गाव आणि गावाची शेती विसरू नका...

chandrakant dalvi
chandrakant dalvi

 राज्याच्या ग्रामविकासाच्या चळवळीत तुमचे निढळ गाव एक आदर्श मॉडेल बनले. त्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतले...
माझे एकट्याचे कष्ट होते असे म्हणता येणार नाही. हे पूर्ण गावाचं श्रेय आहे. गाव सोडून मुंबईत स्थायिक झालेल्या एका पिढीचं, निढळसाठी पुन्हा शहरं सोडून गावात परतलेल्या युवकांचं ते श्रेय आहे. अर्थात, आदर्श गाव व्हावे म्हणून काही टार्गेट ठेवून आम्ही काम सुरू केलेलं नव्हतं. गांधीजींचं स्वयंपूर्ण गावाचं कसं साकारता येईल, हा वैचारिक धागा पकडून चाळीस वर्षांपूर्वी कामाला सुरवात झाली. सामूहिक शक्तीतून ग्रामविकासाचे प्रयोग आम्ही केले. त्याला गोड फळं आली. गावकरी, शेतकरी, तरुण, स्थलांतरित कुटुंबं, आमच्यासारखे नोकरदार, महिला, मुले असे आम्ही सर्व संघटित झालो. आम्ही कष्ट केले, सातत्य ठेवलं, ग्रामविकासाचं ध्येय ठेवलं म्हणून हे शक्य झालं. मागे वळून पाहिल्यास निढळमधील प्रयोग खरोखर थक्क करणारे ठरले. अस्पृश्यता निवारण, जलसंधारण, निर्मलग्राम, विमाग्राम, तंटामुक्त गाव, भूमी व जलसंवर्धनग्राम, इको व्हिलेज, शैक्षणिक चळवळीचं गाव, महिला विकास, फळबाग लागवड, सूक्ष्म सिंचन, दुग्धोत्पादन, जोडधंदे, अध्यात्मिक उपक्रम, दलितवस्ती विकास, सहकार, सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापन अशा अनेक बाबींमुळे निढळ गाव चर्चेत आले. निढळची यशोगाथा मला व्यक्तिशः कायम आनंद, प्रोत्साहन देणारी ठरली आहे. 

निढळ गाव आदर्श झाले. राज्याच्या इतर भागांत अशी गावे कशी तयार होतील?
तुमच्याकडे निर्धार असायला हवा. निर्धारामागे सामाजिक भावना हवी. त्यासाठी वाहून घेण्याची तुमची तयारी असेल, तर कोणत्याही गावाचं रूप पालटू शकते. गांधीजींनी १९३६ ‘खेड्याकडे चला’ असा संदेश शहरवासीयांना दिला होता. खेड्यात जाऊन तुम्ही खेड्यांच्या विकासात योगदान द्या, असे त्यांना म्हणायचे होते. निढळमध्ये आम्ही हाच संदेश केंद्रस्थानी ठेवून काम केलं. निढळ गावातून नोकरीनिमित्त स्थलांतरित झालेल्या तरुणांनी १९८३ मध्ये एकत्र येऊन निढळ नोकरदार वर्ग व व्यावसायिक संघटना काढली. माझ्यासहित एकूण ७५० जण गावाबाहेर पडलेलो होतो. आम्ही सर्वांनी मिळून पुन्हा गावासाठी काम करण्याचं ठरवलं. मुंबईत संघटनेच्या बैठका घेत राहिलो. लोकवर्गणी काढली. गावातील विविध कामांची यादी तयार केली. त्यासाठी समित्या स्थापन केल्या. गावातील कामांचा नियमित आढावा घेतला जात होता. प्रत्येक दिवाळीला गावात नोकरदार संघटनेची बैठक होते. पुढील वर्षाचा अजेंडा त्यात ठरतो. ठरलेली कामं पूर्ण होण्यासाठी सगळेजण जबाबदारीने काम करतात. मी स्वतः दर शनिवार, रविवार गावात जावून काम करत होतो. गावाबाहेर गेलेली सर्व मंडळी फोनवर एकमेकांच्या संपर्कात राहून गावातील प्रत्येक कामाबाबत जागरूक असतात. त्यामुळे ऐन दुष्काळात गाव जलसमृद्ध झाले. शेती-जोडधंद्यात भरभराट झाली. स्थलांतरित झालेल्यांपैकी तीनशे जण पुन्हा गावात राहायला आले. इतर गावांमध्येही अशा प्रकारचे काम होऊ शकतं. 

