पाच फळबागांतून बसवले फायद्याचे गणित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Guava-Fruit

पेरू, सीताफळ, द्राक्ष, डाळिंब, अॅपल बोर अशा पाच फळ पिकांतून हमखास उत्पन्नाचा मार्ग सोलापूर जिल्ह्यातील येवती (ता. मोहोळ) येथील शरद अप्पासाहेब गोडसे यांनी तयार केला आहे. त्याला झेंडूसारख्या आंतरपीक आणि रोपवाटिकेची जोड दिली आहे. येणाऱ्या भांडवलाची शेतजमिनीसह योग्य कारणांसाठी गुंतवणूक करत शेतीचे गणित फायद्याचे केले आहे.

पाच फळबागांतून बसवले फायद्याचे गणित

पेरू, सीताफळ, द्राक्ष, डाळिंब, ॲपल बोर अशा पाच फळ पिकांतून हमखास उत्पन्नाचा मार्ग सोलापूर जिल्ह्यातील येवती (ता. मोहोळ) येथील शरद अप्पासाहेब गोडसे यांनी तयार केला आहे. त्याला झेंडूसारख्या आंतरपीक आणि रोपवाटिकेची जोड दिली आहे. येणाऱ्या भांडवलाची शेतजमिनीसह योग्य कारणांसाठी गुंतवणूक करत शेतीचे गणित फायद्याचे केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोहोळ-पंढरपूर महामार्गावर पेनूरपासून आत ५-६ किलोमीटरवर येवती गाव आहे. येथील शरद अण्णासाहेब गोडसे यांच्याकडे वडिलोपार्जित साडेचार एकर शेती असून, त्यात पूर्वी ज्वारी, गहू, तूर अशी पारंपरिक पिके घेत. १९९२ मध्ये बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर शरद यांनी शेतीत लक्ष घातले.

सुरुवातीला शेतीला जोड म्हणून ४ जर्सी गाई, दोन म्हशी घेतल्या. दुग्ध व्यवसायासोबतच दूध संकलन केंद्र काढले. केवळ हंगामी पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा बहुवार्षिक आणि काटक अशा उमराण, चमेली या बोरांची लागवड केली. त्यातून चांगले पैसे मिळाल्याने त्यांच्या शेतीसाठी तो खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट ठरला. अलीकडे काही वर्षांत त्यांनी पेरू, सीताफळ, द्राक्ष, डाळिंब, ॲपल बोर अशा फळ बागांची लागवड वाढवली आहे. आज वडील अप्पासाहेब, पत्नी उज्ज्वला, मुले प्रशांत आणि प्रदीप असे कुटुंबीय त्यांना शेतीत मदत करतात. उत्तम नियोजन, कष्टातून मिळालेल्या फायद्यातून हळूहळू शेती विकत घेत २० एकरपर्यंत वाढवली आहे. 

बहुफळपीक पद्धती
 एकूण क्षेत्र - २० एकर 
संपूर्ण क्षेत्राचे नियोजन करताना विचारपूर्वक पाच प्रकारच्या फळाची लागवड केली. 
 चार एकर द्राक्ष, दोन एकर ॲपल बोर, साडेचार एकर पेरू, एक एकर केसर आंबा, दोन एकर सोलापूर लाल डाळिंब आणि दोन एकर सीताफळ. 
 प्रत्येक फळाच्या हंगामाचा कालावधी मागे-पुढे असून, त्यानुसार कामाचे नियोजन सोपे होते.  शेतातील उत्पन्नही सातत्याने येत राहते. 
 फळबागांमध्ये सुरुवातीला अधिक श्रम घ्यावे लागत असले तरी पुढे योग्य नियोजन आणि व्यवस्थापनातून बऱ्यापैकी शाश्वत उत्पन्न मिळत राहते, असा त्यांचा अनुभव आहे.
पेरू लागवड
 ऑक्टोबर २०१६ मध्ये प्रथम थाई पेरूची दोन ओळीत १२ फूट आणि दोन रोपांत ७ फूट अंतरावर दोन एकरवर लागवड केली. 
 प्रति रोप ९५ रुपये या प्रमाणे एकरी ५१८ रोपांसाठी ४९,२१० रुपये खर्च झाला. 
 लागवडीपूर्वी बेसल डोस, चौथ्या दिवशी रोपांना आधारकाठी, आठ दिवसांनी पाणी, १५ दिवसांनी पहिले खुरपण या प्रमाणे सुरुवातीची निगा राखली. 
 नऊ महिन्यांनी जूनमध्ये छाटणी करून बहर धरला.
 त्यानंतर फळांची विरळणी करून १०-१२ फळे झाडावर ठेवली. पुढे सप्टेंबरमध्ये प्रत्यक्ष फळकाढणी सुरु झाली.
 पण संपूर्ण पेरूला फोमचे आवरण लावल्याने दर्जा चांगला राहण्यास मदत होते. यासाठी एकरी लाख रुपये इतका खर्च वाढत असला तरी किमतीमध्ये प्रति किलो १० इतकी साधारण वाढ मिळाल्याने अंतिम विचार करता तो परवडतो. 
 गेल्या पाच वर्षांत एकही वर्ष त्यांना नुकसानीत गेलं नाही. दरवर्षी दरातील किरकोळ चढ-उतार वगळता पेरू त्यांना चांगला नफा देऊन गेला आहे. 
हैदराबाद, बंगळूर मार्केट
थाई पेरू स्थानिक बाजाराऐवजी हैदराबाद, बंगळूर, बेळगाव या बाजारपेठेत पाठवला जातो. गेल्या चार पाच वर्षाच्या अनुभवातून या बाजारात किमान ३५ व कमाल ५० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळाला आहे.
 लागवडीनंतर चौदा महिन्यांनी उत्पादनाला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी एकरी ६ टन उत्पादन झाले. त्याला दर ३५ रुपये प्रति किलो या प्रमाणे एकरी २ लाखाचे उत्पन्न झाले. 
 दुसऱ्या वर्षी एकरी १२ टन उत्पादन, त्यातून ४ लाख रुपये उत्पन्न. 
 तिसऱ्या २०१९ मध्ये एकरी १५ टन उत्पादन आणि पावणेसात लाख रुपये उत्पन्न. 
 या वर्षी आतापर्यंत ७ टन उत्पादन आणि सव्वातीन लाख रुपये उत्पन्न हाती आले आहे. सध्या प्रति किलो ४५ रुपये दर मिळतो आहे.
 फोम लावण्यासह एकरी दीड लाख रुपये उत्पादन खर्च होतो. 
 पेरुच्या नफ्यातून द्राक्ष व्यवस्थापनासाठी आवश्यक ते दोन लाखापर्यंतचे भांडवल मिळते. 

