बटन मशरुम उत्पादनाची वेगळी वाट

डॉ. टी. एस. मोटे
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

पॅकिंग व मार्केटिंग
मशरुमची काढणी केल्यानंतर २०० ग्रॅम मशरुम सछिद्र प्लॅस्टिक पिशवीमध्ये पॅक केले जाते. हे मशरुम फक्त २४ तास टिकते, त्यामुळे त्वरीत बाजारपेठेत विक्रीस पाठविले जाते. स्थानिक बाजारपेठेसाठी कार्डबोर्ड किंवा कागदी खोक्यामध्ये आणि लांबवरच्या बाजारपेठेसाठी थर्माकॉल बॉक्समध्ये पॅकिंग केले जाते. थर्माकॉल बॉक्समध्ये बर्फ टाकून तापमान कमी ठेवले जाते. प्राधान्याने मुंबई, हैदराबाद येथील बाजारपेठेमध्ये मशरुम पाठवले जातात. तसेच स्थानिक हॉटेल, ढाबे यांना घाऊक पद्धतीने पुरवठा करतात.

औरंगाबाद येथील उच्चशिक्षित दहाड बंधूंनी बाजारपेठेची मागणी ओळखून वर्षभर बटन मशरुम उत्पादनाचा अत्याधुनिक प्रकल्प उभारला आहे. वर्षभर प्रति दिन सुमारे ३०० ते ४०० बटन मशरुमचे नियमित उत्पादन घेतले जाते. या व्यवसायाची उलाढाल २.५ ते ३ कोटी रु.पर्यंत असून, त्यातून सुमारे २५ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

नीलेश गोपाळ दहाड (वय ४५ वर्षे) हे बी.ई. (कॉम्प्युटर सायन्स) शिक्षणानंतर एका खासगी कंपनीमध्ये महाव्यवस्थापक पदापर्यंत पोचले होते. त्यांचे लहान बंधू शैलेश गोपाळ दहाड (वय ४१ वर्षे) हे बी.ई. (मॅकेनिकल) पदवीधर असून, कोचिंग क्लास आणि बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. मात्र, नीलेश यांना एका टप्प्यावर स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा विचार आला.

त्यांनी व्यवसायातील संधीचा शोध सुरू केला. वाढत्या पर्यटन आणि हॉटेल व्यवसायामुळे बटन मशरुमला मोठ्या प्रमाणात मागणी असूनही तांत्रिक कारणांमुळे उपलब्धता कमी असल्याचे लक्षात आले. मग आधीपासूनच व्यवसायामध्ये कार्यरत असलेल्या बंधूसह बटन मशरुम निर्मितीच्या व्यवसायामध्ये उडी घेतली. दहाड बंधूंनी वर्षभर बटन मशरुम उत्पादन घेता येईल, अशा पद्धतीचा आधुनिक प्रकल्प उभारला आहे. 

जगभरात खाण्यायोग्य मशरुम विविध जाती आहेत, यामध्ये ९० टक्के वाटा हा बटन मशरुमचा आहे. पूर्वी या मशरुमचे उत्पादन थंडीच्या दिवसात घेतले जायचे. मात्र, आधुनिक वातानुकूलनाचे तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे वर्षभर उत्पादन घेणे शक्य होते. अर्थात, यासाठीची प्राथमिक आर्थिक गुंतवणूक मोठी आहे. स्वनिधीसह बॅंकेकडून कर्जाऊ २.५ कोटी रुपये घेतले.

एस.एन.ॲग्री या नावाने औरंगाबादपासून १५ कि.मी. अंतरावरील परदरी येथे दोन एकर क्षेत्रामध्ये बटन मशरुम उत्पादनाचा आधुनिक प्रकल्प उभा केला. या उद्योगामध्ये प्रति दिन ३०० ते ४०० किलो बटन मशरुम उत्पादन होते. वर्षभर २५-३० लोकांना रोजगार उपलब्ध झाला.

सुसज्ज प्रकल्प
या ठिकाणी माध्यम तयार करण्यासाठी आणलेल्या शेतातील टाकावू पदार्थ साठवण्यासाठी मोठे शेड उभे केले आहे. ८० X ९० फुटांच्या शेडमध्ये आठ क्रॉपिंग रुम, स्टोरेज रुम व कोल्ड रुम आहेत. प्रत्येक क्रॉपिंग रुम २३ X ३२ फुटांची व १६ फूट उंचीची आहे. तापमान नियंत्रित करण्यासाठी अॅटोमॅटिक एअर हँडलिंग युनिट, चिलरची व्यवस्था केली आहे.