विकासासाठी गावांमधून शहरांकडे स्थलांतर होत आहे... 
समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते उपकारक नाही. ग्रामीण महाराष्ट्राचा विकास मुळात शेतीविकासाशी निगडित आहे. त्यासाठी गावात माणसं हवीत, शेतकरी हवेत, तरुण हवेत. आजचा तरुण शेतकरी शहरापेक्षा गावात विविध उपक्रम राबवून सुखी होऊ शकतो. एक आहे की प्रथम संघर्ष करावा लागेल. मात्र गावांमध्येच राहून विकास साधणारी हजारो मुले आहेत. आजच्या तरुण पिढीवर माझा कमालीचा विश्वास आहे. शेती क्षेत्रात अनेक समस्या असल्या तरी त्यात बदल घडवून आणण्याची हिंमत याच तरुणांच्या मनगटात आहे. त्यामुळे गावामध्ये आश्वासक वातावरण तयार करणे ही गावातील प्रत्येकाची जबाबदारी असायला हवी. गावाचा विकास हा केवळ ग्रामपंचायतीची जबाबदारी नसून, मी देखील गावाचा देणेकरी लागतो, अशी भूमिका सर्वांनी ठेवायला हवी. गावचा विकास होताना दिसले, की आपोआप स्थलांतर थांबते. उलट, शहरात गेलेले देखील गावात राहायला येतात. 

विकासासाठी गावाने निश्चित काय करावे?
आधी संकल्प करावा लागेल. गावासाठी श्रम करण्याचा. गावात नेमके काय करायचे आहे याची प्रथम यादी करावी. त्यात दीर्घकालीन आणि अल्पकालीन कामे अशी वर्गवारी करावी. या कामांसाठी केंद्र, राज्य, जिल्हा परिषद अशा कोणत्या फंडातून मदत मिळेल ते पाहावे. ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून कोणती कामे करता येतील ते देखील पाहावे. ही कामे कशी मंजूर करून घेता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील. काही कामांसाठी अगदी पाच-पाच वर्षे पाठपुरावा करावा लागेल. लोकसहभागातून, लोकवर्गणीतून कोणती कामे सुरू करता येतील ते पाहून तेथे आधी भर द्यावा. लोकसहभाग हा खूप महत्त्वाचा आहे. त्याशिवाय गावातील कामे लोकांना आपलीशी वाटत नाहीत. त्यामुळेच श्रमदानातून झालेली कामे गावकऱ्यांच्या कायम लक्षात राहतात. श्रमदानात अहं गळून पडतो आणि गावात मनोमिलन होते. त्यातून पुढे दोन टप्प्यांमध्ये गावाचा विकासाचा करणे शक्य होते. 

