पाऊसमानाकडे  बाजाराचे लक्ष

पाऊसमानाकडे  बाजाराचे लक्ष

महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्ये आणि भाजीपाला पिकांमध्ये उत्पादनवाढ व पर्यायाने पुरवठावाढीच्या समस्येमुळे दीर्घकाळ मंदीची परिस्थिती पाहिली. सध्याचे पाऊसमान, पीक पेरा, आधारभाव आणि तत्सम धोरणाकडे बाजाराचे लक्ष आहे. आधारभाव जाहीर झाल्यानंतर कडधान्यांच्या बाजारात चमक दिसली. सुरवातीच्या टप्प्यात प्रमुख कडधान्यांचा पेरा हा मागील वर्षाच्या तुलनेत पिछाडीवर दिसत होता. मात्र, ताज्या आकडेवारीनुसार उडीद वगळता अन्य पिकांतील पिछाडी भरून निघाली आहे. देशात ३ ऑगस्टच्या अहवालानुसार ११५.५ लाख हेक्टरवर कडधान्यांचा पेरा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.९ टक्के घट आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर आणि मुगाचा पेरा अनुक्रमे १.३ टक्के आणि २.५ टक्के पुढे आहे, तर उडदाचा पेरा ११.२ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. तथापि, पंचवार्षिक सरासरीच्या तुलनेत कडधान्यांचा पेरा लक्षणीय अधिक आहे. ही परिस्थिती पाहता सध्याची पुरवठावाढ कितपत संतुलित होईल, याबाबत शंकाच आहे.

हरभरा हे वायदेबाजारात व्यवहार होणारे एकमेव कडधान्य पीक आहे. हरभऱ्याचा सप्टेंबर वायदा ता. १२ जून रोजी ३४१५ रु. प्रतिक्विंटलच्या पातळीपर्यंत घटला होता. मागील पावणेदोन महिन्यांत त्यात जोरदार तेजी आली आहे. ३ ऑगस्ट रोजी ४२७५ रु. वायदा ट्रेड झाला. स्पॉट मार्केटमध्येही जवळपास हजार रुपयांची तेजी आली. खास करून खरीप पिकांचे आधारभाव जाहीर झाल्यानंतर हरभऱ्यातही तेजी दिसली आहे. हरभरा हे रब्बी कडधान्य पीक असून, गेल्या वर्षी ४४०० रु. प्रतिक्विंटल आधारभाव जाहीर झाला होता. तथापि, काढणीनंतर पाच महिने आधारभावाच्या खाली हरभऱ्याचे दर होते. महाराष्ट्रातील बाजार समित्यांत आजही चार हजारांच्या खाली दर आहेत. चार हजारांच्या वरच्या पातळीवर विक्रीचा दबाव वाढत असून, त्याचा प्रभाव बाजारभावावर दिसला आहे. गेल्या पंधरवड्यात बिकानेर मार्केटमध्ये ४४०० पर्यंत वधारलेले दर आजघडीला दोनशे रुपयांनी नरमलेले दिसतात.

रब्बी आणि खरीप हंगामात महाराष्ट्रातील प्रमुख पीक असलेल्या मक्यामध्ये जुलै २०१७ ते जून २०१८ या बारा महिन्यांत मंदी होती. २०१७-१८ मध्ये २.६ कोटी टन मका उत्पादन झाले. सलग दुसऱ्या वर्षी उच्चांकी उत्पादन मिळाले. मक्यातील मंदीचा फटका बाजरी पिकालाही बसला. दोन्ही पिकांचा उपयोग पशुखाद्यामध्ये होतो. तथापि, मक्याच्या बाजारानुसार बाजरीचा दर ठरतो. मका अधिक महाग झाला की त्यास पर्याय म्हणून बाजरीचा वापर पशुखाद्यात वाढतो. मागील वर्षभरामध्ये दोन्ही पिकांचे भाव पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर होते. या दरम्यान, चालू खरिपात देशपातळीवर बाजरीचा पेरा गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. मक्याचा पेरा दीड टक्क्याने वाढला असला तरी गेल्या पाच वर्षांतील वाढीचा वेग आता संथ झाला आहे. या दरम्यान मागील पंधरवड्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे महाराष्ट्रातील मका आणि बाजरी पिकाला ताण बसत असून, लवकर पाऊस न झाल्यास उत्पादकता घटण्याची चिन्हे आहेत.  

महाराष्ट्रातील प्रमुख भाजीपाला पिकांमध्ये संमिश्र कल आहे. दीर्घकाळच्या मंदीनंतर कोबीचा बाजारभाव वाढला आहे. पुढील दीड महिन्यापर्यंत आवक कमी राहील. सध्या नाशिक विभागात फार्मगेट किंमत १५ ते १८ रु. दरम्यान आहे. टोमॅटोचे दर मागील दोन महिन्यांपासून १५ ते २० रु. दरम्यान आहेत. चालू वर्षांत जानेवारी ते मे दरम्यान टोमॅटोचे बाजारभाव मंदीत होते. त्या तुलनेत मागील जून व जुलै महिन्यात किफायती दर मिळाले आहेत. ढोबळी मिरचीचे दर ३५ रु. प्रतिकिलोपर्यंत पोचले आहेत. कांद्याचा बाजार हजार रुपयांदरम्यान स्थिरावला आहे. कांदा वगळता अन्य वरील पिकांना एप्रिल, मे मधील तीव्र उन्हाळ्याचा फटका बसल्याने उत्पादन घटले. परिणामी सध्या बरा बाजार मिळत आहे.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कांदा बाजारात थोडी नरमाई दिसली आहे. नाशिकस्थित एनएचआरडीएफच्या पाहणीनुसार या वर्षी सुमारे ५० लाख टन उन्हाळ कांदा जूनपूर्वी स्टॉक झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पाच लाख टन स्टॉक अधिक आहे. निर्यात सुरळीत असली तरी पुरवठावाढ संतुलित करण्याइतपत तिचा प्रभाव नाही. या पार्श्वभूमीवर, खरीप कांद्याच्या बियाण्याची विक्रीही वाढली आहे. राज्यात १५ जुलैपासून खरीप कांद्याच्या पुनर्लागवडी सुरू झाल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये हा माल बाजारात येईल. तत्पूर्वी ऑगस्टच्या अखेरीस कर्नाटकातील आवक वाढत जाईल. सप्टेंबरमध्ये दक्षिण भारताबरोबरच उत्तरेतूनही टप्प्याटप्प्याने खरीप कांद्याची आवक वाढत जाते. गेल्या वर्षी खरिपातील कांद्याला उच्चांकी दर मिळाल्यामुळे या वर्षी उत्पादनात वाढ अपेक्षित असून, पुढच्या महिन्यापासून कांदा बाजारभावाचा कल फारसा उत्साहवर्धक नाही. असमतोल पाऊसमानामुळे चित्र बदलेल, अशी अपेक्षा बरेच जण ठेवून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com