बायोगॅसने दिली विविध यंत्रांना ऊर्जा  

बायोगॅसने दिली विविध यंत्रांना ऊर्जा  

बीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाने दुग्ध व्यवसायातून बायोगॅसनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. त्यातील गॅसचा वापर वापर करून त्यांनी जनरेटर चालवले. त्यापासून कडबा कुट्टी यंत्र, दूध शीतकरण, मिल्किंग मशिन आदीं चालवून डिझेलचा वापर व त्यावरील खर्चात मोठी बचत साधली आहे. आपल्याच शेतातील तंत्राचा खुबीने व कल्पकतेने वापर साधून त्यांनी शेतीकामेही सुकर केली आहेत. 

बीड जिल्ह्यात असलेल्या महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाची सुमारे १९७ एकर शेती आहे. शेतीला जोडून त्यांचा दुग्ध व्यवसायाचा पूरक व्यवसायदेखील आहे. जगदाळे यांचे सात भावांचे कुटुंब आहे. प्रत्येक भावाकडे स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतदेखील आपली शेती किफायतशीर, कमी खर्चिक करण्याचा प्रयत्न या कुटुंबाने केला आहे. दुग्ध व्यवसाय करताना दुधाच्या उत्पादनाव्यतिरिक्त जगदाळे यांनी बायोगॅसनिर्मिती प्रकल्प उभारून जैवइंधनाची सोय केली. त्याचबरोबर या गॅसचा वापर वापर करून त्यांनी जनरेटर चालवले. त्यापासून विविधकामे करून घेण्यातही ते यशस्वी ठरले आहेत. 

वीजनिर्मितीतील प्रयोगशीलता
सध्या हे कुटुंब सुमारे २४ संकरित गायी, म्हशी यांच्यासह सुमारे ७५ जनावरांचे संगोपन करते आहे. गोठा, गायींचे आरोग्य व शेणाच्या साह्याने चालणाऱ्या गोबर गॅस युनिटची जबाबदारी सर्वात लहान बंधू नामदेवराव सांभाळतात. वडील कृष्णाजी यांच्यापासून सुरू असलेला हा व्यवसाय तीस वर्षांत बऱ्यापैकी विस्तारला आहे. एवढा पसारा सांभाळताना अनेकदा खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची अडचण येत होती. सध्या ग्रामीण भागातील ही मोठी समस्या आहे. त्यावर काही प्रमाणात उपाय शोधण्यासाठी जगदाळे यांनी जनरेटरचा आधार घेतला. त्याआधारे कडबा कुट्टी यंत्र, दूध काढण्यासाठीचे यंत्र, दूध शीत करणारे यंत्र व अन्य कामे होऊ लागली. मात्र, त्यासाठी ताशी तीन ते साडेतीन लिटर डिझेल लागायचे. डिझेलचे दरही अलीकडे वाढू लागले आहेत. त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायातील उत्पादन खर्च वाढून नफ्याचे मार्जीन कमी व्हायचे.

अशी झाली तंत्रनिर्मिती 
गोबरगॅस युनिटमधून निघणारा गॅस जरनेटर इंजिनाच्या हवा घेण्याच्या मार्गातून सोडला तर हे इंजिन चालायला लागले हे समजले. अर्थात या कामात डिझेलची थोडी मदत त्यांना घ्यावी लागत होती. मात्र, त्यादृष्टीने सुधारणा करण्यात आली. आता इंजिन चालविण्यासाठी ९० टक्‍के गोबरगॅसचा व केवळ दहा टक्‍केच डिझेलचा वापर होतो. म्हणजे साधारण दोन लिटर डिझेलमध्ये सुमारे दिवसभरासाठी ऊर्जा तयार करणे शक्‍य होत असल्याचं नामदेवराव सांगतात.

