केळी बाग घेतली तोडायला

प्रतिनिधी
मंगळवार, 16 एप्रिल 2019

 जिल्ह्यात पाणी समस्येने बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण केली आहे. अनेकांवर उभी पिके सोडून देण्याची वेळ आली आहे. यावर्षी एक हेक्टरमध्ये लागवड केलेल्या केळी बागेवर अडीच लाखांचा खर्च करणाऱ्या हिवरखेड येथील विनोद रेखाते या तरुण शेतकऱ्याचीही अशीच अवस्था झाली आहे.

अकोला - जिल्ह्यात पाणी समस्येने बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण केली आहे. अनेकांवर उभी पिके सोडून देण्याची वेळ आली आहे. यावर्षी एक हेक्टरमध्ये लागवड केलेल्या केळी बागेवर अडीच लाखांचा खर्च करणाऱ्या हिवरखेड येथील विनोद रेखाते या तरुण शेतकऱ्याचीही अशीच अवस्था झाली आहे. एवढा खर्च करून आता या पिकापासून २५ हजारही मिळण्याची शक्यता नसल्याने या शेतकऱ्याने व पाणी संपल्याने निराश होत त्याने केळीची बाग तोडणे सुरू केले. 

याबाबत अधिक माहिती अशी, तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील विनोद रेखाते यांच्याकडे वडिलोपार्जित दीड एकर शेती आहे. या शेतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह होणे शक्य नसल्याने त्यांनी गेल्या हंगामात ४० हजार रुपये एकराप्रमाणे अडीच एकर शेती एकूण एक लाख रुपयात ठोक्याने केली. यात त्यांनी केळीची लागवड केली. पाण्याची व्यवस्था असल्याने व योग्य व्यवस्थापन केल्यामुळे त्यांचे हे पीक चांगले वाढले. बागेत घडही पडले. पण पाण्याने घात केला. विहिरीतील पाणी अचानक आटले आणि पळापळ सुरू झाली. बागेला द्यायला थेंबही उरला नाही. सुरुवातीला या विहिरीतील पाण्यावर ओलित व्हायचे. नंतर मात्र प्यायलाही पाणी मिळेनासे झाले. त्यामुळे मोठा खर्च करून व मेहनतीने उभी केलेली केळी बाग आता तोडण्याचे काम त्यांनी सुरू केले. शेत ठोक्याने केल्याचे एक लाख रुपये आणि व्यवस्थापनाचा खर्च दीड लाख असे अडीच लाख रुपये त्यांनी खर्च केले. परंतु पाण्याअभावी या शेतात दुय्यम दर्जाचा माल पडला. व्यापारी तीनशे ते चारशे क्विंटलनेही ही केळी घ्यायला नाहीत. अडीच लाख खर्च केलेल्या बागेतून २५ हजारांचेही उत्पन्न हातात पडू शकले नाही, असे विनोद यांनी हताशपणे सांगितले.

विहिरीतील पाणी अचानक आटल्याने मोठा धक्का बसला. केलेला खर्चही निघाला नाही. अशा दुष्काळी परिस्थितीत शासनाने सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी. दुष्काळ जाहीर झालेल्या आमच्या भागात त्याच्या उपाययोजना कराव्यात. 
- विनोद रेखाते, केळी उत्पादक, हिवरखेड, जि. अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banana garden damage