बटन मशरुम उत्पादनातील टप्पे 
शेतीतील टाकाऊ घटकांचा वापर -

मशरुम उत्पादनासाठी माध्यम म्हणून गव्हाचे काड, सोयाबीन भुसा यांचा वापर करतात. उसाचे बॅगस नगर जिल्ह्यातून, गव्हाचे काड मध्य प्रदेश, सोयाबीन भुसा विदर्भ आणि मराठवाड्यातून आणतात. प्री वेटिंग प्रक्रिया - प्रथम हे सेंद्रिय घटक ओले करतात. बगॅस, गव्हाचे काड बारीक करून त्यात सोयाबीनची गुळी मिसळली जाते. सरासरी २० ते २२ टनाची एक बॅच असून, त्यात दीड टन जीप्सम व ६ ते ७ टन पोल्ट्री खत मिसळले जाते. या मिश्रणावर पुरेसे पाणी मारून मिश्रण दररोज वरखाली केले जाते. साधारणपणे ७ ते ८ दिवसांत ही प्रक्रिया संपते. 

पहिला टप्पा -
तिन्ही बाजूने साधारणतः सात फूट भिंती बांधलेल्या एक हौदामध्ये खालील बाजूने छिद्रे ठेवलेली आहेत. त्याद्वारे ब्लोअरने अधूनमधून हवा सोडली जाते. यामध्ये माध्यम रचून ठेवले जाते. हवा खेळती असल्यामुळे ते सडत नाही. दर ३ ते ४ दिवसांनी माध्यम पलटी केले जाते. ही प्रक्रिया आठ दिवस चालते. 

दुसरा टप्पा -
माध्यमातील हानिकारक सूक्ष्म जिवाणू नष्ट करण्यासाठी निर्जंतुकीकरण करतात. त्यानंतर निर्जंतुकीकरण खोलीमध्ये ७ ते ८ दिवस ठेवले जाते. 
या कालावधीत या रुममध्ये अधूनमधून ब्लोअरने हवा 
सोडली जाते.

तिसरा टप्पा (स्पॉनिंग) -
पुणे येथील प्रयोगशाळेतून खरेदी केलेले स्पॉन निर्जंतुकीकरण केलेल्या माध्यमामध्ये वजनाच्या एक टक्के प्रमाणात मिसळले जातात. स्पॉन मिसळलेले माध्यम नंतर १२ ते १५ किलो क्षमतेच्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरून तोंड बंद केले जाते. या बॅग क्रॉपिंग रुममध्ये १५ दिवस रॅकवर ठेवल्या जातात. या रुममध्ये सरासरी १६०० ते १७०० बॅग बसतात.

केसिंग
  १५ दिवसांनंतर पिशवीचे तोंड उघडून बेडच्या वरच्या भागावर केसिंग केले जाते. केसिंग म्हणजे कोकोपीट व मातीचे निर्जंतूक केलेल्या मिश्रणाचा एक इंचाचा थर बेडच्या पृष्ठभागावर देतात. केसिंग केल्यानंतर पुढील ७ दिवसांच्या कालावधीत खोलीचे तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस व आर्द्रता ८५ ते ९० टक्के ठेवली जाते. ७ दिवसानंतर पुढील ३ ते ४ दिवसात तापमान हळूहळू कमी करून ते १७ अंश सेल्सिअसवर आणले जाते. या कालावधीत साधारण १० ते १२ दिवसानंतर पिनिंग हेड स्टेज सुरू होते. पिनिंग हेड म्हणजे बेडच्या पृष्ठभागावर मशरुमच्या छोट्या छोट्या गोलाकार गुंड्या. पुढील ४ ते ५ दिवसात त्या काढणीयोग्य होतात. पहिल्या काढणीनंतर ४ ते ५ दिवसात दुसरी व दुसऱ्या काढणीनंतर ४ ते ५ दिवसात तिसरी काढणी केली जाते. पहिल्या काढणीनंतर उत्पादन कमी कमी होत जाते. १० किलो माध्यमापासून साधारणतः २ किलो मशरुमचे उत्पादन मिळते.

मागणी व पुरवठा 
हैदराबाद येथून बटन मशरुमला सुमारे १५ ते २० टन इतकी मागणी आहे. महाराष्ट्रात मुंबई शहराची रोज ८ ते १० टन, तर पुणे शहराची २ ते ३ टन बटन मशरुम मागणी आहे. 

उन्हाळ्यामध्ये, लग्नांचा हंगाम या काळात मागणीमध्ये वाढ होते. दक्षिण भारतामध्ये मशरुमला चांगली मागणी आहे. त्यामुळे प्रचंड संधी आहेत.     दहाड यांच्याकडून प्रति दिन ३०० ते ४०० किलो बटन मशरुमचे उत्पादन होते.

व्यवसायाचा ताळेबंद
मशरुम उत्पादनाचा खर्च  -
९० ते ९५ रु. प्रतिकिलो
पॅकेजिंग व वाहतुकीसह : 
१०० ते १०५ रु. प्रतिकिलो.
घाऊक विक्रीचा दर ः 
११५ रु. प्रतिकिलो.
खर्च वजा जाता ८ ते १० टक्के नफा शिल्लक राहतो. 

उलाढाल...
२०१७-१८ - २ कोटी
२०१८-१९ - २.७५ कोटी

- शैलेश दहाड, ८८५५०११७७१
- नीलेश दहाड, ९५२७२५२३१९
(लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Button Mushroom Production business