युगांडाची `क्लायमेट स्मार्ट` शेती

डॉ. निलेश हेडा
रविवार, 13 मे 2018

आफ्रिकेबद्दल आपल्या प्रत्येकालाच प्रचंड कुतूहल असतं. मानव जातीचा उगमच आफ्रिकेत झालेला आहे. त्यामुळे आफ्रिकेबद्दल उत्सुकता असतेच. नेदरलॅंडमधील वाखनिनन विद्यापीठ आणि आफ्रिकेतील युगांडामधील मेकेरेरे विद्यापीठ यांनी आयोजित केलेल्या `वातावरणातील बदल आणि शेती आणि इतर नैसर्गिक संसाधनात करावयाचं अनुकुलन` या विषयावरच्या एका लघू अभ्यासक्रमाला जाण्याचा योग आला. या अभ्यासक्रमात तज्ज्ञांच्या सादरीकरणाबरोबरच नाईल नदी बघणे, शेतकऱ्यांचे, पशुपालकांचे, मासेमारांचे प्रयोग समजून घेण्याची संधी मिळाली. 

आफ्रिकेबद्दल आपल्या प्रत्येकालाच प्रचंड कुतूहल असतं. मानव जातीचा उगमच आफ्रिकेत झालेला आहे. त्यामुळे आफ्रिकेबद्दल उत्सुकता असतेच. नेदरलॅंडमधील वाखनिनन विद्यापीठ आणि आफ्रिकेतील युगांडामधील मेकेरेरे विद्यापीठ यांनी आयोजित केलेल्या `वातावरणातील बदल आणि शेती आणि इतर नैसर्गिक संसाधनात करावयाचं अनुकुलन` या विषयावरच्या एका लघू अभ्यासक्रमाला जाण्याचा योग आला. या अभ्यासक्रमात तज्ज्ञांच्या सादरीकरणाबरोबरच नाईल नदी बघणे, शेतकऱ्यांचे, पशुपालकांचे, मासेमारांचे प्रयोग समजून घेण्याची संधी मिळाली. 

जागतिक तापमान वाढीमुळे वातावरणातील बदल आणि त्याचा शेती व अन्य नैसर्गिक संसाधनांवर होत असलेला अनिष्ट परिणाम हा जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. खास करून आशिया आणि आफ्रिका खंडावर त्याचा फार मोठा परिणाम होत आहे. भारतातील मॉन्सूनचा स्वभाव बदलणे, टोकाच्या हवामान निगडित घटनांमध्ये वाढ होणे, उष्णता लहरींची निर्मिती, दुष्काळ अशा घटनांचं प्रमाण वाढत चाललं आहे. आफ्रिका खंडातील देशांनाही मोठा फटका बसत आहे.

विषुववृत्तावर आफ्रिका खंडाच्या पूर्वेस वसलेला युगांडा हा देश पूर्वेकडून केनिया, उत्तरेकडून दक्षिण सुदान, पश्चिमेकडून कोंगो, दक्षिणेकडून तांझानीया आणि नैऋत्येकडून रवांडा देशाने वेढलेला आहे. देशाचा बहुतांश भाग हा नाईल नदीच्या खो-यात मोडतो. तसेच जगातील सर्वात मोठे विषववृत्तीय गोड्या पाण्याच्या सरोवराची (विक्टोरिया लेक) नैसर्गिक देण या देशाला मिळाली आहे.  

युगांडाच्या एंटेबे विमानतळावर दुपारी पोचलो आणि जोरदार पावसाने स्वागत केले. विमानतळावरून सुमारे ५० किमी अंतरावर युगांडाची राजधानी कंपाला शहराकडे निघालो. सभोवती सगळीकडे शेतीचा प्रदेश. जागोजागी मका, कॉफी, केळी, आलू, रताळूचे छोटे छोटे मळे फुलले होते. विदर्भातल्या एप्रिल महिन्याच्या कडक उन्हातून पोचल्याने युगांडाचा गारवा सुखावत होता. दुसऱ्या दिवशी लघू अभ्यासक्रम सुरू झाला. दोन दिवस शेतकऱ्यांना भेटायचं ठरलं. स्थानिक मेकेरेरे विद्यापीठ स्थानिक शेतकऱ्यांबरोबर बदलत्या पर्यावरणात शेती कशी टिकवायची, या विषयावर काम करते. त्यांच्या कार्यक्षेत्रात क्षेत्रभेट करण्याचं ठरलं.

