उसात विराट काबुली हरभऱ्याचा यशस्वी प्रयोग

अनिल देशपांडे
मंगळवार, 6 जून 2017

देवळाली प्रवरा (जि. नगर) येथील नितीन ढूस सातत्याने शेतीत नवे प्रयोग करीत असतात. मागील रब्बीतही (२०१६-१७) त्यांनी उसात विराट या काबुली हरभऱ्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले. त्या आधारे उत्पादन घेतले. त्यातून उत्पादनाबरोबर उत्पन्नही चांगले मिळवलेच. उसातील खर्च कमी केला. हरभऱ्यातील नत्र स्थिरीकरणाचा फायदा ऊस पिकाला करून दिला. 

देवळाली प्रवरा (ता. राहुरी, जि. नगर) येथील नितीन मंजाबापू ढूस हे उत्तम प्रयोगशील शेतकरी म्हणून अोळखले जातात. रसायनशास्त्र विषयात त्यांनी पदवी मिळवली आहे. वडिलांचे मोठे मार्गदर्शन त्यांना मिळाले आहे. त्याचबरोबर मानोरी (ता. राहुरी) येथील कृषिभूषण व प्रयोगशील शेतकरी डॉ. दत्तात्रय वने यांचेही मार्गदर्शन त्यांना मिळत आहे. त्यांच्याच वने मॉडेलनुसार नितीन यांनी आपल्या सर्व शेताचे रेेखांकन केले अाहे. सर्व क्षेत्राला ठिबक व तुषार पद्धतीने सिंचन केले आहे. त्यांच्याकडे सर्वाधिक क्षेत्र उसाचे असून गहू, हरभरा, सोयाबीन, मका व कांदा या पिकांचाही समावेश असतो. जमीन तीन प्रकारची असून ती भारी काळी कसदार, पोयट्याची व वाळूमिश्रित आहे. 

आंतरपिकांचे प्रयोग
सन २००५-०६ मध्ये त्यांनी ऊस घेतला. त्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ संशोधित विशाल या हरभरा वाणाचे आंतरपीक व त्यासह कोथिंबिरीचेही आंतरपीक घेण्याचा प्रयोग केला होता. त्याचबरोबर उसात उन्हाळी कलिंगडाचाही प्रयोग त्यांनी यापूर्वी केला. विशेष म्हणजे कलिंगडाचे पाच एकरांत चार लाख रुपये मिळवून त्यांनी चांगला नफा कमावताना उसाचा खर्चही कमी केला होता. त्यावेळी अवर्षणामुळे उसाला पाणी कमी पडल्याने एकरी ४२ टन उत्पादनावरच समाधान मानावे लागले.

उसात विराट हरभऱ्याचा प्रयोग 
प्रत्येक नवा प्रयोग करताना मागील प्रयोगात झालेल्या चुका सुधारण्याची संधी असते. नितीन देखील मागील अनुभवाच्या जोरावर पुढील प्रयोगाचे चांगले व्यवस्थापन करतात. मागील रब्बीत (२०१६-१७) त्यांनी पुन्हा उसात हरभरा घेतला. यावेळी मात्र त्यांनी विराट या काबूली हरभरा वाणाची निवड केली. मागील प्रयोगात आंतरपीक हरभऱ्याचे जेमतेम उत्पादन मिळाले होते. त्यावेळी उसाची तीन फुटी सरी होती. दोन सरीनंतर एका सरीत हरभरा टोकला होता. 

तज्ज्ञ शेतकऱ्यांचा घेतला सल्ला 
यंदाचा प्रयोग करण्यापूर्वी नितीन यांनी मानोरी (ता. राहुरी) येथील कृषिभूषण व प्रयोगशील शेतकरी डॉ. दत्तात्रय वने यांचे मार्गदर्शन घेतले. मागील प्रयोगातील त्रुटी जाणून घेतल्या. त्यानुसार नियोजन सुरू केले. 

