आटून गेलेली गावं

बालाजी सुतार
रविवार, 22 एप्रिल 2018

ओढा आणि विहिरी, आड आणि हापशे क्रमश: कोरडे होत गेले हे आपल्या उघड्या डोळ्यांसमोर घडलेलं अवस्थांतर आहे. कुठं हरपलं पाणी? आपण शिवारभर बोअरिंग मशिन चालवल्या आणि भुईच्या छाताडाची चाळणी करून टाकली. रस्त्यावरून आल्या गेल्या कुणालाही पाणी विचारणं ही हजार वर्षांची संस्कृती सांगणारे आपण त्या जीव वाचवणाऱ्या पाण्याचा वीस रुपयांत सौदा करण्याइतके बेईमान झालो. भुईत ओल टिकवून ठेवणाऱ्या झाडांचा विध्वंस करत राहिलो वर्षानुवर्षे आणि आता ही गावं इतकी आटून गेली की आपल्याशी रक्ताचा, नात्याचा किंवा सोयरसुतकाचा कसलाही संबंध नसलेले सिनेमातले लोक येऊन आपल्या गावात पाण्याची पेरणी करण्यासाठी तळतळून राबू लागले.

ओढा आणि विहिरी, आड आणि हापशे क्रमश: कोरडे होत गेले हे आपल्या उघड्या डोळ्यांसमोर घडलेलं अवस्थांतर आहे. कुठं हरपलं पाणी? आपण शिवारभर बोअरिंग मशिन चालवल्या आणि भुईच्या छाताडाची चाळणी करून टाकली. रस्त्यावरून आल्या गेल्या कुणालाही पाणी विचारणं ही हजार वर्षांची संस्कृती सांगणारे आपण त्या जीव वाचवणाऱ्या पाण्याचा वीस रुपयांत सौदा करण्याइतके बेईमान झालो. भुईत ओल टिकवून ठेवणाऱ्या झाडांचा विध्वंस करत राहिलो वर्षानुवर्षे आणि आता ही गावं इतकी आटून गेली की आपल्याशी रक्ताचा, नात्याचा किंवा सोयरसुतकाचा कसलाही संबंध नसलेले सिनेमातले लोक येऊन आपल्या गावात पाण्याची पेरणी करण्यासाठी तळतळून राबू लागले. आपल्याच शिवारात पाणी खेळावं म्हणून आपल्याला बक्षिसांचं आमिष द्यावं लागावं?

सबंध गावाला वळसा घालून गेलेला एक ओढा होता. म्हणजे अजून तो आहेच, पण तेव्हा तो जिवंत होता. बारमाही नसला तरी निदान आठ-नऊ महिने वाहता असायचा आणि उरलेल्या महिन्यांतही इथेतिथे उरलेले इवलाले डोह त्याला जिवंत ठेवायचे. अगदी पहाटे काही धार्मिक लोक तिथल्या एखाद्या डोहात डुबकी मारून तिथूनच तांब्याभर पाणी घेऊन ओल्या अंगाने थडथडत गावाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या देवळात जाऊन देवाला स्नान घालायचे आणि मग आपापल्या उद्योगाला निघून जायचे. काही वेळाने मग चुकार पोरांची वर्दळ वाढायची. कंबरभर पाण्यात बुचकुळ्या मारून पोहण्याचं सुख लुटणारी पोरं. मग वावरात निघालेला काही बैलबारदाणाही ओढ्यातूनच ढबाक ढबाक चालत पार व्हायची. सकाळ आणि दुपार यांच्यामधल्या प्रहरात मग धुणं धुणाऱ्या बाया आपापल्या धुण्याच्या गाठोड्यासोबत मनातल्याही गाठी तिथं एकमेकींशी उकलत बसायच्या.

आभाळातून पाहिलं असतं तर कळलं असतं की गावाच्या तीन बाजूंनी केवढ्या मायेनं या ओढ्याने गावाला कुशीत घेतलेलं आहे. 

ओढा काठावरच्या वावरांनाही पाणी देई बऱ्याचदा. निदान त्यांच्या पोटात ओल जिवंत ठेवी. गाईगुजींची बैला-शेरडांची तहान भागवी, ओढ्यात मासे खेकडे असत. ते काही माणसांची भूकही भागवायला कमी करत नसत. ओढ्याकाठी झाडझाडोरा होता, त्यात ससे, होले, लाव्हरं घर करून राहत. ओढा आणि ओढ्याचा काठ ही पाण्याने प्राण फुंकलेली एक सदैव गजबजती वस्ती होती.        