कंपाला पासून १४० किमी अंतरावर वसलेलं मसाका हे जिल्ह्याचं ठिकाण. हा प्रामुख्याने शेतीचा जिल्हा. पहिल्या दिवशी आमचा मुक्काम हाजी नावाच्या शेतकऱ्याच्या शेतीवर होता. हाजी हे युगांडन मुस्लिम. मक्केची वारी करून आलेले. तुलनेने थोडेसे सधन आणि सुशिक्षित शेतकरी. त्यांचं संपूर्ण कुटुंबच शेतीत वसलेलं. त्यांना तीन बायका, डझनभर पोरं. सगळे शेतीत जबाबदारीने काम करणारे. प्रत्येकाच्या कुवतीनुसार कामाची वाटणी केलेली. हाजी साहेबांच्या शेतीची दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे नगदी पिके व इतर पिकांचा त्यांनी साधलेला ताळमेळ आणि शेतामध्ये जपलेली विविधता. शेतामध्ये पिकणाऱ्या गोष्टी ह्या प्रथमत: शेतकऱ्याच्या कुटूंबाला चाखता यायला हव्यात जेणे करून अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि सकस असं अन्न कुटूंबाला मिळेल हा हाजी साहेबांचा दृष्टिकोन महत्त्वाचा वाटला. त्या अनुषंगाने सर्व हंगामी भाज्या, फळे, दुध, अंडी, मांसाकरिता जनावरांची रेलचेल हाजी यांच्या शेतात होती. नगदी पिकातही अगदी निकटगामी आणि दूरगामी असे दोन प्रकार दिसले. दूरगामी फायदा आणि शेतीला तीव्र हवेचा फटका बसू नये म्हणून एका एकरात निलगिरीची लागवड केलेली होती. युगांडामध्ये विजेच्या पोल करिता लोखंडाऐवजी निलगिरीचे पोल वापरतात. त्यामुळे साधारणत: ७ ते १० वर्षांत शेतकऱ्यांना एकरकमी पैसे मिळतात. निकटगामी नगदी पिकांत कॉफी आणि पॅशनफ्रुटचा समावेश होतो.  युगांडातली कॉफी ही अत्यंत चांगल्या दर्जाची समजल्या जाते. त्यामुळे तिला युरोपात बरीच मागणी आहे. कॉफीचे दोन वाण युगांडात प्रचलित आहेत, रोबुस्टा आणि अरेबिका. अरेबिका कॉफी ही मका, केळी, डाळवर्गिय पिकात मिश्र पीक म्हणून घेतात जेणे करून मिश्र पिकातून गळणाऱ्या पाला पाचोळ्याचं खतं कॉफीसाठी मिळतं. पॅशनफ्रुट हे आंबट चवीचं फळ संपूर्ण युगांडात आवडीने खाल्लं जातं आणि युरोपियन राष्ट्रात त्याची मोठी निर्यातसुद्धा केली जाते. 

युगांडाच्या काही भागात नगदी पीक म्हणून चहा, कापूस आणि तंबाकू सुद्धा लावल्या जाते. केळी हा युगांडन लोकांचा विक पॉइंट. रस्ताच्या कडेला विक्रीकरिता ठेवलेले कच्च्या केळीचे घड बघणे हा आनंददायी अनुभव असतो. वाफवलेल्या केळीचे पदार्थ जेवणाचा अविभाज्य भाग असतो. प्रत्येक घराच्या परसबागेत केळीची झाडं अवश्य बघायला मिळतात. हाजी साहेबांच्या शेतात इतर पिकांमध्ये टोमॅटो, वांगे, विविध प्रकारची डाळवर्गिय पिके, मका, कोबी, मिरची बहरलेली होती. “घरच्या खाद्यानांच्या गरजा भागवून माझ्या शेतातून मला दररोज काही तरी नगदी रक्कम मिळावी हा माझा उद्देश असतो,” हाजी साहेब म्हणाले. पाळीव जनावरांची युगांडात रेलचेल आढळते. सुमारे ९५ टक्के पाळीव जनावरांचे पालन छोटे आणि सीमांत शेतकरी करतात.

