अत्‍यल्‍प पाण्यात वांग्यांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन

डावीकडून संजय यांचा लहान मुलगा व्यंकटेश, पुतण्या देवव्रत, थोरला मुलगा रितेश, संजय व मनीषा हे महाजन दांपत्य.
डावीकडून संजय यांचा लहान मुलगा व्यंकटेश, पुतण्या देवव्रत, थोरला मुलगा रितेश, संजय व मनीषा हे महाजन दांपत्य.

जळगाव जिल्ह्यातील भोरटेक (ता. भडगाव) येथील शेतकरी संजय बळिराम महाजन हे अवर्षणप्रवण स्थितीला मागील तीन-चार वर्षांपासून तोंड देत आहेत. दिवसात फक्त तासभर चालणाऱ्या विहिरीच्या पाण्यावर त्यांनी भरीताच्या व काटेरी वांग्यांचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे. पीक अवशेषचा वापर व सेंद्रिय पद्धतीचा वापर या बाबींवर भर देत त्यांनी आपल्या वांग्यांची वेगळी ओळख तयार केली आहे.

जळगाव जिल्ह्यात भोरटेक (ता. भडगाव) परिसरात दुष्काळी स्थिती आहे. मागील दोन वर्षे हवा तसा पाऊसच झाला नाही. शेती संकटात आली. विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी एवढी खाली आली की तासभरही विहिरींमधून पाण्याचा उपसा होत नाही. पाच अश्‍वशक्तीचा पंपही चालत नाही. कोरडवाहू शेती तर या भागात धोक्यातच आल्यासारखी झाली. गावातील संजय महाजन यांच्याकडे साधारण अशीच स्थिती झाली. त्यांची सुमारे १७ एकर शेती आहे. दोन विहिरी. मात्र एकाच विहिरीला पाणी आहे. तीदेखील जेमतेम तासभर चालते. संजय हे कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी व जमीन सुपीकतेसंबंधी ॲग्रोवनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवा विचार देणारे प्रताप चिपळूणकर यांच्या संपर्कात असणारे शेतकरी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात संजय यांनी तणांचे नियंत्रण व्यवस्थापन व विना मशागतीची शेतीची कास धरली आहे.

विनामशागत शेतीची कास 
कमी खर्च व गुणवत्तापूर्ण उत्पादन हे सूत्र बांधून संजय विविध पिके घेत आहेत. देशी कापसाची शेती त्यांनी विना मशागत व रसायनांचा वापर शक्यतो न करता यशस्वी केली आहे. सध्या चार एकर सुबाभूळ, चार एकर देशी कापूस (कापसात मोसंबीचे आंतरपीक, एक एकर हळद, एक एकर कांदा, दीड एकर मका, पाऊण एकर वांगी अशी पिके आहेत. सुबाभूळला सिंचनाची फारशी गरज नाही. कापसाचे पीक त्यांनी पावसाच्या पाण्यावर घेतले. त्याला दोन वेळेस पट पद्धतीने पाणी दिले. पीक जोमात आहे. उर्वरित सर्व पिकांमध्ये ठिबक आहे. भाजीपाला शेतीचा चांगला अनुभव आहे. मात्र कमी पाण्याची समस्या लक्षात घेऊन त्याचे नियोजन केले. 

