राज्यात थंडीमध्ये दिसणार चढ-उतार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात थंडीमध्ये दिसणार चढ-उतार

कोकण पश्‍चिम व मध्य विदर्भातही थंड वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहणार आहे. ईशान्येकडून थंड वारे वाहण्यामुळे थंडीचे प्रमाण कायम राहील. ईशान्य भारतात थंडीचे प्रमाण अधिक राहील.

राज्यात थंडीमध्ये दिसणार चढ-उतार

सध्याची परिस्थिती पहाता महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामध्ये सोमवारी वाढ होऊन तो १०१२ हेप्टापास्कल इतका वाढेल हा दाब आठवडाभर कायम राहील. जेव्हा कमाल व किमान तापमानात घट होते, तेव्हाच हवेच्या दाबात वाढ होते. या नियमानुसार थंडीचे प्रमाण वाढेल. त्यामुळे राज्यातील हवामान थंड व कोरडे राहील. मात्र याच आठवड्याच्या सुरुवातीपासून कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भ व दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्रात हवामान अंशतः ढगाळ राहिल्यामुळे थंडीच्या प्रमाणावर परिणाम होणे शक्‍य असून, थंडीच्या प्रमाणात चढ-उतार होणे शक्‍य आहे. त्यामुळे काही काळ किमान तापमानावर त्याचा परिणाम होऊन किमान तापमानात वाढ होऊन थंडी प्रमाणावर परिणाम होणे शक्‍य आहे. कोकण पश्‍चिम व मध्य विदर्भातही थंड वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहणार आहे. ईशान्येकडून थंड वारे वाहण्यामुळे थंडीचे प्रमाण कायम राहील. ईशान्य भारतात थंडीचे प्रमाण अधिक राहील. वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहतील तेव्हा थंडी वाढेल. मात्र महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत समान स्थिती राहणार नाही. दक्षिणेकडील तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, केरळ, दक्षिण कर्नाटक या भागांत तसेच पश्‍चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे जम्मू व काश्‍मीर, तसेच लडाख भागांत पावसाची शक्‍यता आहे. 

कोकण 
दक्षिण कोकणात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान २४ अंश सेल्सिअस राहील. उत्तर कोकणात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ७४ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ४८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. सध्याचे हवामान भात कापणी व मळणीसाठी, तसेच रब्बी हंगामाची पूर्वतयारी करण्यासाठी अनुकूल आहे. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उत्तर महाराष्ट्र
 धुळे व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ते ३४ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल, तर नाशिक जिल्ह्यात ते २२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. नंदूरबार व धुळे जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४९ ते ५३ टक्के राहील, तर नाशिक व जळगाव जिल्ह्यात ६१ ते ६९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३ ते ३९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. कापूस वेचणीसाठी हवामान अनुकूल राहील. 

मराठवाडा
मराठवाड्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून सर्वच मराठवाड्यातील जिल्ह्यात राहील. त्याचा प्रभाव किमान तापमानावर काही प्रमाणात शक्‍य असला तरी त्यात बदल होऊन वारे ईशान्येकडून वाहताच थंडीचे प्रमाण वाढेल. वाऱ्याचा ताशी वेग नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत ६ कि.मी., लातूर, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ताशी ८ कि.मी., बीड जिल्ह्यात ताशी ९ कि.मी. तर उस्मानाबाद जिल्ह्यात ताशी १० कि.मी. राहील. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील, तर नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. लातूर व जालना जिल्ह्यांत ते १९ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, बीड, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील, तर लातूर व जालना जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ६२ टक्के, तर दुपारची ३२ ते ४८ टक्के राहील. हवामान कापूस वेचणीस अनुकूल राहील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पश्‍चिम विदर्भ
पश्‍चिम विदर्भात वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. वाशीम जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील, तर बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ते १९ अंश सेल्सिअस राहील. हवामान थंड राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६४ टक्के, तर दुपारची ३८ ते ४० टक्के राहील व त्यामुळे हवामान कोरडे राहील. 

मध्य विदर्भ
मध्य विदर्भात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किलोमीटर राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील, तर यवतमाळ जिल्ह्यात ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६५ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३७ ते ४२ टक्के राहील. हवामान थंड व कोरडे राहील. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पूर्व विदर्भ
पूर्व विदर्भात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ते ३५ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात ते २० अंश सेल्सिअस आणि गडचिरोली जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ७४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ३८ टक्के राहील. खरिपातील पिकांच्या काढणीस हवामान अनुकूल राहील, तसेच रब्बी पिकांच्या पेरणीसही ते उपयुक्त राहील. 

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र
कोल्हापूर, सांगली व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील, तर सातारा, सोलापूर व नगर जिल्ह्यांत ते ३३ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत ते २१ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर नगर व सांगली जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. त्याचा प्रभाव थंड हवामानावर व किमान तापमानावर होईल. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ८२ टक्के राहील, तर दुपारची ४४ ते ५४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. त्याचा परिणाम थंडीवर होईल. 

कृषी सल्ला 
लाळ्या खुरकूत नियंत्रणासाठी जनावरांना लसीकरण करावे. 
पेरू बागेत कामगंध सापळे लावावेत. 
थंडी वाढणार असल्याने जनावरे बंदिस्त ठिकाणी बांधून ठेवावीत.
पोल्ट्री शेडमध्ये विद्युत दिवे रात्री व दिवसा लावल्यास तापमान योग्य राखण्यात मदत होईल. 
जनावरांना हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून लसूण घास, बरसीम, मका पेरणी करावी. 
गहू, हरभरा, जवस, मोहरीची पेरणी वेळेवर करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

Web Title: Dr Ramchandra Sable Write Climate State Will Remain Cold And Dry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top