दुग्ध, रेशीम व्यवसायातून अर्थकारण केले भक्कम

घरातील महिला सदस्य रेशीमशेती करून दर्जेदार कोष उत्पादन घेतात.
घरातील महिला सदस्य रेशीमशेती करून दर्जेदार कोष उत्पादन घेतात.

परभणी शहरानजीक शेती असलेल्या ढगे कुटुंबाने शेतीला दुग्धव्यवसायाची जोड देत त्यात सातत्य ठेवले. अलीकडील वर्षांत रेशीम शेती सुरू करून शेतीतील अर्थकारणाचा पाया अजून भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. रासायनिक खतांचा वापर काही वर्षांपासून बंद करून सेंद्रिय शेतीही आकारास आणली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परभणी शहरापासून काहीच किलोमीटरवर गणेशराव विठोबाराव ढगे यांची शेती आहे. मूळ पिंपळगांव ढगे (ता. परभणी ) या गावी त्यांची सात एकर वडिलोपार्जित जमीन होती. कुटुंब विभक्त झाल्यानंतर वाट्याला आलेली गावाकडची जमीन विकून परभणी शिवारात गणेशरावांनी पाच एकर जमीन घेतली. शेतीसोबत दुग्धव्यवसाय सुरू करून चिकाटीने त्यात सातत्य ठेवले. उत्पन्नातून टप्प्याटप्प्याने शेती खरेदी केली. सध्या कुटुंबाकडे ३० एकर शेती आहे. खोल काळी माती आहे. विहीर आणि बोअरव्दारे हंगामी सिंचनाची सुविधा आहे. सर्व क्षेत्र ठिबकखाली आहे. हंगामनिहाय सोयाबीन, मूग, कापूस, गहू, ज्वारी, हरभरा आदी पिके ते घेतात. 

दुग्धव्यवसायातून शेतीचा विस्तार

  • सन १९६५ च्या सुमारास तीन  म्हशींपासून दुग्धव्यवसाय
  • शहरात घरोघरी दुधाचे रतीब घालण्यास सुरुवात 
  • म्हशींची संख्या सात ते आठपर्यंत नेली. 
  • उत्तम व्यवस्थापनातून व्यवसायातील नफा वाढवला. त्यातून नांदखेडा शिवारात १० एकर शेती घेतली.
  • सिमेंट छत असलेला बंदिस्त गोठा. जाफराबादी आणि मुऱ्हा मिळून एकूण सहा म्हशी
  • प्रति दिन ८० ते ९० लीटर दूध 
  • परभणी शहरात अनेक वर्षापासून घरोघरी जाऊन दूध घालण्याचा शिरस्ता आजही कायम
  • सुमारे ४० दररोजचे ग्राहक. गणेशराव व मुलगा परमेश्‍वर या दोघांनी ते वाटून घेतले आहेत. 
  • प्रति लीटर ६०  रुपये दर 
  • या व्यवसायात मजूर परवडत नसल्याने चारा, वैरण, दूध विक्री अशी कामे घरचेच सदस्य वाटून घेतात.

कुशल मजूर व्यवस्थापन 

  • महिला मजुरांच्या हाताला वर्षभर काम उपलब्ध केले आहे. 
  • रोख रक्कम तसेच धान्य असे दोन्ही त्यांच्यासाठी पर्याय 
  • दर आठवड्याला नियमित मजुरी व घरच्यांसारखीच वागणूक. वेळप्रसंगी आर्थिक मदत
  • सहा महिला मजूर पंधरा वर्षांपासून कार्यरत. दोन सालगडी

घरच्यांची मदत 

  • गणेशरावांना पत्नी कमलबाई व मुलगा परमेश्‍वर यांची शेतीत मोठी साथ 
  • मोठा मुलगा रामेश्वर यांचे परभणी येथे ऑटोमोबाईलचे दुकान. 

शेतीतही प्रयोग 
गेल्यावर्षी ऐन काढणीवेळी पावसात भिजल्यामुळे चांगल्या प्रतीचे सोयाबीन बियाणे उपलब्ध होऊ शकले नाही. मग वरपुड येथील प्रयोगशील शेतकरी चंद्रकांत देशमुख- वरपुडकर यांचे मार्गदर्शन घेतले. त्यातून उन्हाळी हंगामात पाऊण एकरांत एमएयूएस ६१२ वाणाचे साडेतीन क्विंटल बियाणे उपलब्ध केले. घरचे आणि वरपुडकर यांच्याकडून बियाणे विकत घेऊन १६ एकरांत पेरलेल्या बियाण्याची उगवण चांगली झाली. 