झेंडूचे आंतरपीक भागवतो खर्च
पेरू, सीताफळ, ॲपलबोर या बागेत संकरित झेंडूचे आंतरपीक घेतात. दरवर्षी किमान चार एकरवर जुलै-ऑगस्टमध्येच झेंडूची लागवड केली जाते. त्यामुळे साधारण दसरा-दिवाळीचा हंगाम साधतो. झेंडू फुलातून किमान एकरी एक लाख रुपये मिळतात. पेरू व्यवस्थापनासाठी साधारण दीड लाख रुपये, सीताफळ आणि ॲपल बोर प्रत्येकी ७५ हजार रुपये असे साधारण तीन लाख रुपये खर्च होतो. तो सगळा खर्च आंतरपीक झेंडूच्या उत्पन्नातून भरून काढला जातो. 

घरखर्चासाठी फळबाग नर्सरी
पेरूचे चांगले उत्पादन मिळत गेले. त्यातून परिसरातील पेरू रोपांची मागणी होऊ लागली. ते पाहता तीन वर्षापूर्वी पेरूची कलमे तयार करण्यास सुरुवात केली. पुढे त्यात सीताफळ, डाळिंब, आंबा, द्राक्ष अशा फळ रोपांचीही भर घातली. वर्षाकाठी किमान २० हजारांहून अधिक रोपांची विक्री होते. त्यातून तीन लाखांचे निव्वळ उत्पन्न हाती पडते. मुलगा प्रदीप यंदाच बी. एस्सी (ॲग्री) झाला. त्याच्या शिक्षणाबरोबरच आजारपणे, अन्य कौटुंबिक खर्चही यातून भागवला जातो.  

शेती उत्पन्नातून जमीन, अवजारे खरेदीसह उभारले घरही!
 १९९८-१९९९ मध्ये चार एकर बोरातून चार लाखांचे उत्पन्न मिळाले. 
 या पैशातून कायमस्वरूपी पाण्याच्या उपलब्धतेसाठी येवती तलावातून पाइपलाइन केली. 
 २००८ मध्ये शरदरावांनी क्लोन-टु ए जातींच्या चार एकरांवर द्राक्षाची लागवड केली. त्याचा बेदाणा तयार केला. बेदाण्यातूनही १२ लाख उत्पन्न मिळाले. त्यातून अडीच एकर शेती विकत घेतली. तसेच २०११ मध्ये ट्रॅक्टर व ब्लोअरची खरेदी केली. 
 पाण्याची गरज वाढत होती. त्यामुळे २०१७ मध्ये पाच लाख खर्चत बोअरवेल घेतल्या.
 २०१८ मध्ये ट्रॅक्टरचलित अवजारे, ट्रॉली घेतली. २०१९ मध्ये घराचे बांधकाम केले. 
 या वर्षी पुन्हा पेरू, द्राक्ष आणि सीताफळ यातून मिळालेल्या उत्पन्नातून आणखी तीन एकर शेत घेतले. 

माझ्या दृष्टीने शेती हीच संपत्ती आहे. येणाऱ्या उत्पन्नातून शेतजमीन विकत घेण्याकडे आमचा कल आहे. येणाऱ्या प्रत्येक पैशाचा वापर योग्य कारणासाठी होतो की नाही, याकडे बारकाईने लक्ष देतो. अनावश्यक खर्च टाळतो.
- शरद गोडसे, ९९६०३०३७१७

Edited By - Prashant Patil

Web Title: Article Write Sudarshan Sutar Sharad Sutar Agriculture

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top