एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या प्रगतीच्या वाटा

एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या प्रगतीच्या वाटा

यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता. महागाव) येथील सुरेश पतंगराव यांच्या कुटूंबियांची बारा एकर शेती आहे. यातील सात एकर वडिलोपार्जीत अाहे. पूरक व्यवसायातील उत्पन्नाच्या बळावर २००२ पासून टप्याटप्प्याने त्यांनी शेती खरेदी केली.  

रुजवलेली शेती पद्धती 
हळद, कापूस, सोयाबीन, हरभरा अशी पीकपद्धती अंबोडा शिवारात घेतली जातात. तालुक्‍यात मोठ्या क्षेत्रावर हळदीची लागवड होते. गेल्या काही वर्षांत हळदीला चांगले दर मिळाल्याचे त्यांना परिसरातील  शेतकऱ्यांकडून समजले. पतंगराव यांनीही मग त्याचे अर्थकारण अभ्यासून त्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. सन २०१५ मध्ये हळदीची लागवड केली. त्यासाठी बेणे गावातील शेतकऱ्यांकडून तीन हजार रुपये प्रतिक्‍विंटल दराने सात क्‍विंटल एवढे खरेदी केले. पहिल्या वर्षी एक एकरवर लागवड केली. त्याचे एकरी २२ क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. साडेसात हजार रुपये प्रतिक्‍विंटल दराने त्याची विक्री केली. पुढीलवर्षी पाऊण एकरावर तर यावर्षी सुमारे दोन एकरांवर हळद घेतली. 

सिंचनाची सोय  
पुस नदी अंबोडा गावशिवारातून वाहते. सुरेश यांच्या शेतापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर नदीचे पात्र आहे. तेथून पाइपलाइनद्वारे शेतापर्यंत पाणी आणले आहे. शेतात विहीरही आहे. तेरा एकरांपैकी दोन एकर क्षेत्र ठिबकखाली आहे. 

रेशीम शेतीचा प्रयोग 
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्‍यातील भोडवा ही सुरेश यांची सासुरवाडी. त्यांचे चुलतसासरे रेशीम शेती करतात. त्यांच्या माध्यमातून रेशीम शेतीचे बारकावे जाणून घेतले. बाजारपेठ, बेणे, कोष उत्पादन याविषयी तांत्रिक माहिती घेतली. यवतमाळ येथील रेशीम कार्यालयातील तांत्रिक अधिकारी मुकुंद नरवाडे यांचे मार्गदर्शन घेतले. तुती बेणे जुलै २०१३ मध्ये मिळाल्यानंतर एक एकरवर लागवड झाली. 
 
शेडची उभारणी 
सुरवातीला शंभर अंडीपुंजांच्या संगोपनाच्या उद्देशाने ५० बाय २२ फूट आकाराचे शेड उभारले. त्यावर सुमारे एक लाख ३५ हजार रुपयांचा खर्च झाला. शासनाकडून साडे ८७  हजार रुपयांचे अनुदान मिळाले. साडेबारा हजार रुपये अनुदान रेशीम शेतीसाठीच्या साहित्यासाठी मिळाले. पहिल्या व दुसऱ्या वर्षीही शंभर अंडीपुंजांपासून फारच कमी उत्पादन मिळाले. परंतु निराश न होता प्रयत्न सुरूच ठेवले. तिसऱ्या बॅचच्या माध्यमातून मात्र २०० अंडीपुंजापासून १३५ किलो उत्पादन मिळाले. या वेळी उत्पन्नदेखील ३६ हजार रुपयांपर्यंत मिळाले. रामनगर (कर्नाटक) येथे विक्री करण्यात आली. प्रति बॅचसाठी सरासरी दोन महिन्यांचा कालावधी लागतो. 

रेशीम व्यवसायात रोवले पाय 
पारंपरिक शेतीच्या तुलनेत रेशीम शेतीचा पर्याय फायदेशीर असल्याची जाणीव सुरेश यांना झाली. हा व्यवसाय वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नव्याने ५० बाय २४ फूट आकाराचे शेड उभारले.
तुतीखालील क्षेत्र एक एकरावरून चार एकरांपर्यंत नेले. आता जुने व नवे शेड मिळून ४०० अंडीपुंजांचे संगोपन होते. 

शेतकऱ्यांनी केले अनुकरण 
सुरेश यांच्या शेतीची प्रेरणा घेत गावातील सुमारे नऊ शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यामाध्यमातून तूती लागवड आज ७० एकरांवर पोचली आहे. सामूहिक विक्री साधत गावापासून नांदेडपर्यंत छोट्या मालवाहू वाहनाद्वारे कोष पाठविले जातात. नांदेड ते बंगळूरपर्यंत रेल्वेने आणि तेथून पुन्हा छोट्या मालवाहू वाहनाद्वारे कोष रामनगरपर्यंत पोचविले जातात. 

लिलावानंतर तत्काळ चुकारे 
रामनगर येथे दररोज लिलाव प्रक्रिया येथे होते. ऑनलाइन लिलाव प्रक्रियेत क्रमांक नोंदवण्यात येतो. व्यापारी टॅबद्वारे दर निश्‍चित करून बोली सांगतात. दराची रक्कम बाजार समिती प्रशासनाकडे जमा केली जाते. त्यानंतर शेतकरी प्रशासनाकडून आपली रक्कम घेतो, अशी पद्धत या ठिकाणी आहे. 

राजकारणामुळे अडली वाट 
शेतीपूरक व्यवसायाच्या बळावर आपली वेगळी ओळख तयार करणाऱ्या पतंगराव बंधूंच्या शेतात येण्या-जाण्यासाठी रस्ता मात्र नाही. शेतरस्त्यात नाला आहे. त्यावर पूल बांधण्यास पतंगराव कुटुंबीय तयार आहेत; परंतु गावपातळीवरील राजकारणामुळे हे काम रखडले आहे. परिणामी शेतापासून गावात दूध आणण्यासाठी मोठ कसरत करावी लागते, अशी खंत सुरेश यांनी व्यक्‍त केली. 
 : सुरेश पतंगराव, ८८८८०१९९६८

 शेळीपालनावर  भर
सुरेश यांचे बंधू दीपक घरच्या शेळीपालन व्यवसायाकडे लक्ष देतात. सध्या ७० शेळ्यांचे संगोपन सुरू आहे. या व्यवसायात आठ-नऊ वर्षांपासून सातत्य आहे. व्यवसायाची सुरवात दोन शेळ्यांपासून करण्यात आली होती. 

दुग्धोत्पादनातही पुढाकार
एक म्हैस, सात गाई एवढे पशुधन आहे. दररोज सरासरी ४० लिटर दूध संकलन होते. ते गावातील अमूल डेअरीच्या कलेक्शन केंद्राला दिले जाते. या व्यवसायाची जबाबदारी सुरेश यांचे बंधू रवी यांच्याकडे आहे.   

रेशीम शेतीने घडविला विमान प्रवास
डिसेंबर २०१७ मध्ये रामनगर येथे असताना मुक्‍काम करावा लागला. हिंगोली जिल्ह्यातील काही रेशीम उत्पादकांसोबत सुरेश देखील तिथे होते. त्यांनी मग बंगळूर ते हैदराबाद असा विमान प्रवास करण्याचे ठरवले. तेथून रेल्वेने गाव गाठले. सुमारे १४४  किलो कोषांच्या विक्रीतून या वेळी चांगली रक्कम हाती आली. त्यामुळे हे शक्‍य झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com