रसायनमुक्त भाजीपाला उत्पादन, निर्यात क्लस्टर उभारा - आढळराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 July 2019

आध्यात्मिक व आरोग्य पर्यटनासाठी निसर्गोपचार केंद्र उभारा 
ग्रामीण भागातील पर्यटन संधीदेखील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी फायद्याचे आहे. यासाठी राज्य शासनाने जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुक्याचा दर्जा दिलेला आहे. शेती बरोबरच निसर्ग, आध्यात्मिक आणि आरोग्य पर्यटनासाठीदेखील चालना देणे गरजेचे आहे. आंबेगाव तालुका हा आदिवासीबहुल क्षेत्र असून, या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर हे एक देवस्थान असून, हा परिसर संरक्षित अभयारण्यात आहे. यामुळे या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक, शिवभक्त येत असतात. पर्यटकांची संख्या लक्षात घेता, या परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारणे उचित ठरेल. तरी भीमाशंकर परिसरात आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून निसर्गोपचार केंद्र उभारण्याची शिफारस आपण करावी, अशीदेखील मागणी करण्यात आली आहे.

पुणे - राष्ट्रीय कृषी उच्चाधिकारी समितीने रसायनमुक्त शेतीमाल उत्पादन आणि निर्यातीसाठी जुन्नर किंवा भीमाशंकर येथे विशेष क्लस्टर उभारण्याची शिफारस निती आयोगाला करावी, अशी मागणी माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उच्चाधिकार समितीचे निमंत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

देशाच्या कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवण्यासाठी निती आयोगाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय उच्चाधिकार समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये ६ विविध राज्यांच्‍या मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची नियुक्ती केली आहे. ही समिती देशातील कृषी, पणन, पशुसंवर्धन आणि निर्यात क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना सुचवणार आहे.

यामुळे या समितीने उत्तर पुणे जिल्ह्यात रसायनमुक्त शेतीमाल उत्पादन आणि निर्यातीसाठी विशेष क्लस्टर उभारण्याची मागणी आढळराव पाटील यांनी केली आहे. या मागणीबाबत लिहिलेल्या पत्रामध्ये आढळराव यांनी म्हटले आहे की, ‘‘महाराष्ट्रातील शेतीप्रधान असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्याचे मी प्रतिनिधित्व करत आहे. यामध्ये जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर या शेतीप्रधान तालुक्यांचा समावेश आहे. हा प्रदेश निसर्ग आणि शेतीसमृद्ध असून, शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून निर्यातक्षम फळे भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे. या प्रदेशातील बहुतांश भाजीपाला हा मुंबईसह देशाच्या विविध भागांत पाठविला जात आहे. यामुळे या परिसरातील शेतीमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी क्लस्टर उभारणे आवश्‍यक आहे.

‘हे क्लस्टर तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील फ्लोरिकल्चर पार्कच्या धर्तीवर ‘रसायनमुक्त भाजीपाला उत्पादन आणि निर्यातीसाठी प्रोत्साहन देणारे असावे. शेतीतील वाढत्या रसायनांच्या वापरामुळे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम दिसू लागले आहेत. यामुळे देशांर्गत आणि परदेशांतून रसायनमुक्त भाजीपाल्याची मागणी वाढत आहे. बाजारपेठेची ही गरज आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकारण्यासाठी क्लस्टरची नितांत गरज आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून तशी शिफारस आपण आपल्या समिती अहवालात करावी,’’ अशी विनंतीदेखील करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chemical Free Vegetable Production Export Cluster Shivajirao Adhalrao Patil