असा होतो ऊर्जेचा वापर 
गोबरगॅसच्या गॅसवर आधारित इंजिन सुरू केल्यानंतर अनेक कामे करणे शक्य झाले आहे. यात पाच एचपी मोटरवर कडबा कुट्टी यंत्र चालवणे, साडेसात एचपी मोटरवर एकहजार लिटर दुधाचे शीतकरण करणारे यंत्र, दीड एचपी मोटरवर चालणारे मिल्कींग मशीन आदी कामे या तंत्राद्वारे एकावेळी साधता येतात. याशिवाय गोठ्यातील फॅन, प्रसंगी घरातील पंखे या बाबीही शक्य होऊ शकतात. त्यातून महिन्याला सुमारे चार ते साडेचार हजार रुपयांची बचत होत आहे. 

मोठ्या कुटुंबाचा स्वयंपाक 
जगदाळे यांचे मोठे कुटुंब आहे. साहजिकच गोबरगॅस इंधनामुळे किमान नऊ जणांचा स्वयंपाक, पाणी गरम करणे, चहा किंवा अन्य पदार्थ तयार करणे शक्य झाले आहे. यातून सिलिंडरच्या खर्चातही बचत होत आहे. गोबर गॅसधून निघणाऱ्या स्लरीचा वापर फळबागांमधील झाडांना वापरण्याचे तंत्रही जगदाळे यांनी अवलंबिले आहे. त्या माध्यमातून रासायनिक खतांवरील खर्चातही बचत झाली आहे. 

असे वापरले तंत्र 
 गोबरगॅसच्या साह्याने जनरेटर इंजिन चालविण्याचा प्रयोग करताना सुरवातीला हा गॅस एका नळीच्या साह्याने इंजिन ठेवलेल्या एका खोलीतील टॅंकमध्ये घेण्यात आला. गॅस साठविण्यासाठी टॅंकच्या पाठीमागील एका खोलीत मोठा रबरी बलून उभा करण्यात आला. टॅंकमधील गॅस नळीच्या साह्याने इंजिनमधील हवा ओढण्याच्या जागेत सोडण्यात आला. इंजिनवरील भार जसजसा वाढेल व त्याला गॅसची जसजशी गरज असेल तशा पध्दतीने त्याचे प्रमाण वाढविण्यासाठी कॉकची सोय केली आहे. हा बलून सुमारे १० फूट उंचीचा आहे. तो बारामती येथील एका वितरकाकडून आणला आहे. हा बलून फुटण्याचा व पुढील आपत्तीचा धोका नसल्याचे नामदेवराव यांनी सांगितले. 
आत्तापर्यंत सुमारे ६०० शेतकऱ्यांनी हा प्रयोग प्रत्यक्ष भेट देऊन पाहिले असल्याचे ते म्हणाले. याबाबत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन केले जाते आहे. गेल्या दोन वर्षांत दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. हे तंत्र वापरण्यासाठी गोबरगॅस १० पाटी व २०० लिटर पाणी असे तयार केलेल्या नाल्यात घ्यावे लागते. मात्र सध्या पाणीटंचाई असल्याने बलूनचा वापर थांबवला आहे. त्याऐवजी गोबरगॅस टाकी व पाइप्स यांचा वापर करून जनरेटर चालविण्याचे काम करीत असल्याचे नामदेवराव म्हणाले.  
   

जनरेटर चालविण्यासाठी गॅसचा वापर 
नामदेवराव यांनी या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. घरच्या गोबरगॅस युनिटमधील गॅसचा वापर करून त्या ऊर्जेवर जनरेटर चालविता येईल का अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली. मांजरसुंबा येथील आपले मित्र अर्जुन डोळस व जगन्नाथ चव्हाण यांना हा विचार बोलून दाखवला. ‘मॅकेनीक’ असलेल्या या दोघा मित्रांनी प्रयत्न करून पाहू असे सांगत कामाला सुरवातही केली.  

नामदेवराव जगदाळे, ९०११६९७१०३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com