किमान तापमानात घट; थंड व कोरडे हवामान

किमान तापमानात घट; थंड व कोरडे हवामान

महाराष्ट्रावर रविवार ते मंगळवार या काळात १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे किमान तापमानात घट होऊन थंडीचे प्रमाण वाढेल. मात्र बुधवार ते शनिवार या कालावधीत महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब होताच थंडीची तीव्रता कमी होईल. अद्यापही वाऱ्याची दिशा आग्नेय, ईशान्येकडून राहिल्यामुळे तापमानात फार मोठी घट होणार नाही. मंगळवारी  अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल आणि बुधवारी विरून जाईल. या सर्व आठवडाभरच्या कालावधीत थंडीत चढ व उतार जाणवेल. या आठवड्यात महाराष्ट्रावर पातळ ढगांचे आवरण असेल. नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत मोठी घट होईल. त्यामुळे हवामान थंड व कोरडे राहील. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल व किमान तापमानात मोठी घसरण होऊन बोचरी थंडी पहाटे व सकाळी जाणवेल. वाऱ्याचा वेग साधारण राहील. या आठवड्यात व पुढील आठवड्यात दिवसाचा व सूर्यप्रकाशाचा कालावधी अत्यंत कमी राहण्यामुळे सकाळी थंडी व दुपारी थंड हवामान राहील. सूर्यास्त लवकर होत असल्यामुळे सायंकाळी थंडी  जाणवेल. फार मोठे हवामान बदल जाणवणार नाहीत. पावसाची शक्‍यता नाही. सध्याचे व या आठवड्यातील हवामान आल्हाददायक व पिकांना पोषक राहील. ऊस पिकात साखर वाढेल. मात्र उसास तुरे येतील.

कोकण
ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. ठाणे व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६७ टक्के राहील, तर ठाणे जिल्ह्यात ४४ टक्के इतकी कमी राहील. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५७ टक्के राहील. दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन, ती २५ ते ३९ टक्के कोकणात राहील. वाऱ्याचा ताशी वेग कोकणात ७ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. 

उत्तर महाराष्ट्र
नाशिक व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ते १६ अंश सेल्सिअस आणि नाशिक जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३४ ते ३६ टक्के राहील, तर नाशिक जिल्ह्यात ५४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते ३३ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ कि.मी. व वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. 

मराठवाडा
औरंगाबाद जिल्ह्यात कमाल व किमान तापमान घसरेल व कमाल तापमान २१ अंश सेल्सिअस व किमान तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरणे शक्‍य आहे. जालना जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील, तर नांदेड जिल्ह्यात ते १३ अंश सेल्सिअस राहील. लातूर जिल्ह्यात ते १६ अंश सेल्सिअस राहील व बीड जिल्ह्यात ते १५ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी या जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील, तर उर्वरित जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता औरंगाबाद जिल्ह्यात ३६ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यात ४२ ते ५८ टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ किलोमीटर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत राहील. वाऱ्याची दिशा मराठवाड्यात ईशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. 

पश्‍चिम विदर्भ
बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील, तर अकोला व अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस राहील, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ३९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १७ ते २१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. 

मध्य विदर्भ
यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३३ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ कि.मी. राहील व वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

पूर्व विदर्भ
भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस राहील, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ते ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअस राहील, तर भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात ते १२ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात ते १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३७ ते ४९ टक्के इतकी कमी राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. त्यामुळे सकाळी व दुपारी बोचरी थंडी जाणवेल. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ कि.मी. व वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. 

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र 
कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यात ते ३२ अंश सेल्सिअस राहील. सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ते ३१ अंश सेल्सिअस राहील, पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. नगर व सोलापूर जिल्ह्यांत किमान तापमान १६ ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. पुणे जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील, तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५३ टक्के राहील, तर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत ६० ते ६२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ४१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० कि.मी. व दिशा ईशान्येकडून राहील. 

कृषी सल्ला 
ऊसतोडणीनंतर शेतातील पाचट सरीत दाबावे. एक एकर क्षेत्रासाठी एक गोणी युरिया अधिक एक गोणी सिंगल सुपर फॉस्फेट पाचटावर विस्कटून त्यावर चार किलो पाचट कुजवणारे जिवाणू पाण्यात मिसळून ते द्रावण पाचटावर टाकावे. 
रब्बी ज्वारीचे पीक पोटरीत असल्यास संरक्षित पाणी द्यावे. 
तुरीवरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com