व्यवस्थापनातील मुख्य बाबी 
ऊस व त्यातील हरभरा आंतरपीक लागवड साधारण डिसेंबरमध्ये केली.
उसाची साडेचार फूट सरी ठेवली. टिपरी दीड ते दोन फूट अंतरावर लावली. 
नांगरटीनंतर उसाला एकरी १०ः२६ः२६     दोन गोणी, झिंक, फेरस, गंधक अनुक्रमे १०ः०५ः२० किलो या प्रमाणात दिले.  
ठिबकची लॅटरल टाकून सरी सहा तास ओलावून घेतली. त्यानंतर लॅटरल बेडवर मध्यभागी पसरले. त्याचा उपयोग हरभरा टोकण करण्यासाठी झाला. 
लॅटरलच्या दोन्ही बाजूस हरभरा टोकला. त्याआधी ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया केली. 
हरभऱ्याचे पेरून एकरी २० ते २२ किलो बियाणे लागले असते. मात्र टोकण पद्धतीत ते साडेबारा किलोपर्यंतच लागले. सुमारे दहा किलो बियाण्याची बचत झाली. तसेच त्यासाठीची ७०० ते ८०० रुपये मजुरीही वाचली. एक एकर टोकणीसाठी सात महिला मजूर लागल्या. 
टोकणीतील अंतर सहा ते सात इंच ठेवले. 
जशी जशी उसाची लागवड झाली त्या त्या क्षेत्रास सरीत चार तास पाणी ठिबकद्वारे दिले. 
उसाची गरज लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन केले. एका वेळेस दोन ते तीन तास पाणी दिले. तेही वाफसा स्थितीत. 

सरी व बेडवरील हरभरा यांच्यात सव्वा फुटाचे अंतर होते. हरभरा पिकाच्या थेट मुळांना पाणी मिळाले नाही. तर सरीत दिलेल्या पाण्याच्या दिशेने हरभरा मुळे वाढत गेली. थंडीमुळे उसाची वाढ हळूहळू होत राहिली. हरभऱ्याची वाढ मात्र वेगाने झाली. 
हरभरा सोंगणीला येईपर्यंत दररोज दीड ते दोन तास पाणी दिले. (ड्रीपर ताशी दोन लिटर डिसार्जचा आहे.)

संवेदनशील स्थितीत दोन वेळेस पाणी ठिबकद्वारे दररोज सहा तास याप्रमाणे दररोज दिले. 

बीजप्रक्रिया केली असल्याने मर रोग जाणवला नाही. हरभरा रोपांची उगवणक्षमताही ९० ते १०० टक्क्यांपर्यंत राहिली. 

पहिली खुरपणी ३० जानेवारीस तर दुसरी १५ फेब्रुवारीस केली. 

हरभऱ्यातील दोन फवारण्यांपैकी एक १८ फेब्रुवारीस केली. यात कीटकनाशक व १२-६१-० घेतले.

सात मार्चच्या दुसऱ्या फवारणीत कीटकनाशक बदलले व १३-०-४५ हे विद्राव्य खत वापरले. 

इमामेट्टीन बेझोएट १०० ग्रॅम दोनशे लिटर पाण्यात या प्रमाणात फवारणी केले. 

उत्पादन व ताळेबंद
एकूण व्यवस्थापनातून विराट हरभऱ्याचे चार एकरांत ४३ क्विंटल म्हणजे एकरी सुमारे पावणेअकरा क्विंटल उत्पादन मिळाले. हरभऱ्यासाठी लावणी, काढणी ते मळणीपर्यंत सुमारे १४ हजार ४०० रुपये खर्च आला. त्यास प्रति क्विंटल नऊ हजार रुपये दर मिळाला. व्यापाऱ्यांनी जागेवरूनच खरेदी केली. नितीन म्हणाले की मळणीयंत्रात थोडा तांत्रिक बिघाड झाला. त्याचा परिणाम हरभऱ्याच्या क्वाॅलिटीवर झाला. अन्यथा हा दर साडेनऊ हजार रुपये निश्चित मिळाला असता. 

उसातील खर्चात होणार बचत 
नितीन म्हणाले की, सुमारे चार वर्षे दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे पूर्वहंगामी ऊस साधारण तेवढ्या कालावधीनंतरच घेत आहे. यापूर्वी मला फुले २६५ उसाचे एकरी ८० ते ८२ टनांपर्यंत उत्पादन यायचे. यंदाही तेवढेच उत्पादन अपेक्षित आहे. 
नितीन ढूस, ९०११० १३१०९

प्रयोगाचे झालेले फायदे 
उसाचा उत्पादन खर्च कमी झाला. 
हरभरा हे कडधान्यवर्गात येत असल्याने जमिनीत नत्र स्थिरीकरणासाठी फायदा झाला. त्याचा फायदा ऊस पिकास होत आहे. 
उसातील खुरपण्या आंतरपिकातून कमी झाल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon sugarcane Kabuli Harbhara