प्रजनन काळात योग्य काळजी, खाद्य नियोजन महत्त्वाचे

सशक्त वासरू जन्माला येण्यासाठी गाई, म्हशीला अतिरिक्त पौष्टिक आहार द्यावा.
सशक्त वासरू जन्माला येण्यासाठी गाई, म्हशीला अतिरिक्त पौष्टिक आहार द्यावा.

गाई, म्हशींचे विणे ही जरी नैसर्गिक बाब असली, तरी गाभणकाळात आणि व्याल्यानंतर योग्य काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे विण्याआधी आणि व्याल्यानंतर शारीरिक पोषण, वाढ, दूधवाढ आणि प्रजननासाठी गायी, म्हशींना संतुलित आहाराचा पुरवठा करावा.

गाई, म्हशींचे रेतन केल्यानंतर जर त्या माजावर आल्या नाहीत, तर त्या गाभण आहेत, असे समजले जाते. हे जरी खरे असले, तरीही प्रजननातील विविध समस्यांमुळे गाई, म्हशी माजावर येण्यास विलंब होतो किंवा माजावर येत नाहीत. क्वचित काही वेळा गाभण गाई, म्हशीदेखील माज दाखवतात. त्यामुळे पशुतज्ज्ञांकडून गर्भधारणेची खात्री करून घ्यावी.

पुरेसा पशुआहार
   गाई, म्हशींना गाभण काळात अतिरिक्त पौष्टिक आहार दिल्यामुळे गाई, म्हशींच्या दुसऱ्या वेतामध्ये आणि जन्मणाऱ्या वासरामध्ये समस्या निर्माण होत नाहीत.  
   गाभण काळातील शेवटच्या तीन महिन्यांत पशू आहाराची गरज झपाट्याने वाढलेली असते. कारण, याच काळात वासराची ७० टक्के वाढ होत असते. या वेळी प्रथिनांची कमतरता पुनरुत्पादनात अडथळे निर्माण करू शकते.
   प्रतिवर्षी एक वासरू हवे असल्यास गाई, म्हशी व्याल्यानंतर ८३ ते ८५ दिवसांत माजावर येऊन नैसर्गिक वा कृत्रिम पद्धतीने रेतन करावे.
   विण्याच्या ९० दिवस अगोदर वासराच्या योग्य वाढीसाठी, वासरू सशक्त जन्माला येण्यासाठी व मुबलक दूध उत्पादनासाठी गाई, म्हशीला या काळात अतिरिक्त पौष्टिक आहार द्यावा.

विण्याअगोदर घ्यावयाची काळजी
   सर्वप्रथम गाभण गाई, म्हशींना इतर जनावरांपासून वेगळे करावे. शक्य असल्यास घराजवळच वेगळा गोठा करावा.
   गोठा अतिशय स्वच्छ, कोरडा व भरपूर सूर्यप्रकाश असलेला असावा.
   गोठ्यामध्ये जंतुनाशकाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करावे.  
   जमिनीवर स्वच्छ, मऊ गवत अंथरावे.
   गायी-म्हशींना पुरेसा व्यायाम द्यावा; परंतु दूरवर चालणे टाळावे.
   डोंगराळ भागात चरायला नेणे टाळावे.
   खराब प्रतीचे खाद्य गाई, म्हशी तसेच होणाऱ्या वासराला हानीकारक ठरू शकते.
   आहारात खनिज मिश्रणाचा उपयोग करावा.
   मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा करावा.

