बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील शेतकरी

बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील शेतकरी

निंभा (ता. पारशिवणी, जि. नागपूर) येथील अनिकेत वैद्य हे मेकॅनिकल इंजिनियर. त्यांनी विशाखापट्टणम व त्यानंतर हैदराबाद येथे खाजगी बॅंकेत नोकरी केली. त्यांचे वडील अविनाश ‘बीएसएनएल’ मध्ये नोकरीस होते. पिता-पुत्र दोघेही नोकरीत असले तरी शेतीची आवड मात्र दोघांनी जपलेली होती. त्यामुळेच वडिलांनी सेवानिवृत्तीनंतर निंबा शिवारात शेती खरेदी केली. सोयाबीन, धान (भात), तूर, कापूस अशी पिके त्यात घेणे सुरू केले. सुमारे पंधरा वर्षे नोकरीच केलेल्या अनिकेत यांना स्वतःचे काहीतरी करावे असे सतत वाटत होते. घरच्या शेतीत मनातील स्वप्ने पूर्ण करायची संधी होती. आवडही जपली जाणार होती. अखेर नोकरीचा राजीनामा देऊन ते गावी परतले.  
एकात्‍मिक शेतीचे प्रयोग 
अनिकेत यांनी घरची सुमारे साडे एकरा एकर शेतीचे व्यवस्थापन आपल्या खांद्यावर घेतले.  शेतीचा इंटरनेटवरून अभ्यास सुरू केला. परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देत ज्ञानवृध्दी  करण्यास सुरवात केली. अभियंत्याची वृत्ती बाळगत वडिलांच्या पारंपरिक शेतीत आधुनिकता आणण्यास सुरवात केली. मात्र त्याची सुरवात पूरक व्यवसायांमधून केली.

रेशीम शेतीची वाटचाल  
रेशीम शेतीविषयक तज्ज्ञांचे भाषण ऐकून प्रभावीत झालेले अनिकेत याच व्यवसायाकडे वळले. त्यातील बारकावे नागपूरच्या रेशीम संचलनालयाकडून जाणून घेतले. ही गोष्ट साधारण २०१६ ची होती. एक लाख रुपये खर्चून ४० बाय २० फूट आकाराचे शेड उभारले. दोनशे अंडीपूंजांचे संगोपन सुरू केले. पण विदर्भातील तापमान, अनुभवाची वानवा यामुळे उत्पादन व अर्थकारण यांचे गणीत फारसे जमेना. सुरवातीच्या काही बॅचेस फेलही गेल्या. त्यानंतर फायदेशीर बॅचेस घेण्यात ते यशस्वी झाले. आत्तापर्यंत एकूण १७ ते १८ बॅचेस त्यांनी घेतल्या आहेत. सुमारे १३० किलोमीटरवरील कटंगी भागात रेलींग सेंटर असल्याने तेथून कोषांना मागणी व्हायची. पण सध्या मजूरटंचाई, तापमान आदी विविध कारणांमुळे व्यवसाय थांबवला आहे. पण लवकरच व्ही वन तुतीवाणाची लागवड सुरू करून योग्य नियोजनातून हा  व्यवसाय पुन्हा फायदेशीर तत्त्वावर सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. 

परसबागेतील कुक्कुटपालन 
खरे तर परसबागेतील कुक्कुटपालन सर्वात आधी सुरू केले होते. त्यातून २५ हजार रुपयांचे उत्पन्नही मिळाले होते. या व्यवसायात उत्पादन खर्च कमी होत असल्याने आजही तो सुरूच आहे. शेतीबाबत बोलायचे तर कपाशीचे एकरी १५ क्विंटल, भाताचे २० क्विंटल असे उत्पादन ते घेतात. भाजीपालाही घेतात. येत्या काळात स्ट्रॉबेरीचा प्रयोग ते करणार आहेत. पाण्यासाठी विहीर व कालव्याची साथ आहे. एक मजूर कायम स्वरूपी असून गरजेनुसार कंत्राटी पध्दतीने ते घेण्यात येतात. शोभीवंत मासे आणि बटेरपालनाकडे पुढील काळात वळणार असल्याचे अनिकेत यांनी सांगितले. शेतीत कृषी सहाय्यक रघुनाथ नाईक यांचे सहकार्य त्यांना मिळते. 

