडचणीचे ठरते. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक हाच पर्याय उरतो असे त्यांनी सांगितले. आपल्या बारा एकर शेतात ते कपाशी, तूर, सोयाबीन, हरभरा आदी पिके घेतात. यातून जनावरांसाठी कुटार मिळते. यंदा ३० हजार रुपयांचे कुटार खरेदी करावे लागले. 

दुग्ध व्यवसायातून २०० ते २५० रुपयांचे रोजचे उत्पन्न मिळते. शेणखत न विकता घरच्या शेतीतच वापरण्यात येते. त्यातून जमिनीचा पोत राखण्यास हातभार लागला आहे. उभाटे स्वतःच दुचाकीवरून दूध विक्रीसाठी घराबाहेर पडतात. गेल्या काही वर्षांत त्यात सातत्य ठेवले आहे. गावातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याप्रमाणेच दुग्ध व्यवसायातून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

प्रक्रियाजन्य पदार्थांवर भर  
प्रवीण चौधरी यांच्याकडे दोन मुऱ्हा म्हशी आहेत. सध्या एका म्हशीपासून १५ लिटर दूध मिळते. गरजेपुरते घरी ठेऊन उर्वरित दुधापासून दही व लोणी तयार करून विक्री केली जाते. प्रक्रियेतून अधिक चांगले पैसे मिळतात असा चौधरी यांचा अनुभव आहे. आपल्या सात एकर शेतीला याच व्यवसायाने मोठा आधार दिल्याचे चौधरी सांगतात.  

शेळीपालनातून उभारी
गावातील मनवर विठोबा मडावी यांच्याकडे २५ शेळ्या आहेत. उत्पन्नाचा कोणता स्रोत नसल्याने मडावी दांपत्य अन्यत्र ठिकाणी कामाला जायचे. आता कुटुंबाची गुजराण शेळीपालन व्यवसायातून होते. चार शेळ्या आणि एक बोकड अशी मदत बजाज फाउंडेशनकडून मिळाली. आता जनावरांची संख्या २५ वर नेण्यात ते यशस्वी झाले आहेत. शेळ्यांसाठी छोटेसे मोकळे शेडही उभारले आहे. त्यांच्याप्रमाणेच गावातील सात ते आठ कुटुंबीयांना संबंधित संस्थेकडून शेळ्या अनुदानावर पुरविण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून गावाने पूरक व्यवसायात उभारी घेतली आहे. 

अरुण चौधरी, ९४२००६१४९२ 
दीपक उभाटे, ९७६४९११७८४ 
प्रवीण चौधरी, ७०८६४६०५४६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com