डॉलर वधारल्याने कापूस बाजार सावरला

डॉलर वधारल्याने कापूस बाजार सावरला

जळगाव - रुपयाच्या तुलनेत डॉलरचे वधारते दर, न परवडणारी आयात व निर्यातीसंबंधीचे वाढते सौदे यामुळे देशांतर्गत बाजारात ३५ ते ३७ मिलिमीटर लांब धाग्याच्या रुईचे दर उच्चांकी पातळीवर पोचले असून, किमान ६१ हजार रुपये खंडी (३५६ किलो रुई) असे दर ३५ व ३७ मिलिमीटर लांब धाग्याचा कापूस म्हणून ओळख असलेल्या नूवीन व डीसीएच प्रकारच्या रुईला देशांतर्गत बाजारात मिळत आहेत.  

रुपयाचे दर डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर पोचल्याने २९ मिलिमीटर लांब धाग्याच्या रुईचे दर सात टक्‍क्‍यांनी वधारून ते ४८ हजार रुपये प्रतिखंडी, असे झाले आहेत. तीन आठवड्यांपूर्वी अमेरिकन कापूस वायदा बाजार ९४ सेंटवरून ८७ सेंटवर खाली आला. मागील आठवड्यात अमेरिकन बाजार ८२ सेंटवर स्थिरावला. चीन व अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धामुळे चलन बाजारावर परिणाम दिसून येताच कापूस बाजारही घसरू लागला. डॉलर मात्र वधारून तो ७०.२१ रुपये, अशा दरांवर पोचला. यामुळे ४७५०० रुपये खंडीपर्यंत खाली आलेले रुईचे दर ४८००० रुपयांपर्यंत पोचले आहेत. निर्यातीसंबंधी नफ्याचे सौदे होत आहेत, परंतु भारतात अल्प प्रमाणात पिकणाऱ्या लांब धाग्याच्या (३५ मिलिमीटर) पिमा व गिझा प्रकारच्या कापसाची आयात देशांतर्गत मिलांना परवडत नाही. 

ऑस्ट्रेलिया, अमेरिका व तुर्की येथून पिमा व गिझा प्रकारच्या गाठींची आयात करायची असल्यास प्रतिखंडी ७१ ते ७२ हजार रुपये दर पडत आहे. पहिल्या दर्जाचे सूत निर्मिती व ब्रॅण्डेड कपडे निर्मितीसाठी या लांब धाग्याच्या कापसाची गरज मिलांना काही प्रमाणात असते. ही गरज देशांतर्गत बाजारात पूर्ण करणे शक्‍य असल्याने देशांतर्गत बाजारात त्यासंबंधीचे सौदे सुरू असून, त्यांना यंदा उच्चांकी ६१ हजार रुपये प्रतिखंडी, असा दर आहे. 

नूवीन प्रकारचा कापूस किंवा रुई फक्त तामिळनाडू व ओरिसालगत उपलब्ध होत आहे. या भागात सुमारे १० हजार गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन यंदा झाले आहे. हा कापूस ३७ मिलिमीटर लांबीचा असून, पिमा व गिझासारखाच दर्जा त्यात मिळत आहे. तर डीसीएच प्रकारचा कापूस किंवा रुई मध्य प्रदेशातील रतलाम व परिसर आणि महाराष्ट्रातील सिल्लोड, कन्नड (जि. औरंगाबाद) भागात उपलब्ध होत आहे. डीसीएचचे यंदा सुमारे दीड लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. त्याला चांगले दर मिळत असल्याने यंदा लागवड क्षेत्र संबंधित भागात वाढले आहे. अमेरिकन वायदा बाजारात सुताच्या दरांबाबत थोडी पडझड झाली. परिणामी देशातही उत्तम दर्जाच्या सुताचे दर थोडे दबावात आल्याची माहिती मिळाली. 

तीन आठवड्यांपूर्वी अमेरिकन कापूस वायदा बाजारात थोडी घसरण झाली. परंतु, डॉलरचे दर रुपयाच्या तुलनेत उच्चांकी पातळीवर गेल्याने भारतीय कापूस बाजार सावरला आहे. सद्यःस्थितीत लांब धाग्याच्या (२९ मि.मी.)कापसाचे दर ५८०० रुपये असून, नूवीन व डीसीएच प्रकारच्या कापसाला यंदाचे सर्वाधिक दर सध्या मिळत आहेत. कारण आयात मिलांना परवडत नसल्याची स्थिती आहे. 
- अनिल सोमाणी, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

कापसाला सध्या ५८०० रुपये दर
दर्जेदार कापसाला सध्या ५८०० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. केंद्राने लांब धाग्याच्या कापसाचे दर ५४५० रुपये प्रतिक्विंटल केल्याने दर कमी होणार नाहीत. महाराष्ट्र, पंजाब, हरयाणात या महिन्याच्या अखेरिस वेचणी सुरू होईल. यंदा गुलाबी बोंड अळीचे प्रमाण कमी दिसत आहे, असे जाणकारांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com