इवलीशी मधमाशी...आरोग्याची, पैशाची पेटी...!

बिपीन जगताप
बुधवार, 20 मे 2020

मधमाशी या किटकाला सामाजिक कीटक म्हटले जाते. सपुष्प वनस्पतींना मधमाशीचा होणारा स्पर्श परीसस्पर्शा पेक्षा कमी नसतो; फलधारणेसाठी अत्यंत उपयुक्त असतो. माणसाला अन्न वनस्पतीपासून मिळत असले तरीही मधमाशा यात महत्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच आपल्या सर्वांवर मधमाशीचे मोठे उपकार आहेत. मधासारखे अमृत निर्माण करणाऱ्या या कीटकाचे अस्तित्व धोक्यात आहे. मधासाठी पोळी जाळणे, विषारी कीटक नाशके फवारणे, मोबाईल टॉवर उभारणे, मधमाश्यांविषयी असलेले अज्ञान पसरवणे, या सर्व कारणांमुळे एक उपयुक्त जीव संपण्याच्या मार्गावर आहे. यासाठी आपण हे करू शकता...

कोरोनामुळे आरोग्याच्याबाबतीत अतिशय संवेदनशील झालेले लोक भविष्यात मोठ्या प्रमाणात मधाचे सेवन करणार आहेत. मधाचे विक्रमी उत्पादन वाढविण्यासाठी तरुण प्रयोगशील शेतकऱ्यांनी पुढे येणे आवश्यक आहे. जगात मधाला प्रचंड मागणी असल्याने निर्यातीलाही मोठा वाव आहे.

मधमाशी या किटकाला सामाजिक कीटक म्हटले जाते. सपुष्प वनस्पतींना मधमाशीचा होणारा स्पर्श परीसस्पर्शा पेक्षा कमी नसतो; फलधारणेसाठी अत्यंत उपयुक्त असतो. माणसाला अन्न वनस्पतीपासून मिळत असले तरीही मधमाशा यात महत्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच आपल्या सर्वांवर मधमाशीचे मोठे उपकार आहेत. मधासारखे अमृत निर्माण करणाऱ्या या कीटकाचे अस्तित्व धोक्यात आहे. मधासाठी पोळी जाळणे, विषारी कीटक नाशके फवारणे, मोबाईल टॉवर उभारणे, मधमाश्यांविषयी असलेले अज्ञान पसरवणे, या सर्व कारणांमुळे एक उपयुक्त जीव संपण्याच्या मार्गावर आहे. यासाठी आपण हे करू शकता...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

1) मधमाशाचा अधिवास संपू न देणे व त्यांचे संरक्षण करणे.
2) मधाची पोळी जाळून अथवा धूर देऊन न काढणे
3) विषारी कीटकनाशकांच्या फवारण्या करू नये. अपरिहार्यता असेल तर संध्याकाळी कराव्यात
4) मधमाश्यांचे शास्त्रीय प्रशिक्षण घेऊन मधमाशीपालन करावे
5) जंगलास वणवा लावू नये, अथवा लागल्यास तत्काळ विझवावा
6) शेताच्या आजूबाजूची मधमाश्यांची पोळी काढू नयेत
7) मधमाश्यांच्या अधिवासात मोबाइल टोवर उभारू नये
8) मधमाश्यांविषयी जनजागृती करावी
9) मधमाश्यांसाठी सपुष्प वनस्पतींची लागवड करणे.
10) जंगल तोड न करणे.

मधमाशी आदर्श सामुहिक जगणे माणसाला शिकवते. दीर्घ कष्ट करत मधासारखा गोड पदार्थ निर्माण करते. आपण सर्वजण मधमाशी वाचवण्याचा पर्यायाने माणूस वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया ...!

