कांद्याचा तुटवडा दीर्घकाळ राहणार

onion
onion

रब्बी हंगामातील कांद्याच्या लागण  सर्वसाधारणपणे एक नोव्हेंबरपासून सुरू होतात. त्या फेब्रुवारीअखेरपर्यंत सुरू राहतात. देशात गेल्या हंगामात उच्चांकी ९.९ लाख हेक्टरवर रब्बी कांद्याची लागवड झाली होती. गेल्या हंगामात देशातील रब्बी कांदा लागवडीत महाराष्ट्राचा वाटा ४९.४ टक्के होता. महाराष्ट्रात ४.९ लाख हेक्टरवर रब्बी (उन्हाळ) लागणी झाल्या होत्या.

या वर्षी देशात रब्बी (उन्हाळ) कांदा बियाण्यांचा अभूतपूर्व तुटवडा आहे. त्यामुळे किती लाख हेक्टरवर लागणी होतील आणि त्याची उत्पादकता काय राहील या दोन्ही गोष्टींबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. २०२०-२१ मध्ये किमान सात लाख हेक्टरवर रब्बी लागणी झाल्या पाहिजेत आणि त्यातून चांगल्या टिकवण क्षमतेची हेक्टरी अडीच टन सरासरी राष्ट्रीय उत्पादकता मिळणे क्रमप्राप्त ठरेल.

गेल्या हंगामात सुमारे दहा लाख हेक्टरवर कांदा लागणी होऊन आणि उन्हाळ हंगामात आजवरचे विक्रमी २१३ लाख टन उत्पादन मिळूनही आजघडीला कांद्याचा तुटवडा आहे. त्याचे कारण म्हणजे चाळीतल्या कांद्यात अनपेक्षित ५० टक्क्यापर्यंत झालेली घट आणि नव्या खरीप हंगामातील नव्या लागणींचे अतिपावसामुळे झालेले मोठे नुकसान. सलग दुसऱ्या वर्षी खरीप कांदा उत्पादनात नीचांकी घट येण्याचा अंदाज आहे. 

चालू ऑक्टोबर महिन्यात सध्याच्या बेभरवशाच्या नैसर्गिक परिस्थितीमुळे शेतकरी उन्हाळ ऊळे (बियाणे) टाकण्याचे धाडस करणार नाहीत. कारण ज्यांनी बियाणे टाकले त्यांना वाईट अनुभव आलेले आहेत. याचा अर्थ उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम लांबू शकतो. याचा अर्थ सध्याची तुटवड्याची परिस्थिती दीर्घकाळपर्यंत टिकू शकते.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

केंद्र व राज्य सरकारच्या यंत्रणांनी २०२१ मध्ये कांद्याचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी उन्हाळ कांदा लागण व बियाणे पुरवठा याबाबत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त साह्य करणे गरजेचे आहे. खास करून, कांदा उत्पादक विभागासाठी पाऊसमानाचे अनुमान, क्रॉप प्रॅक्टिसेस, बियाणे अनुदान आदींबाबत साह्य अपेक्षित आहे. आज हेक्टरी ५० हजार रुपये फक्त बियाण्यांवर खर्च करण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये नाही. 

पुरवठा आक्रसणार
ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कांद्याचा जुना कॅरिओव्हर स्टॉक आणि मुख्य खरीपातील आवक या दोन घटकांवर एकूण पुरवठ्याचे गणित अवलंबून असते. ऑक्टोबर महिन्याची गरज भागेल एवढा कांद्याचा साठा देशात दिसतोय. मात्र, नोव्हेंबर - डिसेंबर या दोन महिन्यांत सध्याचे पाऊसमान पाहता नव्या आवकेबाबत चिंताजनक परिस्थिती आहे. दरमहा १४ ते १६ लाख टन देशांतर्गत गरज असते. नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये वर्षातील उच्चांकी मागणी असते. वरील दोन महिन्यांसाठी सुमारे २८ ते ३२ लाख टन पुरवठा अपेक्षित आहे. त्या तुलनेत पुरवठा निम्यापर्यंत घटण्याची भिती आहे.

देशात सर्वसाधारण खरीप हंगामात दोन लाख हेक्टरवर कांदा लागण होते. ऑक्टोबर - डिसेंबर या तिमाहीत वरील लागणींच्या मालाची आवक होत असते. यंदा अतिपावसामुळे खरीप लागणीच्या रोपवाटिका खराब झाल्या. शिवाय, बहुतांश लागणी पाऊस व रोगराईने नष्ट झाल्याचे अहवाल आहेत. (नुकसानीची तीव्रता नेमकी किती याची शासकीय स्तरावरील आकडेवारी उपलब्ध नाही.) व्यापारी व शेतकऱ्यांकडील नजरपाहणी / माहितीनुसार निम्यापर्यंत नुकसानीचे अनुमान मिळत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जानेवारी ते मार्च२०२१ या तिमाहीत लेट खरीप कांद्याचा पुरवठा असतो. ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये प्रामुख्याने लेट खरीपाच्या लागणी होतात. लेट खरीपाच्या रोपवाटिका व लागणींबाबतही चित्र खराब आहे.

वरिष्ठ कांदा शास्त्रज्ञ आणि माजी कुलगुरू डॉ. किसन लवांडे सांगतात, "माझ्या गेल्या ४५ वर्षांच्या करिअरमध्ये चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्यात एवढी घट निदर्शनास आलेली नव्हती. तसेच पावसाळी (खरीप) हंगामात कांदा उत्पादक विभागात रोगराईचा एवढा प्रकोप कधी दिसला नव्हता. अतिपाऊस, उष्णता,  अति आर्द्रता हे घटक रोगराई वाढण्यास कारणीभूत ठरलेत.''

(आकडेवारीः केंद्रीय कृषी मंत्रालय)
(लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)
(Edited By- Kalyan Bhalerao)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com