सहा लाख गाठींची निर्यात, आणखी १५ लाख गाठींचे सौदे

Cotton
Cotton

जळगाव - डॉलरची तेजी कमी होऊन त्याचे दर २१ दिवसांत ७० रुपये प्रतिडॉलरवर खाली आले आहेत. डॉलरचे दर जसे कमी झाले, तसा निर्यातीसह आर्थिक बाबींवर परिणाम झाल्याने कापूस बाजार डगमगला आहे. सुमारे सहा लाख गाठींची निर्यात देशातून झाली असून, आणखी १५ लाख गाठींच्या निर्यातीचे सौदे झाले आहेत. परंतु कापसाची आवक हवी तशी नसल्याने कापसाचे दर स्थिर असल्याची माहिती आहे.

आंतरराष्ट्रीय कापूस बाजारासंबंधीच्या न्यूयॉर्क वायदामध्ये कापसाचे दर १५ दिवसांत ८४ सेंटवरून ७९ सेंटवर आले आहेत. खंडीचे दर (३५६ किलो रुई) ४७५०० रुपयांवरून ४४००० रुपयांवर आले आहेत. पण कापसाची आवक महाराष्ट्र, तेलंगण, मध्य प्रदेशात अत्यल्प असल्याने त्याचे दर स्थिर आहेत.

ऑक्‍टोबर महिना सुरू झाल्यानंतरच्या ४० ते ४५ दिवसांत बांगलादेश, व्हिएतनाम व पाकिस्तानात सुमारे सहा लाख गाठींची निर्यात झाली आहे. तर अंदाचे १५ लाख गाठींचे सौदे यशस्वी झाले असून, येत्या महिन्यात या गाठींची पाठवणूक पूर्ण होईल, अशी माहिती बाजारपेठ विश्‍लेषकांकडून मिळाली.

राज्यातील जिनिंगमध्ये कापूसटंचाई कायम आहे. ही टंचाई पुढेही मिटणार नाही, कारण पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झपाट्याने रिकामे होत आहे. कोरडवाहू कापसाचा हंगाम कर्नाटकात जवळपास आटोपला आहे. तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि तेलंगणात कोरडवाहू कापसाचा हंगाम अखेरच्या स्थितीत आहे. यामुळे बाजार वित्तीय चढ-उतारातून जात असतानाही कापसाचे दर फारसे कमी झालेले नाहीत, असे सांगण्यात आले.

बांगलादेशकडून सध्या मागणी कमी आहे. कारण आर्थिक मुद्यांचा सामना बांगलादेशला करावा लागत आहे. कापडाला हवा तसा उठाव नसल्याने बांगलादेशमधील सूतनिर्मितीची प्रक्रिया काहीशी संथ झाली आहे.

न्यूयॉर्क वायदामध्ये कापसाचे दर कमी होताच खंडीसह सरकीच्या दरातही घसरण झाली आहे. सरकीचे दर १० दिवसांत २३०० रुपयांवरून प्रतिक्विंटल २१५० रुपयांवर आहेत. परंतु मागील आठवडाभरापासून सरकीचे दर स्थिर आहेत.

चार लाख क्विंटल कापूस मिळणे अशक्‍य
राज्यात रोज चार लाख क्विंटल कापसाची आवश्‍यकता जिनिंगसह इतर खरेदीदारांना आहे. परंतु रोज फक्त दोन ते सव्वादोन लाख क्विंटल कापूस उपलब्ध होत आहे. जिनिंगसमोर कापूसटंचाई कायम आहे. ही स्थिती ऑक्‍टोबरच्या मध्यापासून कायम आहे. पुढेही अशीच स्थिती राहील, असे सांगण्यात आले.

डॉलरचे दर जसे कमी झाले, तसा कापूस बाजारात दबाव आला. सरकी व खंडीचे दर कमी झाले आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी आपल्याकडील काही प्रमाणातील कापूस बाजारात विक्रीस आणणे योग्य ठरू शकते.
- दिनेश हेगडे, कापूस निर्यातदार, मुंबई

डॉलरचे दर सहा टक्‍क्‍यांनी मागील २० - २२ दिवसांत कमी झाले. अर्थातच सरकी व रुईच्या दरातही सहा टक्के घसरण निश्‍चित आहे. पण कापसाची आवक कमी आहे. अपेक्षेपेक्षा निम्मेच कापूस आपल्या राज्यात मिळत आहे.
- अरविंद जैन, माजी अध्यक्ष, खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन

आकडे दृष्टिक्षेपात
४४००० खंडीचे दर
७० रुपये डॉलरचे दर
७९ सेंट न्यूयॉर्क वायदामधील कापसाचे दर
६ लाख गाठी देशात नव्या हंगामामधील निर्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com