केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटका

केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटका

जळगाव - डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा प्रकोप खानदेशातील केळी उत्पादकांसाठी मोठी हानी पोचविणारा ठरला असून, निसवणीवरील बागांमध्ये ३० ते ३५ टक्के नुकसान झाले आहे. याच वेळी दीड ते दोन महिन्यांच्या बागांमध्ये अनेक रोपे वाढ खुंटून नष्ट झाल्याने नांग्या भरण्याची वेळ आली आहे. केळी पट्ट्याला जवळपास १५० कोटी रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, थंडीचा मोठा विपरीत परिणाम (चरका) केळी उत्पादकांची वित्तीय हानी करणारा ठरला आहे. 

केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यात रावेर व यावलमध्ये अर्ली नवती बागांची मार्च ते एप्रिलदरम्यान बाजारपेठेतील दरांचा लाभ घेण्यासाठी लागवड अधिक झाली होती. चोपडा, जळगाव, पाचोरा भागात ऑक्‍टोबर व नोव्हेंबरमध्ये कांदेबागांची लागवड झाली. अनेक शेतकऱ्यांनी उतिसंवर्धित रोपांना पसंती दिली, तर अनेक जणांनी पारंपरिक पद्धतीने कंदांची लागवड केली. लागवडीसाठी उतिसंवर्धित रोपांसाठी १४ ते १५ रुपये प्रतिरोप असा खर्च आला. कंदांसाठीही किमान तीन रुपये प्रतिकंद असा खर्च आला. मार्च ते एप्रिल २०१८ मध्ये मुक्ताईनगर, यावल, रावेर व नंदुरबारमधील शहादा, तळोदा आणि धुळ्यातील शिरपुरात अधिक प्रमाणात केळी लागवड झाली होती. खानदेशात सुमारे नऊ लाख उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड मार्च ते मे दरम्यान झाली आहे. रावेरातील तांदलवाडीसारख्या गावात पाच लाख केळी रोपांची लागवड मार्च ते मेदरम्यान झाली. फ्रूट केअर तंत्रज्ञान त्यासाठी वापरले गेले. प्रतिझाड किमान ९० ते १०० रुपये खर्च आला. या बागा आता काढणीवर आल्या असत्या; परंतु डिसेंबरमधील शेवटचे १० ते १२ दिवस व जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअसखाली राहिल्याने निसवणीवरील बागांमध्ये घड अडकले. ज्या बागांभोवती सजीव वारा अवरोधक (गवत, शेवरी आदी) नव्हते, त्या बागांना मोठा फटका बसला आहे. निर्यात ठप्प आहे. केळी दरांवर दबाव असून, दर दीड महिन्यात ९५० रुपयांवर पोचलेले नाहीत, असे केळी व्यापाराचे जाणकार व उत्पादक यांचे म्हणणे आहे. 

रावेरमधील सुमारे १५ हजार हेक्‍टर क्षेत्र, यावलमधील तीन हजार, मुक्ताईनगरमधील अडीच हजार, चोपडामधील तीन हजार, शहादामधील ७०० ते ८००, पाचोरा व भडगावमधील दीड हजार, जामनेरातील ७००, जळगावमधील ५०० हेक्‍टर क्षेत्राला थंडीच्या विपरीत परिणामांचा किंवा चरका समस्येचा फटका बसला आहे. दीड ते दोन महिन्यांच्या बागांमध्ये कंद, रोपांची वाढ खुंटली आहे. महिन्यात चार पाने येणे अपेक्षित होते; पण पोगे थांबल्याच्या स्थितीत असल्याने महिन्यात दोनच पाने येत आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

मी अलीकडेच रावेरमधील आटवाडे व परिसरात बागांची पाहणी केली. त्यात निसवणीवरील केळी बागांमध्ये ३० टक्के नुकसान झाले आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव असतानाच थंडीच्या विपरीत परिणामांमुळे बागांना फटका बसला आहे. 
- नाझेमोद्दीन शेख, प्रमुख शास्त्रज्ञ, केळी संशोधन केंद्र, जळगाव

थंडीमुळे निसवणीच्या अवस्थेतील बागांना फटका बसला आहे. कोट्यवधींचे नुकसान झाले असून, निर्यात ठप्प असल्याने केळी दरांवरील दबाव कायम दिसत आहे. 
- प्रशांत महाजन, केळी उत्पादक तथा व्यापाराचे जाणकार, तांदलवाडी, जि. जळगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com