करारावरील पोल्ट्री ठरली फायदेशीर 
अनिकेत यांनी नागपूर येथील एका कंपनीशी करार करीत पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. सन २०१६ मध्ये नागपूरच्या ‘माफसू’ संस्थेतर्फे प्रशिक्षण घेतले. सुमारे ६३०० चौरस फुटांचे शेड उभारून सध्या पाचहजार ब्रॉयलर पक्षांचे यशस्वी संगोपन केले जात आहे. शेड उभारणीवर सुमारे १६  लाख रुपयांचा खर्च झाला. बॅंकेकडून त्यासाठी कर्जही घेतले. विदर्भात उन्हाळ्यात पक्षी दगावण्याचे प्रमाण वाढते. हवा खेळती असल्यास हे प्रमाण नियंत्रित ठेवता येते. त्यामुळे उन्हाळ्यात पक्षांची संख्या कमी करण्यावर भर राहतो. साधारण ४० दिवसांच्या कालावधीत संबंधित कंपनीला दोन किलो वजनाचा पक्षी पुरवला जातो.  वर्षभरात पाच बॅचेस घेण्यात येतात. किलोला साडेपाच रूपये असा दर मिळतो. मरतुकीचे प्रमाण कमी असल्यास आणि पक्षांचा खाद्यान्न दर नियमीत ठेवल्यास कंपनीकडून ‘इन्सेटीव्ह’देखील दिला जातो. माझ्याकडून व्यवस्थापनाच्या सर्व बाबी काटेकोर सांभाळल्या जात असल्याने जपळपास प्रत्येक बॅचला ‘इन्सेटीव्ह’ मिळतोच असे अनिकेत यांनी आत्मविश्‍वासाने सांगितले. हा व्यवसाय आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याचेही ते म्हणाले.  

विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी बॅंकेत गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीत असलेल्या व मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या अनिकेत अविनाश वैद्य यांनी सुमारे १५ वर्षांनंतर शेतीच्या ओढीने आपले गाव जवळ केले. निंभा (ता. पारशिवणी, जि. नागपूर) इथल्या आपल्या शेतीतील प्रयोगात हा अवलिया रमला आहे तो कायमचाच. साडेअकरा शेतीत पारंपरिक पिके घेण्यासोबतच रेशीम, पोल्ट्री, मत्स्यशेती या पूरक व्यवसायांकडेही लक्ष केंद्रित केले. त्यातून उत्पन्नाचे स्त्रोत बळकटीकरणावर भर दिला आहे.

शेततळ्यातील मत्स्यपालनातून उत्पन्न
रेशीम, पोल्ट्री यांच्या जोडीला शेततळ्यातील मत्स्यपालन देखील सुरू केले आहे. त्यासाठी २६ हजार आणि १४ हजार चौरसफूट आकाराची दोन शेततळे कोणत्याही शासकीय अनुदानाविना म्हणजेच स्वखर्चाने घेतली आहेत. त्यासाठी सुमारे सव्वा दोन लाख रुपयांहून अधिक खर्च आला. 
फंगेशीयस जातीच्या माशांच्या तीन बॅचेस घेतल्या आहेत. यंदाच्या बॅचमधून दीड लाख रुपये नफा कमावण्यात त्यांना यश आले आहेत. किलोला ८० रुपये दर जागेवर त्यांनी घेतला आहे. 
रोहू, कटला जातीच्या माशांचेही उत्पादन त्यांनी घेत उत्पन्न कमावले आहे. सुरवातीला अनुभव नसल्याने हेच मासे केवळ ५० रुपये प्रति किलो दराने द्यावे लागले होते. 
आता मात्र मत्स्यपालनातून चांगल्या प्रकारे नफा मिळवण्याचे अनिकेत सांगतात.   

 अनिकेत वैद्य, ९९६३६११२७१ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com