हस्तकलेतून सुरू झाला पूरक उद्योग

हस्तकलेतून सुरू झाला पूरक उद्योग

मिरज (जि. सांगली) येथील दिंडीवेस भागामध्ये सौ. छाया दळवी रहातात. कामाची आवड असेल तर यश नक्की मिळते हे लक्षात घेऊन छायाताईंनी त्यांच्या नातेवाईक सौ. सुजाता चौगुले यांच्याकडून हस्तकलेतून विविध वस्तूंच्या निर्मितीबाबत माहिती घेतली. भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालय कार्यालयाच्या मार्फत हस्तकलेचे प्रशिक्षण दिले जाते. या विभागाकडून माहिती घेऊन सन १९९९च्या दरम्यान छायाताईंनी मिरज येथे हस्तकला प्रशिक्षण वर्गासाठी प्रवेश घेतला. यामध्ये त्यांनी बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच छायाताईंनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन आकाश कंदील बनविण्यास सुरवात केली. मुळात हस्तकला तशी अवघड, पण सराव केला तर विविध वस्तू तयार करणे सोपे जाते. प्रशिक्षण घेत असताना छायाताईंनी घरीदेखील बांबूच्या वस्तू बनविण्याचा सराव केला. प्रारंभी स्वतः शिल्लक ठेवलेल्या रकमेतून बांबूपासून वस्तू बनविण्यासाठी गुंतवणूक केली. पहिल्यांदा बांबूपासून १०० आकाशकंदील तयार केले. या आकाशकंदिलांची विक्री मिरज शहरामध्ये केली. ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. आकाशकंदिलांची मागणी वाढल्याने त्यांना विविध वस्तू तयार करण्यासाठी मदतीची गरज भासू लागली. या पूरक उद्योगासाठी बचत गट स्थापन केला तर नक्कीच उद्योगाच्या वाढीला चालना मिळेल असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे छायाताईंनी बचत गटाची माहिती घेण्यास सुरवात केली.

महिला बचत गटाची स्थापना
मिरज शहरात अगोदरपासून महिला बचत गट कार्यरत होते. हे बचत गट महापालिकेशी सलग्न आहेत. त्यामुळे छायाताईंनी मिरज महापालिकेच्या सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेतील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर छायाताईंनी २००५ साली रणझुंजार महिला बचत गटाची स्थापना केली. सुरवातीला महिलांनी प्रतिमहिना ३० रुपये, त्यानंतर ५० रुपये आणि गेल्या तीन वर्षांपासून १०० रुपये अशी बचत सुरू केली. सध्या गटाच्या अध्यक्ष म्हणून सौ. छाया दळवी, तर सचिव सौ. लता दळवी काम पाहतात. कु. उज्ज्वला माने, सौ. भाग्यश्री माने, श्रीमती वैशाली भोसले, सौ. अस्मिता जाधव, श्रीमती प्रभावती पवार, सौ. कल्पना करनुरे, सौ. राजश्री पवार या बचत गटाच्या सदस्या आहेत.

छायाताईंनी गट स्थापन केला, परंतु गटातील महिलांना बांबू कारागिरीचे प्रशिक्षण देणे गरजेचे होते. त्यासाठी सौ. दळवी यांनी स्वतःच्या घरी दररोज महिलांना बांबू कारागिरी संदर्भात प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली. प्रशिक्षण सुरू असताना साहित्य खराब झाले तरी चालेल, परंतु गुणवत्तेशी तडजोड कधीच केली नाही.