गावाला चार देवळं आहेत. त्यातली तीन अशी कायम पाण्याशी सलगी करून असायची. एक देऊळ गावाच्या या टोकाला आणि दुसरं त्या. दोन्ही देवळं ओढ्याच्याच काठाशी बिलगून असलेली. तिसरं देऊळ गावाबाहेर दूर माळावर. तिथं ऐन माळावर एक औरसचौरस असा सखल भाग आहे, त्यातही वर्षातले काही महिने पाणी साठून असायचं. त्या पाण्यापासून टीचभर अंतरावर तिसरं देऊळ. ही गावदेवी आहे. तिथेही नवरात्रात पहाटे उठून जाणारी आणि तळ्यातल्या पाण्याने गावदेवीला न्हाऊ घालणारी कैक मंडळी गावात असत. गावाला आणि गावकऱ्यांना ओढ्याच्या आणि तळ्यातल्या पाण्याचं आपल्यावर असलेलं ऋण मनापासून कबूल असे.

आयुष्य सरून गेल्यावर चौघांच्या खांद्यावरून शेवटच्या प्रवासासाठी गावातला जवळजवळ प्रत्येकच माणूस याच ओढ्याकाठी येऊन अखेरचा विसावा घेई. मयतीवरून परतणाऱ्या लोकांना शुचिर्भूत करून घरी पाठवायला ओढ्याने कधीच हरकत घेतली नाही. 

पाण्याचा ताळेबंदच मांडायचा तर शिवारभर विहिरी होत्या कितीएक. त्यातल्या सगळ्यात जास्त ओढ्याच्या काठाकाठावर. या विहिरीतल्या पाण्यावर गावाचा जीव सुखाचे घास खाई. गावाशेजारी साखर कारखाना नव्हता आणि विदर्भासारख्या जागजागी जिनिंग-प्रेसिंग मिलही नव्हत्या. त्यामुळे नगदी पिकांचा सोस एकुणात कमीच होता. पाण्याची फार उधळमाधळ होतच नसे शिवारात. ज्वारी, बाजरी, तुरी, भुईमूग आणि माळवंटाळवं एवढ्यात कुणबीक आवरतं घेई गाव. क्वचित कुणी ऊस लावून गु-हाळबि-हाळ लावत; पण ते काही फारसं मोठं नव्हतं. 

ओढा, विहिरी राखून ठेवत तेवढ्या पाण्यावर गाव सुखी होतं. शिवारातल्या विहिरी लाडात आल्या की पोरांच्या पोहण्यातल्या मुटक्यांनी सर्वांग चौफेर भिजवून घेत आणि त्यांच्यातल्या पाण्याच्या आनंदाला उधाण आल्यागत वाटे. क्वचित एखादी सासुरवाशीण जगण्यातला उन्हाळा अगदीच असह्य झाला तर यातल्याच एखाद्या विहिरीच्या कुशीत आपल्या जिवाचं दान देऊन टाकी. खुद्द विहिरी तेव्हा हळव्या होऊन रडल्यासारख्या दिसत. असं एकुणात सबंध गावाच्या जगण्यापासून कुणा एकीच्या मरण्यापर्यंत विहिरींना गावात जागा होती. काही विहिरीत आसरा असत, त्यांना वेळोवेळी निवदबोणं  मिळे.

विहिरींवर गावाची श्रद्धा होती.  
प्यायच्या पाण्यासाठी चार सहा आड होते गावात आणि तेवढेच हापसे. काही मातब्बरांच्या घरातही आड असत. सगळ्या आडांवर सकाळ-संध्याकाळ बायाबापड्यांची जाम वर्दळ असे. हापशांमध्ये दांडे खणखणत असत मधूनमधून. आडा-हापशांच्या वाटांवर घागरीतून डचमळून सांडलेल्या पाण्याने दिवसभर तापलेल्या गावातल्या धुळकट पायवाटा संध्याकाळी मंद वळीवाचा गंध सांडत राहत. 

