अक्षय तृतीयेला आंब्याने खाल्ला भाव

अक्षय तृतीयेला आंब्याने खाल्ला भाव

अक्षय तृतीया व त्यापुढे खऱ्या अर्थाने आंब्याचा हंगाम सुरू हाेताे. 

बाजारपेठेत आंब्याचे प्रमाण वाढण्यास सुरवात होते. त्या पार्श्वभूमीवर यंदा पुणे-गुलटेकडी बाजारात आंब्याची आवक झाली आहे. या विषयी बाेलताना येथील अडते करण जाधव म्हणाले की, काेकणातील आंब्याचा हंगाम डिसेंबर- जानेवारीमध्ये सुरू हाेतो. असे असले तरी हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि तापमानातील प्रचंड चढउताराचा फटका बसल्याने यंदा कोकणातील आंब्याचे उत्पादन घटले आहे. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या सुमारास बाजार समितीत सुमारे १० ते १५ हजार पेट्यांची आवक हाेत असते. परिपक्व आंबादेखील उपलब्ध असताे. यंदा मात्र रविवारी (ता.१५ एप्रिल) अवघ्या चार ते पाच हजार पेट्या कच्च्या आंब्याची आवक झाली. 

कर्नाटक आंब्याला हवामानाचा फटका  
कर्नाटक आंब्याचे अडते राेहन उरसळ म्हणाले, की गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अक्षय तृतीयेला कर्नाटक राज्यातून अवघी ३० टक्केच आवक आहे. या राज्यात आलेल्या आेखी चक्रीवादळामुळे माेहाेर गळाल्याने माेेठे नुकसान झाले. यानंतर अचानक वाढलेल्या तापमानामुळे झाडांना नवीन पालवी फुटली. साहजिकच फळे गळून गेली. एवढेच नव्हे, तर आंबा उत्पादकांना अजून समस्यांना सामोरे जावे लागले. फळ फुगवणीच्या काळातही अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे परिपक्व झालेला आंबा गळाला कर्नाटक हापूससह, लालबाग, पायरी आणि बदाम वाणालाही हा फटका बसला आहे. यामुळे कर्नाटक आंब्याचे दर देखील १५० ते २०० रुपये प्रति पेटीमागे वाढले आहेत. गेल्या वर्षी ४०० ते ६०० रुपयांपर्यंत असलेली पेटी ८०० रुपयांपर्यंत पोचली आहे. गेल्यावर्षी याच हंगामात २५ हजार पेट्यांची झालेली आवक यंदा मात्र अवघी ७ ते ८ हजार पेट्याएवढीच आहे. बाजार समितीतील एकूण आंबा आवकेत कर्नाटकची आवक ६० टक्के आहे. ‘ 

जागेवर विक्रीस प्राधान्य 
कर्नाटक आंब्याचे पुरवठादार महमंद हबीबुला म्हणाले, की आंबा उत्पादनात घट हाेण्याचा अंदाज आल्याने टुमकुर येथे पुणे, मुंबईसह देशभरातील खरेदीदार थेट खरेदीसाठी आले. जास्त दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी जागेवरच आंबे विकण्यास प्राधान्य दिले. त्याचाही काहीसा परिणाम यंदाची आवक घटण्यावर झाला. 

अडते असाेसिएशनचा आंबा महोत्सव
पुणे बाजार समितीमध्ये दरवर्षीप्रमाणे अडते असोसिएशनच्या वतीने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या महाेत्सवाचे उद्‌घाटन अक्षय तृतीयेला सभापती दिलीप खैरे यांच्या हस्ते होणार आहे. काेकणातील हापूस, कर्नाटकातील लालबाग, पायरी हापूससह गुजरातमधील केशर आंबा या वेळी उपलब्ध असणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. शेतकऱ्यांनी मागणी केल्यास त्यांच्यासाठी बाजार समिती जागा उपलब्ध करून देईल, असेही बाजार समितीचे सचिव बी. जे. देशमुख यांनी सांगितले.

अोखी वादळ, तापमानवाढ, ढगाळ वातावरणामुळे मोहोर गळाला. केवळ २० ते २५ टक्केच उत्पादन हाती लागले आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आजपर्यंत १०० पेट्यांचीच विक्री झाली आहे. गेल्या वर्षी हीच विक्री ३०० पेट्या होती. दरदेखील पाचशे ते एक हजार रुपये प्रति डझन आहेत.  
 महेश तिर्लोटकर, ७५०७३५१६६०,  बागायतदार, पुरळ हुर्शी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग

आवक कमी, चढे दर
अक्षय तृतीयेला तयार आंब्यांना मागणी अधिक असली तरी प्रत्यक्षात तो उपलब्ध नाही. त्यामुळे दर वाढले आहेत. गेल्या वर्षी या सणाला आंब्याचे दर आवाक्यात होते. यंदा मात्र ते चढे म्हणजे चार डझनाच्या आंब्यासाठी तीन ते साडेतीन हजार रुपये दर आहे. कच्चा माल मुळातच कमी असल्याने त्याचे दर तयार आंब्याच्या तुलनेत एक हजार रुपयांनी कमी आहेत. साधारण २५ एप्रिलनंतर मोठ्या प्रमाणावर आवक होऊन दर सामान्यांच्या आवाक्यात येतील असा अंदाज आहे, असेही जाधव यांनी सांगितले. : करण जाधव, ९३७२१११४१८

तयार आंब्याची मागणी वाढत आहे. मात्र मागणीच्या तुलनेत आवक कमीच आहे. अक्षय तृतीयेला दर तेजीतच राहतील. मेअखेर पर्यंत काही प्रमाणात दर कमी हाेण्याबराेबरच यंदाचा हंगाम आश्वासक राहील अशी अपेक्षा आहे.. - नाथसाहेब खैरे, ज्येष्ठ अडते, ९८२२०४५०४५

थेट ग्राहक विक्री महाेत्सव
 महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या वतीने शेतकरी ते ग्राहक थेट आंबा विक्री याेजनेअंतर्गत दरवर्षी प्रमाणे आंबा महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे. गुलटेकडी येथील पणन मंडळाच्या कार्यालयातील आवारात तसेच बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात हा महाेत्सव भरतो. दाेन्ही महाेत्सवामध्ये रत्नागिरी आणि देवगड येथील सुमारे ८० शेतकरी सहभागी झाले अाहेत. नैसर्गिररित्या पिकविलेला दर्जेदार हापूस आंबा येथे विक्रीसाठी उपलब्ध असतो. ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी या महाेत्सवातूनच खरेदी करावी, असे आवाहन पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी केले आहे. 

आंब्याची परदेशवारी 
आंब्याची निर्यातही अलीकडील काळात गती घेऊ लागली आहे. राज्यातून यंदा अमेरिकेत एक हजार टन, युराेपीय देशांना साडेतीन हजार टन, आखाती देशांमध्ये २० हजार टन व अन्य देशांना १२ हजार टन असा एकूण ३६ हजार मे. टन आंबा निर्यातीचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ४६ हजार ५६२ मे. टन निर्यात झाली हाेती. त्याचे एकूण निर्यात विक्री मूल्य ३४६ काेटी रुपये हाेते, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com