शेतीला असावी मधमाशीपालनाची जोड
पराग सिंचनामुळे शेती उत्पादनात वाढ होत असल्याने मध व मेण या बाबींपेक्षा उत्पादनातील वाढ हा महत्त्वाचा घटक मानून मधमाश्यांच्या पालनाला महत्त्व देणे गरजेचे आहे. रोजगारनिर्मितीला वाव असल्याने हा उद्योग पूरक उद्योग म्हणून केल्यास ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
फळे, भाजीपाला पिकांच्या परागीकरणात मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे उत्पादनात 25 ते 35 टक्के वाढ होते. मधमाशीपालनाकडे पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांचा कल वाढवण्याकरिता शासनातर्फे अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यातील काही योजनांना अनुदानसुद्धा दिले जाते.

मधमाशीपालनाचे फायदे
1) पर्यावरणाचा समतोल राखून नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्यासाठी हा व्यवसाय अतिशय महत्त्वाचा आहे.
2) अनेक पिकामध्ये मधमाश्यांद्वारे परागीकरण झाल्यामुळे उत्पादन वाढते.
3) मधासोबतच मेणाचेही उत्पादन मिळते. सौंदर्यप्रसाधने, अनेक प्रकारची औषधे तयार करण्यासाठी मध आणि मेणाचा उपयोग केला जातो.
4) कमी खर्चात गाव पातळीवर रोजगार मिळवून देणारा हा उद्योग आहे.
5) मधमाशीपालन शेती, फळबाग, भाजीपाला लागवड व कोणत्याही पूरक उद्योगाशी स्पर्धा करत नाही.
6) जागा, वीज, वाहन, इमारत अशा भांडवलाच्या गुंतवणुकीची गरज नसते.

मधमाशी पालनासाठी लागणारे साहित्य
1) मधमाश्यांसाठी लागणारी पेटी - जंगली लाकडाची साधी पेटी - 1500 रूपये; सागवानी लाकडाची पेटी - 2700 रूपये
2) पोळी - 1500 रूपये प्रतिपोळी
3) एकत्रित पेटी (पेटी + मधमाश्या पोळी) - 4000 रूपये प्रतिपेटी
4) मधयंत्र - 4000 ते 10,000 रूपये (गॅल्व्हनाईज्ड)
5) धुरड - धुरडचा उपयोग मधमाशा आपल्याला चावून नयेत यासाठी आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी उपयोग केला जातो.
6) कापड किंवा नेट - (बीव्हेल) मधमाश्यांच्या दंशापासून डोळे व नाकाचा बचाव करण्यासाठी कापड किंवा नेटचा उपयोग करता येतो.
7) सुरी - पट्ट्या सैल करण्यासाठी आणि मधाची पोळी कापण्यासाठी सुरी वापरतात.
8) ब्रश - मधमाश्यांना पोळ्यापासून वेगळे करण्यासाठी.

मधमाशीपालनासाठी आवश्यक बाबी
1) मधमाशी पालनासाठी मधमाशांच्या योग्य जातीची निवड करावी. (सातेरी अथवा मेलीफेरा)
2) मधमाशांना पराग, मकरंद देणाऱ्या वनस्पतींची मुबलक प्रमाणात उपलब्धता असावी व त्यांच्या फुलोऱ्याचे सातत्य असणेसुद्धा आवश्यक आहे.
3) मधमाशी पालनासाठी आवश्यक तंत्रांचे प्रशिक्षण असणे आवश्यक आहे.
4) मध पेट्या आणि मधयंत्र त्यांना हाताळण्याचे तंत्रज्ञान अवगत असणे गरजेचे अाहे.
5) मधाची उत्तम प्रत असणे आवश्यक आहे.
6) मध आणि मेण विक्रीसाठी बाजारपेठेची जवळच उपलब्धता असावी. संचालनलयामार्फत आवश्यतेनुसार खरेदी करते
7) मधमाश्यांची वाहतूक संध्याकाळी किंवा रात्री करावी.
8) पेट्या शक्यतो विद्युतवाहक तारा नसलेल्या ठिकाणी ठेवाव्यात.

