दुष्काळात स्वयंपूर्ण शेतीचा आदर्श

Grain
Grain

नव्वद क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी व हरभरा, १५० क्विंटल करडई...हे कोणत्या विक्री केंद्रातील धान्याचे आकडे नव्हेत. तर अंत्रोळी (जि. सोलापूर) येथील रावसाहेब महिमकर यांच्या शेतात उत्पादित धान्याचे आहेत. कमी खर्चिक शेती, छोटेखानी दुग्ध व्यवसाय, मोठ्या प्रमाणात धान्य साठवणूक अशी त्यांची पद्धती आहे. त्यामुळेच दुष्काळाच्या झळा सोसूनही आपले कुटुंब व शेती स्वयंपूर्ण करण्याचा वस्तुपाठच त्यांनी उभा केला आहे.

सोलापूर जिल्ह्यात अंत्रोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील रावसाहेब महिमकर यांची सुमारे ८८ एकर शेती आहे. गावाच्या मुख्य चौकाशेजारीच हे क्षेत्र आहे. पाण्यासाठी विहीर, बोअर आहे. तीन वर्षांपासून पाण्याची मोठी टंचाई जाणवते. एवढ्या मोठ्या शेतीच्या पसाऱ्याला पाण्याचा प्रश्‍न भेडसावतो. पण नियोजन करून चांगली शेती करण्याचा प्रयत्न असतो. 

पिकांचे हुशारीने नियोजन 
गावचे प्रगतिशील शेतकरी नानासाहेब अंत्रोळीकर यांच्या प्रेरणेने महिमकर यांनी विविध प्रयोग केले. सध्या टंचाईमुळे केवळ २७ एकर ऊस वगळता अन्य क्षेत्रावर पिके नाहीत. पण दरवर्षी रब्बीत ज्वारी, गहू, हरभरा, तूर, करडई, मका आदी पिके असतात. कांद्याचे तीन- चार एकर क्षेत्र व भाजीपाला असतो. कांद्याचा मोठा आधार असतो. यंदा तीन एकरांत सुमारे साडेचारशे क्विंटल कांदा मिळाला. दर समाधानकारक नसला तरी खर्च निघून थोडे पैसे मिळाले. ऊस, कांदा या नगदी पिकांमधून घरचा खर्च भागवला जातो. धान्यांची पेरणी ट्रॅक्‍टरद्वारेच होते. ट्रॅक्‍टर घरचाच आहे. तो चालवणाराही घरचाच. बियाणेही घरचेच. यंत्राद्वारेच मळणी होते. त्यामुळे पेरणी मजुरी, डिझेल, कोळपणी, काढणी, मळणी यावरील बहुतांश खर्च वाचतो. तुरीचे एकरी सहा क्विंटल तर ज्वारी, हरभरा आणि करडईचे प्रत्येकी आठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. 

धान्य साठवून योग्य वेळी विक्री 
 रावसाहेबांच्या शेतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे धान्य साठवून ठेवण्याची पद्धत.गेल्या तीन वर्षांत उत्पादित झालेली ९० क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी, १५० क्विंटल करडई, ३० क्विंटल हरभरा, २० क्विंटल गहू आजही त्यांच्या घरी शिल्लक आहे. यंदा त्यातील केवळ तूर विकली.

घरची गरज व बाजारातील दर वाढले तरच विक्रीचा विचार होतो. घरासमोर धान्य साठवणुकीच्या आठ टाक्या आहेत. त्यात ही साठवणूक केली आहे. शिवाय घरातही खोल्यांमध्ये साठवणूक सविधा केली आहे. पोत्यांच्या थप्प्याही रचून ठेवलेल्या दिसतात. धान्य स्वच्छ करण्यासाठी चाळणी यंत्र आहे. ठराविक वेळेला चाळणी करून ते पुन्हा साठवले जाते. अलीकडेच त्यांचे चिरंजीव नरहर यांनी हरभरा, तुरीपासून डाळी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

बॅंकेचा कर्जदार नाही
सुरवातीपासूनच कमी खर्चात आणि बचतीतून शेती करण्याकडे रावसाहेबांचा कल राहिला. मुलांना चांगले शिकवले, त्यांची लग्ने करून दिली. गावात टुमदार घर बांधले. हे सर्व साध्य झाले केवळ शेतीतील उत्पन्नावर. या सगळ्या प्रवासात कधीही बॅंकांकडे हात पसरले नाहीत. आज एकाही बॅंकेचे कर्जदार नसल्याचा त्यांना अभिमान आहे. 

चिपळूणकर तंत्राचा अवलंब
उसाच्या २७ एकरांपैकी सात एकरांत कोल्हापूरचे प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांच्या तंत्राने व्यवस्थापन केले जात आहे. दोन ओळीतील अंतर साडेतीन फूट पण पट्ट्यातील अंतर सात फूट ठेवले आहे. पाणी देताना पट्ट्यातील एकाच सरीला पाणी द्यायचे. त्यामुळे बाजूच्या दोन्ही सऱ्या एकाचवेळी भिजतात. परिणामी पाणी कमी लागते. लागवडीनंतर तणनाशक, त्यानंतर बैलाद्वारे मशागत होते. कोणत्याही प्रकारची मशागत वा खुरपण होत नाही. ऊसवाढीसाठी खतांचाही वापर फार नाही. अन्य १५ एकरांतही केवळ रासायनिक खतांचा मर्यादेत ठेवून एकरी ५४ ते ६५ टनांपर्यंत उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

एकत्रित कुटुंब पद्धतीचे बळ
वय वर्षे ६४ असूनही रावसाहेब घरचा आणि शेतीचा सगळा डोलारा स्वतः सांभाळतात. ट्रॅक्‍टरचे स्टेअरिंग हाती घेऊन नांगरण, फणपाळी ही कामे स्वतः करतात. अण्णाराव हे रावसाहेब यांचे धाकटे बंधू. दोघांच्या कुटुंबातील सदस्य संख्या १९ आहे. सर्व एकत्रितच राहतात. मोठा मुलगा राजू बारावी आणि नरहरी एमएबीडपर्यंत शिकले आहेत. भावाचा मुलगा संगमेश्‍वर एमएबीएड आहे. भावाचा दुसरा मुलगा बसवेश्‍वर केवळ नोकरीत आहे. बाकी बहुतांश सर्व शेतीतच कार्यरत आहेत. घरचे मनुष्यबळ, कमीत कमी खर्च आणि प्रयोगशीलता ही या कुटुंबाच्या प्रगतीची वैशिष्ट्ये आहेत. 

दुग्ध व्यवसायाचा हातभार
आठ म्हशी असून सध्या हिरव्या चाराटंचाईमुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. दररोजच्या २० लिटर दुधापैकी १० लिटर डेअरीला पाठवले जाते. हंगामात हेच दूध ३० ते ३५ लिटरपर्यंत पोचते. दूध विक्रीतून महिन्याला आर्थिक आधार मिळतो.

- रावसाहेब महिमकर, ९६२३१२८३६५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com