वांग्याचा प्रयोग 
संजय गेल्या नऊ वर्षांपासून पिकांच्या अवशेषांचा वापर करतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली आहेच. शिवाय जलधारण शक्तीही वाढली आहे. त्याचाच फायदा कमी पाण्याच्या काळात त्यांना होतो आहे. यंदा वांगे शेतीतील नियोजनात पऱ्हाटी न उपटता त्यावर रोटाव्हेटर फिरविला. पिकांचे अवशेष नेहमीप्रमाणे ठेवले. पाऊण एकरात भरताच्या वांग्यांची २७ जून रोजी साडेचार बाय चार फूट अंतरात तर काटेरी वांग्यांची चार बाय दोन फूटवर लागवड केली. भरताच्या वांग्याची रोपे हिंगोणे (ता. एरंडोल, जि. जळगाव) येथील शेतकऱ्याकडून आणली. एक रुपये प्रतिरोप असा खर्च आला. तर काटेरी संकरित वांग्यांची रोपेही एक रुपये प्रतिरोप या दरात पाचोरा येथील नर्सरीतून घेतली. ठिबकचे नियोजन केले. कारण पावसाच्या लहरीपणाचा  फटका बसला असता तर ठिबकचा आधार गरजेचा होता. पावसाच्या पाण्यावर पीक सुरवातीला वाढले. जुलै, ऑगस्टमध्ये पावसाने ताण दिल्याने पीक तरले. त्या वेळेसही विहिरीतून तासभर पाणी मिळायचे. खरे तर वांगी अधिक फवारणी व रसायनांच्या वापराशिवाय जोमात येतच नाहीत असे सांगितले जाते. पण शक्यतो अत्यंत कमी किंवा गरजे एवढाच रासायनिक कीडनाशकांचा वापर केला. तणनाशकांचा वापरही टाळला. व्हेंच्युरीमधून दशपर्णी अर्क आठ ते १० दिवसांआड दिला. त्याचबरोबर दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, ताक, हिंग यांच्याही फवारण्याही नियमित घेतल्या. शेतात झाडाखाली सुमारे ४५ दिवस दशपर्णी अर्क आंबवण्याची क्रिया केली. 

उत्पादनास सुरवात
भरताच्या वांग्यांची एक हजार तर काटेरी वांग्यांची सुमारे ३०० झाडे आहेत. ऑगस्टमध्ये उत्पादन सुरू झाले. सुरवातीला दर चार ते पाच दिवसांत तीन ते साडेतीन क्विंटल तर त्यानंतर सात ते आठ क्विंटलचा प्रतितोडा व्हायचा. आत्तापर्यंत सुमारे २० तरी तोडे झाले आहेत. सुरवातीला विक्री जळगाव, चाळीसगाव येथील बाजारात केली. मागील काही दिवसांपासून मुंबई (वाशी) येथील बाजारात वांगी पाठविण्यात येत आहेत. कजगाव (ता. भडगाव) येथील मालवाहू वाहनचालक ही वांगी घेऊन जातात. ऑक्‍टोबर ते अलीकडील काळापर्यंत सरासरी १५ ते २० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. वांगी निरोगी, चमकदार, मऊ व चवदार असल्याने आगाऊ मागणी असते. सुमारे दीड लाख रुपयांचे एकूण उत्पन्न नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत मिळाले. हंगाम आणखी किमान दीड ते दोन महिने सुरू राहील. आता पुन्हा १५ गुंठ्यांवर लहान काटेरी वांग्यांची लागवड केली आहे. 

कमी पाण्यावर घेतले पीक
वांग्यांच्या पिकाला अधिक पाणी लागते हा काहींचा असलेला समज संजय यांनी यशस्वी नियोजन करून दूर केला. ऑक्‍टोबरपासून दोन दिवसांला फक्त एक तास पाणी देण्यात आले. जमिनीत सेंद्रिय कर्ब चांगला असल्याने वाफसा चांगला आहे. कारण संजय हे मशागत फारशी करायची नाही या सूत्रावरच काम करतात. त्यांच्याकडे पाच देशी गायी व बैलजोडी आहे. मजुरांकरवी ते कामे करून घेतात. त्यांचा थोरला मुलगा रितेश उच्चशिक्षित असून कृषी व्यवसाय व्यवस्थापन संबंधीच्या कंपनीत नोकरी करतो. लहान व्यंकटेश माध्यमिक शिक्षण घेत आहे. पत्नी सौ. मनीषा यांची संजय यांना शेतीच्या व्यवस्थापनात मदत मिळते.
- संजय महाजन - ९५१८७६४२९३, ९८५०६९११३३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com