esakal | यंदाचा आत्मनिर्भर मॉन्सून
sakal

बोलून बातमी शोधा

rain

यंदाचा मॉन्सून जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात द्रुतगतीने धावत निघाला आणि २६ जूनला त्याने संपूर्ण देश व्यापून टाकला. जुलै महिन्यात देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या वेळी, वादळी पाऊस पडत राहिला.

यंदाचा आत्मनिर्भर मॉन्सून

sakal_logo
By
डॉ. रंजन केळकर

१ जून ते १७ ऑगस्ट २०२० च्या एकूण कालावधीत संपूर्ण भारतात सरासरीपेक्षा ४ टक्के जास्त पर्जन्यवृष्टी झालेली आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरावर अजून एका कमी दाबाच्या क्षेत्राच्या निर्मितीची आणि त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. असे झाल्यास ते मॉन्सूनसाठी निश्चितपणे पोषक ठरेल. मॉन्सूनची सद्यस्थिती देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी समाधानकारक आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नैर्ऋत्य मॉन्सूनचे केरळवरील आगमन त्याच्या भारतावरील पुढील प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. या वर्षी नैर्ऋत्य मॉन्सून केरळवर १ जूनला म्हणजे अगदी वेळेवर, त्याच्या आगमनाच्या सरासरी तारखेला दाखल झाला. त्याच दिवशी भारतीय हवामानशास्त्र विभागाने ही घोषणाही केली की, यंदाच्या मॉन्सूनचे जून ते सप्टेंबर महिन्यांचे देशभरातील एकूण पर्जन्यमान त्याच्या सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के राहण्याची, अर्थात यंदाचा मॉन्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. इकडे मॉन्सून केरळवर दाखल झाला खरा, पण त्याचबरोबर अरबी समुद्रावर एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. ते पुढे उत्तरेकडे सरकत गेले आणि त्याचे रूपांतर निसर्ग नामक चक्की वादळात झाले. निसर्ग वादळाने ३ जूनला अलिबागच्या थोड्या दक्षिणेस किनारपट्टी ओलांडली आणि मग सह्याद्री पर्वत पार करून मध्य महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यानंतर त्याची तीव्रता कमी होत गेली. निसर्ग वादळामुळे जूनच्या सुरुवातीस कोकणात आणि मध्य महाराष्ट्रावर भरपूर पाऊस पडला. पण त्याच्या मागोमाग मॉन्सूनचे रीतसर असे आगमन महाराष्ट्रावर झाले नाही. बरेच दिवस केवळ वादळी स्वरूपाचा पाऊस पडत राहिला. शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या, पण जून महिन्यात महाराष्ट्रातील अनेक भागात व्हावा तेवढा पाऊस झाला नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यंदाचा मॉन्सून जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात द्रुतगतीने धावत निघाला आणि २६ जूनला त्याने संपूर्ण देश व्यापून टाकला. जुलै महिन्यात देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या वेळी, वादळी पाऊस पडत राहिला. आसाम आणि पूर्वोत्तर राज्यात पुराने थैमान घातले. केरळमध्येही अतिवृष्टी झाली. महाराष्ट्रात मात्र पाऊस बेताचाच झाला. अनेक धरणे हळूहळू रिकामी होऊ लागली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणे महाराष्ट्रासाठी अनुकूल असते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात असे क्षेत्र निर्माण झाले आणि त्यानंतरच महाराष्ट्रावर भरपूर पाऊस पडला. राजधानी मुंबईला ३ ऑगस्ट रोजी पावसाने झोडपून काढले आणि २६ जुलै २००५ ची आठवण करून देणारी परिस्थिती उद्भवली. १ जून ते १७ ऑगस्ट २०२० च्या एकूण कालावधीत कोकणपट्टीत सरासरीपेक्षा २२ टक्के, मध्य महाराष्ट्रात २९ टक्के, तर मराठवाड्यात ३६ टक्के अधिक पाऊस झाला आहे. फक्त विदर्भात तो सरासरीपेक्षा ९ टक्के कमी भरला आहे. संपूर्ण भारतात सरासरीपेक्षा ४ टक्के जास्त पर्जन्यवृष्टी झालेली आहे. राज्यातील बहुतेक धरणांत आता भरपूर पाण्याचा साठा आहे आणि अनेक ठिकाणी तर धरणातून पाणी सोडावे लागले आहे. पिकांची परिस्थितीही चांगली आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरावर अजून एका कमी दाबाच्या क्षेत्राच्या निर्मितीची आणि त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. असे झाल्यास ते मॉन्सूनसाठी निश्चितपणे पोषक ठरेल. थोडक्यात म्हणायचे तर, मॉन्सूनची सद्यस्थिती देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी समाधानकारक आहे. 

