एलीईडी बल्बच्या सहाय्याने शेवंतीच्या फुलांचे उत्पादन

बाळासाहेब गणे
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

तुंग - आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती फायदेशीर बनवता येते. बिगर हंगामात शेवंतीच्या फुलांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी तुंग (ता. मिरज) येथील विकास नलवडे या युवकाने चक्क एलीईडी बल्बच्या सहाय्याने फुलशेतीसाठी रात्रीचा दिवस बनवला आहे.

तुंग - आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती फायदेशीर बनवता येते. बिगर हंगामात शेवंतीच्या फुलांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी तुंग (ता. मिरज) येथील विकास नलवडे या युवकाने चक्क एलीईडी बल्बच्या सहाय्याने फुलशेतीसाठी रात्रीचा दिवस बनवला आहे.

ते गतवर्षीपासून शेवंतीच्या फुलशेतीत नवीन प्रयोग करीत होते. यावर्षी त्यांना यश आले. आठ महिन्यांत विक्रीसाठी तयार होणाऱ्या शेवंतीच्या एक एकर शेतीतून सहा लाखांचे उत्पन्न घेतले आहे. फुलशेतीचा हा प्रयोग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पथदर्शक बनला आहे. सांगली-आष्टा मार्गावर तुंग येथे यशवंतराव चव्हाण सूत गिरणीजवळ ३०० बल्बचा प्रकाश कशासाठी हे कुतूहलाने पाहतात.

शेवंती फुलाचा हंगाम मार्च, एप्रिल, मे महिन्यात असतो. या काळात दिवस मोठा व रात्र लहान असते. उत्पादनही चांगले घेता येते. बिगरहंगामी फुल शेतीसाठी प्रामुख्याने स्वच्छ सूर्यप्रकाश मिळावा लागतो. नलवडे यांनी शेवंतीची लागवड बिगरहंगामात केल्याने सूर्यप्रकाशाची अडचण होती. त्यावर मात करताना त्यांनी ३०० एल.ई.डी. बल्बचा वापर करून रात्रीचा दिवस बनवला. आणि बिगरहंगामातही फुलशेती फुलवली. त्यांनी शेवंती फुलण्यासाठी ३०० एल.ई.डी. बल्बचा वापर केला आहे. 

मूलतः हा प्रयोग जर्मनी देशात केला जातो. दक्षिण भारतातही प्रयोग यशस्वीपणे राबवला आहे. तुंग येथील विकास हायटेक नर्सरीच्या विकास नलवडे यांनी कृत्रिम वीजेवर शेतीची माहिती घेतली. गेल्यावर्षी त्यांनी काहींना सोबत घेऊन प्रयोग राबवला. तो यशस्वी झाल्यानंतर १५ एकरावर एल.ई.डी.च्या प्रकाशाचा वापर करीत फुलशेती फुलवली. सध्या सहा प्रकारच्या शेवंतीचे उत्पादन घेतले आहे. १२ प्रकारच्या फुलांच्या रोपांचीही लागवड केली आहे. 

सहा रंगी शेवंती 
झेंडूला पर्याय म्हणून शेवंतीकडे पाहिले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फुलशेती फुलवली आहे. मुंबई, पुणे, हैदराबाद येथे फुलांना मार्केट आहे. तुंगमध्ये तीन तर कवलापूर येथे सहा रंगाची शेवंती फुले बहरली अाहेत.

शेतीतील नवनवीन संशोधन शोधत प्रयोगशील शेती करताना झेंडूला पर्याय म्हणून शेवंती शेतीकडे वळलो. जिल्ह्यासह महाराष्ट्रात आज याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
- विकास नलवडे, 
शेवंती फूलशेती उत्पादक  व मार्गदर्शक

 रोपे ः एकरी १२ हजार 
 बल्ब ः एकरी ३००
 वीजबिल खर्च ः एकरी ३ हजार 
 शेती खर्च ः एकरी सव्वा लाख
 उत्पन्न ः एकरी ६ लाख
 कालावधी ः आठ महिने
 खर्च वजा उत्पन्न ः ४ ते ४ लाख ५० हजार 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chrysanthemus indicum grow in LED Bulb