ग्रामविकासाच्या दोन टप्प्यांचा उल्लेख तुम्ही करत आहात, ते थोडे स्पष्ट करा ना. 
कोणत्याही गावाचा विकास हा दोन टप्प्यांतच होतो. एक टप्पा हा भौतिक सुविधांचा असतो. मग त्यात रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, शैक्षणिक सुविधा, आरोग्य, व्यायामशाळा, वाचनालय, सामाजिक केंद्र अशी सर्व कामे करावी लागतात. या भौतिक साधनांमुळे गावाला एक परिपूर्णता येते. शहराची आठवण तुम्हाला त्याच वेळी येते की जेव्हा गावात या साधनाची उणिव भासते. त्यामुळे ही भौतिक विकासाची कामे टप्प्याटप्याने पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. दुसरा टप्पा मी सांगतोय तो शेतीविकासाचा. कारण ग्रामविकास हा पूर्णतः आर्थिक विकासाशी निगडित असून, शेतीचा विकास झाल्याशिवाय आर्थिक विकास शक्य नाही असे मी मानतो. शेतीविकासासाठी सिंचनाच्या सुविधा तयार करण्यासाठी सर्वाधिक लक्ष देण्याची गरज आहे. अवर्षणप्रवण भागातील गावाने अशा वेळी पाणलोट व्यवस्थापन, जलसंवर्धन, मृद्संधवर्धन, जलयुक्तशिवार, लघुपाटबंधारे, सिमेंटबांध, मातीनालाबांध अशी उपचाराची कामे प्राधान्याने करावीत. कारण जलसंधारणाशिवाय अशा गावांची पाण्याची समस्या सुटू शकत नाही. त्यामुळे पाणी उपलब्ध करून घेण्यासाठी गावाने प्राधान्य द्यावे. उपलब्ध पाण्यानुसार शेती व्यवस्थापनात बदल, पिकांमधील बदल, आधुनिक तंत्र असलेल्या पद्धतीचा वापर असे सर्व करावे लागेल. ही कामे सामूहिकपणे झाल्यास गावाचा विकास झपाट्याने होतो. गावात छोटया शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली की स्थलांतराची गरज उरत नाही. 

 निढळ गावातील पुढील कामाची दिशा कोणती?
विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आम्ही भविष्यात शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या विकासावर जास्त काम करणार आहोत. निढळ गावाच्या आसपास असलेल्या २२५ हेक्टर वनजमिनीचा विकास हा देखील आमच्या कामाचा महत्त्वाचा टप्पा राहील. याशिवाय निढळच्या पंचक्रोशीत आठ-दहा गावे आहेत. तिथे ग्रामविकासासाठी लोकसहभागातून सुरू होत असलेल्या उपक्रमांना दिशा देण्याचे काम मी करणार आहे. शक्य झाल्यास राज्यव्यापी कामासाठी एखाद्या उपक्रमाची किंवा संस्थेची बांधणी करता येईल का याचीही चाचपणी करणार आहे. 

 शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल?
सारे जग पादाक्रांत करा पण गावाला विसरू नका, असेच मी म्हणेन. मी शेतकरी कुटुंबातूनच शिकून पुढे आलो. सांगलीत प्रोबेशनवर डेप्युटी कलेक्टर म्हणून मी कामाला सुरवात केली. त्यानंतर विविध पदे सांभाळत विभागीय आयुक्तपदापर्यंत आलो तरी गावाला मी विसरलो नाही. जे सामाजिक दायित्व आहे ते पार पाडत आलो. राज्याच्या शेतीकडे बघण्याचा उच्चशिक्षित तरुणांचा दृष्टिकोन बदलतो आहे आणि त्यांना विविध प्रयोग करण्याची आस लागून आहे हे मला खूप समाधान देते. कारण याच उच्चशिक्षित तरुणांकडून भविष्याच्या शेतीत मोठे बदल होणार आहेत. गावातील शेतकरी आता अडाणी राहिलेला नाही. शेतकरी अतिशय उत्साहाने एकत्र येतात, माहिती घेतात, मेळावे, चर्चासत्र, व्याख्याने यात सहभागी होतात. सहली काढतात. विविधांगी व प्रयोगशील शेतीला भेटी देऊन त्यातील नवे तंत्र आपल्या शेतीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्वांत आघाडीवर आहे ती शेतकऱ्यांची नवी पिढी. नोकऱ्यांना मर्यादा आहेत. व्यवसायात गुंतवणुकीचा प्रश्न आहे. अशावेळी आपल्या गावाच्या शेतीतच अल्पभांडवलाची, मेहनत आणि तंत्राची जोड असलेली शेती करून विकास साधण्याची संधी तरुणांकडे आहे. मी उच्चशिक्षण घेऊ नका किंवा शहरात नोकरी करू नका, असे म्हणणार नाही. गरजेनुसार जे शक्य आहे ते करावेच लागते. मात्र कुठेही गेला तरी गाव आणि गावची शेती विसरू नका इतके मी जरूर सांगेन. 
  : ९८२२२२१६००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com