भांडवलाची उभारणी 
हळूहळू बाजारपेठेत बांबूपासून तयार केलेला आकाशकंदील आणि इतर वस्तूंची मागणी वाढू लागली. त्यामुळे कच्चा माल खरेदी करण्यासाठी आर्थिक निकड भासू लागली. त्यामुळे गटासमोर कर्ज घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे महापालिकेच्या सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेतील व्यवस्थापक सौ. ज्योती सरवदे, समूह संघटिका शाहीन शेख यांचे छायाताईंनी मार्गदर्शन घेतले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार गटाला बॅंकेकडून कर्ज मिळवण्यास मदत केली. सुरवातीच्या टप्प्यात गटाने दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यातून व्यवसाय वाढवला. सन २०१५ मध्ये पुन्हा अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले. बचत गटाने त्याचीही परतफेड केली, त्यामुळे बॅंकेत गटाची पत वाढली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बांबूची खरेदी  
 महिला बचत गटातर्फे कलाकुसरीसाठी बांबूची खरेदी ही मिरजेतील बाजारपेठेतून केली जायची; पण बांबूचे वाढते दर आणि वेळेवर चांगल्या गुणवत्तेचे बांबू मिळत नसल्याने बचत गटाने सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील बाजारपेठेतून चांगल्या गुणवत्तेचे बांबू खरेदी करण्यास सुरवात केली. बचत गटाला सावंतवाडीमधून १२ फूटांचा एक बांबू ३० रुपयांना मिळतो. बचत गटातर्फे वर्षाला ५०० बांबूंची खरेदी केली जाते. आकाशकंदिलासाठी लागणारे रंगीबेरंगी कापड, धाग्यांची खरेदी सांगली बाजारपेठेतून केली जाते.  या उद्योगातून गटातील महिलांच्या संसाराला चांगला आर्थिक हातभार लागला आहे. 

असे आहे बचत गटाचे नियोजन
आकाशकंदील निर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्याची डिसेंबरमध्ये खरेदी.
 जानेवारीपासून विविध आकाराच्या आकाशकंदिलाची निर्मिती.  
 गणपतीनंतर नाताळ सणामध्ये सजावटीसाठी लागणाऱ्या झोपड्यांची निर्मिती.
 व्यवसायातून मिळणाऱ्या रकमेतून वस्तू तयार करण्यासाठी झालेला खर्च बाजूला काढला जातो.
 मिळालेल्या नफ्याचे समान वाटप.
 पैशांची गरज पडल्यास सदस्यांकडून आर्थिक नियोजन. 
 बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू बनविण्यासाठी प्रशिक्षणाचे नियोजन.
  तयार केलेल्या वस्तू इतर राज्यात विक्रीसाठी गटाचे प्रयत्न.

प्रत्येक सदस्याला मिळाला रोजगार
बांबूपासून आकाशकंदील निर्मितीबाबत सौ. छाया दळवी म्हणाल्या, की माझ्या घरी पहिल्यापासून आकाशकंदील तयार केले जायचे. परंतु मागणी वाढल्याने जागा कमी पडू लागली. त्यामुळे गटातील प्रत्येक सदस्यांना काम विभागून दिले. यामुळे नियोजन करणे सोपे झाले. सकाळी ११ ते ५ या वेळेत बचत गटातील सर्व सदस्य आकाशकंदील तयार करण्यास बसले, तर पंचवीस आकाशकंदील तयार होतात. आकाशकंदील निर्मिती हे कलाकुसरीचे काम आहे, पण निर्मितीमध्ये सातत्य ठेवल्याने आकाशकंदील बनविण्याचे काम आम्हाला सोपे वाटू लागले आहे.

बाजारपेठेबाबत गटाच्या सचिव सौ. लता दळवी म्हणाल्या, की सध्या आम्ही आकाशकंदील आणि लहान शोभेच्या झोपड्यांच्या विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठेचा विचार केला नाही. मिरज येथील ओळखीचे विक्रेते आमच्याकडून आकाशकंदील, झोपडीची खरेदी करतात. या उत्पादनांची विक्री मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, आणि गोव्यातील बाजारपेठांत करतात. दिवाळीच्या दरम्यान विविध आकार आणि डिझाइनच्या सुमारे एक हजार आकाशकंदिलाची आम्ही निर्मिती आणि विक्री करतो. नाताळच्या काळात गोवा बाजारपेठेत ३०० झोपड्यांची विक्री होते. बचत गटातर्फे चार प्रकारच्या आकाशकंदिलांची निर्मिती केली जाते. साधारणपणे आकार आणि डिझाइननुसार ७५ रुपये, १२५ रुपये, १५० रुपये, ३०० रुपये असा दर ठेवलेला आहे. तसेच झोपडीच्या आकारानुसार ८० रुपये, १०० रुपये, १५० रुपये असा दर ठरविला आहे. बांबू कलाकुसरीतून बचत गटाची वर्षाला तीन लाखांची उलाढाल होते. खर्च वजा जाऊन त्यातून मिळणारा नफा गटातील सर्व सदस्यांमध्ये वाटून घेतला जातो. 

सौ. छाया दळवी, ८७८८०८२९११ (अध्यक्षा, रणझुंजार महिला बचत गट, मिरज)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com