रासायनिक निविष्ठांचा वापर बंद 

  • सुमारे २५ ते ३० वर्षांपासून रासायनिक खतांचा वापर पूर्ण बंद 
  • घरचे सुमारे २५ ट्रॉली शेणखत व बाहेरून दरवर्षी ७५ ते १०० ट्रॉली खरेदी. 
  • त्यातून जमिनीची सुपीकता तसेच जलधारण क्षमता वाढवली आहे. 
  • कमी पाऊस असतानाही चांगले उत्पादन मिळते. 
  • काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीचे क्षेत्र कमी केले. मात्र मजुरांच्या उपलब्धतेमुळे दरवर्षी आठ ते १० एकरांत ज्वारी घेतात. त्यातून कडबाही उपलब्ध होते. ज्वारी तसेच सेंद्रिय गव्हाची घरूनच विक्री होते. त्यास बाजारभावापेक्षा क्विंटलला १०० ते २०० रुपये दर अधिकचा मिळतो. यंदा गव्हाची क्विंटलला २८०० रुपये दराने विक्री केली.

रेशीम शेतीचा तिसरा पर्याय 
शेती, दुग्धव्यवसाय यांना रेशीम शेतीचा तिसरा आर्थिक पर्याय ढगे कुटुंबाने उपलब्ध केला आहे. जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालय पी. एस. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुती लागवड तसेच रेशीम कीटक गृहाची उभारणी केली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे तसेच कृषी विज्ञान केंद्रातर्फे प्रत्येकी सात दिवसांचे रेशीम शेती प्रशिक्षण ढगे यांनी घेतले आहे. त्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोन त्यात आणणे शक्य झाले. 

अशी आहे रेशीम शेती 

  • २०१८ मध्ये दोन एकरांत तुती लागवड 
  • प्रति बॅच ३०० अंडीपुंजांपासून रेशीम कोष उत्पादन घेण्याच्या दृष्टीने ६० बाय २५ फूट आकाराचे रेशीम कीटक संगोपनगृह. सध्या दोनशे अंडीपुंजांपासूनच उत्पादन    
  • संगोपनगृहासाठी शासकीय अनुदान
  • बायव्होल्टाईन कीटकाची निवड.
  • पहिल्या वर्षी १०० आणि १५० अंडीपुंजांच्या दोन बॅचसेपासून अनुक्रमे ८८ किलो आणि ९२ किलो कोष उत्पादन. तेलंगणा राज्यातील जंगम मार्केटमध्ये प्रति किलो २९० रुपये दर
  • पुढील वर्षी पाच बॅचेस. त्यातील दोन ‘फेल’. उर्वरित तीन बॅचचे मिळून दोन क्विंटल ४० किलो कोष उत्पादन
  • पूर्णा तसेच जालना मार्केटमध्ये विक्री. त्यास २४० ते कमाल ४४० रुपये दर
  • मागील वर्षापासून प्रत्येकी २०० अंडीपुंजाच्या बॅचेस, वर्षाला तीन ने चार बॅचेस   
  • प्रति १०० अंडीपुंजांमागे ५० ते ६० किलो कोषउत्पादन
  • प्रति बॅच किमान खर्च २० हजार रुपये.  

लॉकडाऊनचा फटका 
लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी एकेवेळी किलोला ४४० रुपये दर मिळून २४ हजार रुपये प्रति बॅच उत्पादन मिळाले होते. सध्या लॉकडाऊनमध्ये दोनशे अंडीपुंजांपासून एक क्विंटल माल मिळाला. मात्र सध्या दर अत्यंत कमी म्हणजे किलोला १२५ रुपये सुरू आहे. राज्य तसेच राज्याबाहेर कोष विक्रीस नेण्यासाठी मर्यादा येत आहेत. डॉ. लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी मित्र नरेश शिंदे यांच्याकडील सोलर ड्रायरमध्ये कोष वाळवून त्यांची साठवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे काम वेळखाऊ असल्याचे ढगे सांगतात. नाइलाजाने आहे त्या दरांत विक्री करण्याची वेळ आली आहे.
- गणेशराव ढगे- ९६७३१११०४८

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com