दुसऱ्या दिवशी मसाका शहरापासून ३५ किलो मीटरवर अगदी डोंगर-दऱ्याच्या आत एका स्थानिक आदिवासी गावात होतो. आम्ही पोहोचलो तेव्हा गावकरी एकत्र येऊन आंब्याच्या एका विशाल झाडाखाली बसले होते. आंब्याचं झाड हिरव्या कैऱ्यांनी बहरलं होतं. बैठकीत स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता. युगांडन शेतीत स्त्रियांची भूमिका मध्यवर्ती असते. बैठकीला आलेले सगळे जण सहकारी संस्थेचे सभासद होते. युगांडात शेतकरी सहकारी चळवळ प्रभावीपणे काम करते. डेविड गोर्डन या इंग्रज अधिकाऱ्याने १९५० ते युगांडा ब्रिटिशांपासून स्वतंत्र होईपर्यंत म्हणजे १९६२ पर्यंत सहकारी चळवळ मजबूत होण्यासाठी बरीच मेहनत घेतली होती. मात्र सत्तरच्या दशकात सहकारी चळवळ मोडकळीस आली. सध्या अगनेज अपीन अपिआ या सामाजिक कार्यकर्तीने युगांडात महिलांच्या सहकार क्षेत्राला बरीच मजबुती दिली आहे. 

गेल्या काही वर्षांपासून या परिसरात पाण्याची कमतरता जाणवायला लागली आहे. त्यामुळे मेकेरेरे विद्यापीठांच्या तज्ज्ञांसोबत प्रत्येक शेतात जलसंधारणाचं काम चोखपणे केलं. प्रत्येक घराच्या छतावरचं पाणी प्लॅस्टिकने आच्छादीत केलेल्या मोठ्या शेततळ्यात गोळा होतं. गप्पा सुरू झाल्या. गेल्या काही वर्षांमध्ये निसर्ग चक्रात बराच फेरबदल झाल्याची मांडणी प्रत्येक जण करत होता. एप्रिल आणि मे महिन्यात युगांडामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. (सुमारे ६०० ते ८०० मिमी पाऊस या दोनच महिन्यांत कोसळतो.) मात्र भारताप्रमाणेच तिथेही आता दोन पावसांमधलं अंतर वाढलेलं आहे. नवीन बुरशी, कीटकांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अशा बदलत्या परिस्थितीत स्थानिक लोकांनी जलसंधारणाची कामे करणे, दुष्काळ प्रतिबंधक वाण वापरणे, शेतीला जोडधंद्यांची जोड देणे, पाळीव प्राण्यांची जोड देणे अशी अनेक जुळवणुकीची पावलं उचलली आहेत. चर्चेनंतर एका शेतकरी महिलेने तिचं शेत दाखवायला नेलं. शेतात सगळीकडे विविधता खुणावत होती. कसावा आणि रताळू हे दोन कंद आंतरपीक म्हणून जागोजागी लावले होते. शेतीच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचा उपयोग करण्यात आला होता. शेताच्या मध्ये छोट्याश्या तुकड्यावर घरच्या घरी खाण्यापुरता ऊस बहरला होता. तिने लगेच उसाचे काही धांडे आमच्यासाठी तोडून आनले. बांधावरच खात बसलो. ऊस खाता खाता मनात विचार येत होते की, शेतात जपलेली विविधता, शेती हे छोटं पाणलोट क्षेत्र मानून केलेलं जलसंधारण आणि शेतीला जोड धंद्यांची दिलेली साथ या तीन गोष्टी बदलत्या पर्यावरणाच्या काळात शेतकऱ्याला तारणार आहेत. त्या दृष्टीने धोरणात्मक पातळीवर तसेच शेतकऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे.     

जागतिक तापमान वाढीमुळे वातावरणातील बदल आणि त्याचा शेती व अन्य नैसर्गिक संसाधनांवर होत असलेला अनिष्ट परिणाम हा जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. खास करून आशिया आणि आफ्रिका खंडावर त्याचा फार मोठा परिणाम होत आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी युगांडातील शेतकऱ्यांनी निवडलेला मार्ग अनुकरणीय आहे. शेतात जपलेली विविधता, शेती हे छोटं पाणलोट क्षेत्र मानून केलेलं जलसंधारण आणि शेतीला जोड धंद्यांची दिलेली साथ या तीन गोष्टी बदलत्या पर्यावरणाच्या काळात शेतकऱ्याला तारणार आहेत, याची जाणीव युगांडीतील शेतकऱ्यांचे प्रयोग बघून पक्की झाली.

लेखक परिसरशास्त्र (इकॉलॉजी) या विषयातील तज्ज्ञ असून रॉकफेलर फाउंडेशनचे फेलो आहेत. 
 ९७६५२७०६६६ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Climate Smart Farming