मधमाश्यांच्या प्रजाती
- भारतीय माशी (ॲपिस सेरेना इंडिका)
- युरोपियन माशी (ॲपिस मेलिपेरा)
- आग्या माशी (ॲपिस डॉर्सेटा)
- लहान माशी (ॲपिस फ्लोरिया)
या मधमाश्यांपैकी भारतीय माशी आणि युरोपियन माशी पेटीत पाळता येतात.

परागीभवनामुळे लाभ होणाऱ्या भाज्या, फळे आणि फुले
- भाज्या: कांदा, कोबी, मुळा, शेवगा, दोडका, कारली, काकडी, भोपळा, गाजर इ.
- फळे: डाळिंब, संत्री, पेरू, स्ट्रॉबेरी, काजू, नारळ, लिंबू इ.
- फुले: शेवंती, झेंडू, होलिहोक, अॅस्टर ॲस्टर इ.
- पिके: मोहरी, सूर्यफूल इ.

मधपेट्या ठेवण्याची वेळ
- फळबागेतील व फळभाज्या पिकातील फुलोरा 5 ते 10 टक्के झाल्यानंतर शेतामध्ये पेट्या ठेवाव्यात.
- एक हेक्टर पिकासाठी अंदाजे तीन भारतीय माश्यांच्या किंवा दोन युरोपियन माश्यांच्या मधपेट्या ठेवाव्यात.

उपयोगी वनस्पतींची लागवड
शेवगा, रिठा, निलगिरी, सावर या वनस्पती लावल्यास मधमाश्यांना वर्षभर अन्नाचा पुरवठा होतो. शेतामध्ये जवळपास मका नेहमी फुलत राहील अशा प्रकारे मका पेरल्यास मधमाशी पालनास फायदा होतो. कीडनाशकांपासून मधमाश्यांचे संरक्षणासाठी सेंद्रिय कीटनाशकांचा वापर करावा.

कोरोनाच्या काळात...
आरोग्याच्याबाबतीत अतिशय संवेदनशील झालेले लोक भविष्यात मोठ्या प्रमाणात मधाचे सेवन करणार आहेत. मधाचे विक्रमी उत्पादन वाढविण्यासाठी तरुण प्रयोगशील शेतकऱ्यांनी पुढे येणे आवश्यक आहे. जगात मधाला प्रचंड मागणी असल्याने निर्यातीलाही मोठा वाव आहे. कोरोना विषाणूमुळे जागतिक मंदी येणार असे बोलले जात असले तरी शेतकऱ्यांना या मंदीतच प्रचंड संधीही चालून आली आहे. मधमाश्यांचे संवर्धन संरक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावर 20 मे हा दिवस 'जागतिक मधमाशी दिन' म्हणून साजरा केला जात असतो. पुढील पाच दिवसांनी हा दिवस आपणही साजरा करणार आहोत.

मधमाश्यांच्या संवर्धनासाठी आज आपण पुढे येऊया. शेतकरी बेरोजगार तरुण महिलांसाठी हा नमुनेदार उद्योग प्रचंड फायद्याचा ठरणार आहे. राज्य शासन मधमाशीपालनासाठी पन्नास टक्के अनुदान देताना प्रशिक्षण मोफत देत आहे. मध खरेदीची हमीही देत आहे. यातच आता केंद्र शासनाने या उद्योगास हातभार लावला आहे. याचा फायदा घेऊन आपणही मधमाशा संवर्धनातून उद्योजक व्हावे अशाच शुभेच्छा ...!

मधमांश्याचे जीवन विश्व
ज्या वेळी मधमाशी या जगातून संपेल त्यानंतर अवघ्या चार वर्षांनंतर मनुष्य जातीचे अस्तित्वच संपुष्टात येईल.
- अल्बर्ट आइनस्टाईन

(लेखक बिपीन जगताप महाराष्ट्र राज्याच्या खादी ग्रामोद्योग विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bipin jagtap writes about importance honey bee human life