वीसभर वर्षांच्या आधीचे हे दिवस आठवतात तेव्हा मला मोहरून येतं. व्याकूळही व्हायला होतं. यातलं काहीच कसं शिल्लक राहिलं नाही? सबंध शिवारातली, सबंध गावातली ही ओल अशी कशी एकाएकी सरून गेली?

एकाएकी खरं म्हणजे काहीच सरत नसतं. ही ओलही एकाएकी सरलेली नाहीय. 

ओढा आणि विहिरी, आड आणि हापशे क्रमश: कोरडे होत गेले हे आपल्या उघड्या डोळ्यांसमोर घडलेलं अवस्थांतर आहे. कुठं हरपलं पाणी?

ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रचंड विपरीत पद्धतीने बदलेलं ऋतुमान हे जसं याचं कारण आहे तसंच आपण पाण्याला क्रूरपणे वापरलं हेही एक कारण आहेच यामागं. नगदी पिकांच्या लागवडी करणं अजिबात गैर नाही; पण त्या बदल्यात आपण केवढं पाणी जिरवतोय याचं काही भान बहुतेक वेळा आपण राखलं नाही. दिवसरात्र मोटारी लावून आपण उपसत राहिलो जमिनीच्या पोटातून अतोनात प्राणतत्त्व. आणि विहिरी आटत चालल्या तसतशा मग आपण शिवारभर बोअरिंग मशिन चालवल्या आणि भुईच्या छाताडाची चाळणी करून टाकली. दोन-चारशे फुटांवर ठीकच होतं; पण वरचेवर आपण आठ-आठशे फुटांपर्यंत पहारी खुपसून पाणी बाहेर काढायला लागल्यावर शिवारात ओल राहील कशी? कुठून?

गावातले आड आता इतिहासजमा झाले आहेत आणि पराभूत झालेले हापशे मोडूनतुटून गेलेले आढळतात. नळ योजनेच्या नावाखाली पुढाऱ्यांनी आपली घरं भरून घेतली त्यावरही आता वर्षे उलटून गेली. नळांतून पाण्याच्या ऐवजी केवळ अशक्त हवेचे सुस्कारे ऐकू येतात म्हणून मग शिवारभर धरणीचं काळीज विच्छिन्न करून टाकणाऱ्या अजस्र पोलादी पहारी शिवारातून आपण गावात आणल्या, नुसत्या गावात नाही, त्या घराघरात आल्या आणि दर घरातल्या भुईला आपण भोकांवर भोकं पाडत गेलो. नुसतं आपलं भागलं एवढ्यात आपण सुख मानत नाही, आपलं भागून उरलेलं आपण विकतो चक्क शेजाऱ्यांना किंवा शहरी लोक त्यावर गाड्या धुतात भरमसाठ.

रस्त्यावरून आल्यागेल्या कुणालाही पाणी विचारणं ही हजार वर्षांची संस्कृती सांगणारे आपण त्या जीव वाचवणाऱ्या पाण्याचा वीस रुपयांत सौदा करण्याइतके बेईमान झालो. भुईत ओल टिकवून ठेवणाऱ्या झाडांचा विध्वंस करत राहिलो वर्षानुवर्षे आणि आता ही गावं इतकी आटून गेली की आपल्याशी रक्ताचा, नात्याचा किंवा सोयरसुतकाचा कसलाही संबंध नसलेले सिनेमातले लोक येऊन आपल्या गावात पाण्याची पेरणी करण्यासाठी तळतळून राबू लागले. आपल्याच शिवारात पाणी खेळावं म्हणून आपल्याला बक्षिसांचं आमिष द्यावं लागावं? आपलं गाव, आपलं शिवार, आपलं शेत, वावर ही आपली माय असते, मायपांढर असते असं म्हणत म्हणत पिढ्या गेलेल्या आपल्याला त्या मायपांढरीला सुजला करण्यासाठी कुणी स्पर्धा घेतल्या तरच जाग यावी, हे चित्र अमानुष आहे.

आपल्या पोराबाळांना तहानेनं मरू द्यायचं नसेल तर या आटलेल्या गावांत पाणी खेचून आणण्यासाठी यापुढे रक्ताचं पाणी करावं लागेल.

जल असलं, तरच जीव असतो.

९३२५०४७८८३ (लेखक ग्रामीण भवतालाची स्पंदनं टिपणारे साहित्यिक आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balaji sutar article