गाभण काळातील शेवटचे तीन महिने
   या वेळी मायांग बाहेर येण्याची शक्यता असते. त्यासाठी गाई, म्हशींवर लक्ष ठेवावे.
   उंचावर किंवा डोंगराळ भागात चरायला नेऊ नये. गाई, म्हशी चालताना पडल्यास गर्भाशयाला पीळ पडून उपचाराअभावी वासरू दगावू शकते.
   गर्भपाताची लक्षणे वाटल्यास ताबडतोब पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.
   बऱ्याच वेळा गाभणकाळ पूर्ण होण्याअगोदर वासराचा जन्म होऊ शकतो. त्यासाठी आपण तयार राहायला हवे.
   गाई, म्हशीला मारणे, पळवणे व इतर जनावरांत सोडणे कटाक्षाने टाळावे. याने गाभण गाई, म्हशीला दुखापत होऊन गर्भपाताची शक्यता वाढते.
   शेवटच्या दोन महिन्यांत गाभण जनावरांचे दूध काढणे बंद करावे. एक ते दीड किलो अतिरिक्त आहार द्यावा.
   विण्याच्या अगोदर दूध काढू नये. त्याने जनावर विण्यास थोडा विलंब होतो.
   विण्याच्या अगोदर एक आठवडा किंवा व्याल्यानंतर दुग्धज्वर होण्याची शक्यता असते, त्यासाठी पशुतज्ज्ञांकडून कॅल्शियमचे इंजेक्शन टोचून घ्यावे.

विताना घ्यावयाची काळजी
   विण्याचा काळ हा २ ते ३ तासांचा असतो. जर पहिले वेत असेल, तर हा काळ ४ ते ५ किंवा अधिक तास राहू शकतो.
   गाई, म्हशी विण्याचे तीन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात गर्भाशयाचे मुख उघडते आणि विस्तारते. दुसऱ्या टप्प्यात वासरू बाहेर येते आणि तिसऱ्या टप्प्यात वासराचे आवरण व पटले बाहेर येतात.
   विण्याच्या या सर्व लक्षणांवर आपण बारीक लक्ष ठेवावे. प्रसूती वेदनांमुळे पहिल्या टप्प्यात गाई, म्हशींची ऊठ-बस वाढते, खूप बेचैन होते.
   कास मोठी होते.
   प्रसूतीच्या टप्प्यात गाई, म्हशींवर सातत्याने लक्ष ठेवावे.

व्याल्यानंतर घ्यावयाची काळजी
   व्याल्यानंतर गाई, म्हशीचे अंग कोरडे करावे. जंतुनाशक वापरून अंग स्वच्छ करावे.
   प्यायला कोमट पाणी द्यावे.
   वार दूरवर नेऊन खड्ड्यात पुरावा.
   जर वार अडकली, तर पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.
   व्याल्यानंतर ताबडतोब गाय, म्हैस वासराला चाटते; त्याला चाटू द्यावे. वासराला गाई, म्हशीने चाटले नाही, तर कोरडा कपडा किंवा पोत्याने वासराला कोरडे करावे.
   जन्मल्याबरोबर वासराच्या नाका-तोंडातील चीक स्त्राव काढून टाकावा.
   वासराची नाळ २ ते ५ सें.मी. दूरवर बांधून त्यापुढे कापावी. त्यावर टीचर आयोडिन लावावे.
   गोठा स्वच्छ करावा. चांगले वाळलेले गवत पसरावे.
   वासरू कमजोर असल्यास त्याला उभे राहण्यास आणि दूध पिण्यास मदत करावी.
   व्याल्यानंतर दूध उत्पादनासाठी गाई, म्हशीला मुबलक आहार द्यावा. आहारात गव्हाचा कोंडा, ओट, तसेच अळशीच्या बियांचा समावेश असावा. ताजा हिरवा चारा द्यावा. स्वच्छ मुबलक पाणी पाजावे.

वासराला चीक पाजा...
   जन्मल्यानंतर वासराला आईचे पहिले दूध अवश्य पाजावे.  
   चिकामध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे घटक मुबलक प्रमाणात असतात.

- डॉ. मेघा कोसे,  ८२८९०१०२९७
- डॉ. एम. एस. बावस्कर, ९१५८०४७०००
(पशुप्रजननशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com