मॉन्सूनचे वेळापत्रक
यंदाच्या मे महिन्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने मॉन्सूनच्या आगमनाच्या आणि परतीच्या तारखांचे एक नवीन वेळापत्रक जाहीर केले. त्याआधी उपयोगात असलेले वेळापत्रक १९४३ मध्ये बनवले गेले होते. मध्यंतरीच्या काळात केल्या गेलेल्या नोंदी विचारात घेऊन आणि आधुनिक विश्लेषण पद्धतींचा अवलंब करून हे नवे वेळापत्रक तयार केले गेले आहे. तरीही त्यातून महत्वाचा असा निष्कर्ष काढता येतो तो असा की, मॉन्सूनच्या वाटचालीत कोणताही मूलभूत फरक झालेला नाही आणि नवीन तारखा पहिल्यापेक्षा काही दिवस मागेपुढे झालेल्या आहेत एवढेच! केरळवरील आगमनाची सरासरी तारीख पूर्वीचीच म्हणजे १ जून अशीच राहिली आहे. विदर्भात मॉन्सूनच्या आगमनाच्या नव्या तारखा आधीपेक्षा ६-७ दिवस उशीरा, मराठवाड्यात ३-५ दिवस उशीरा, तर मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात १-२ दिवस उशीरा आहेत. मॉन्सूनची माघार मात्र पश्चिम राजस्थानातून १५ दिवसांनी लांबणीवर पडली आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक भागातून मॉन्सूनची माघार आता ५-१० दिवस उशीरा सुरू होणार आहे. अर्थात या सर्व तारखा सरासरी आहेत आणि प्रत्येक वर्षी याच तारखांना मॉन्सून येईल आणि जाईल, अशी कोणीही खात्री देऊ शकत नाही, तशी कोणी आशाही बाळगू नये. पश्चिम राजस्थानवर मॉन्सून पोचण्याची नवीन सरासरी तारीख ८ जुलै असली, तरी मॉन्सून तेथे २६ जूनलाच म्हणजे १३ दिवस आधीच दाखल झाल्याचे आपण या वर्षी पाहिले. मागील ८० वर्षे वापरात असलेले मॉन्सूनचे वेळापत्रक अधिक शास्त्रशुद्ध बनवण्याचा हवामान विभागाचा प्रयत्न निश्चितपणे स्तुत्य आहे. पण नैसर्गिक प्रक्रियांना मानवी चौकटीत बसवायचा प्रयत्न निसर्गाला नेहमीच मान्य होतोच असे मात्र नाही. मॉन्सूनदेखील हवामानशास्त्रज्ञांनी लावून दिलेल्या नव्या वेळापत्रकानुसार मार्गक्रमण करायला निदान या वर्षी तरी उत्सुक नव्हता हे उघड आहे. 

एल-निनो आणि ला-नीना
यंदाच्या मॉन्सूनचे वैशिष्ट्य म्हणायचे तर ते हे की, त्याचा संबंध एल-निनो किंवा ला-नीना या प्रशांत महासागरावरील घटनांशी कोणाला जोडता आला नाही. प्रशांत महासागरावरील तापमान जेव्हा सरासरीपेक्षा अधिक असते तेव्हा त्या परिस्थितीला एल-निनो हे नाव दिले जाते. उलट प्रशांत महासागरावरील तापमान जेव्हा सरासरीपेक्षा कमी असते तेव्हा त्या परिस्थितीला ला-नीना हे नाव दिले जाते. एल-निनो किंवा ला-नीनाच्या घटना दर २-३ वर्षांनी आळीपाळीने निर्माण होत राहतात. अनेक वर्षी एल-निनोचा भारतीय मॉन्सूनवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे अनुभवास आलेले आहे. या प्रतिकूल सहसंबंधाचा आधार घेऊन मॉन्सूनचे भवितव्य धोक्यात असल्याचे आवेशाने सांगणारे अनेक शास्त्रज्ञ या वर्षी अबोल झाल्याचे आपण बघितले. कारण असे की, यंदा प्रशांत महासागर तटस्थ राहिला. एल-निनो उद्भवला नाही किंवा ला-नीनाही नाही. दरवर्षी येणारा मॉन्सून या वर्षीही आला, पण त्यावर कोणत्याही बाह्य घटकांचे दडपण नव्हते. या वर्षीचा मॉन्सून एका अर्थी आत्मनिर्भर असल्याचे आपण पाहिले. सप्टेंबर अखेरीस हवामान विभागाच्या अंदाजानुसार तो सामान्य ठरण्याची आशा आपण बाळगू या.
 ः ९८५०१८३४७५
(लेखक जेष्ठ हवामानतज्ज्ञ आहेत.)

loading image
go to top