दुष्काळातही कौशल्य बहुविध पीक पद्धतीचे

Devidas-Ingale
Devidas-Ingale

नगर जिल्ह्यातील दिघी (ता. कर्जत) येथील शेतकरी काही वर्षांपासून दुष्काळाशी लढत आहेत. येथील देविदास रामहरी इंगळे यांनी या दुष्काळापुढे हार न जाता आपल्या २६ एकर शेतीचे यशस्वी नियोजन केले आहे. केळी, सीताफळ, जांभूळ ही फळपिके, जोडीला कलिंगड, भाजीपाला ही हंगामी पिके व आधार म्हणून ऊस अशी पीकपद्धतीची घडी बसविली आहे. एकेकाळी शेतमजूर असलेले हे कुटुंब आता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहे.

नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्‍यात दिघी हे राज्याचे माजी पाटबंधारेमंत्री आबासाहेब निंबाळकर यांचे गाव असल्याने त्याची राज्यात वेगळी ओळख आहे. जामखेड-कर्जत तालुक्‍यांच्या सीमेवर सीना नदीकाठी हे गाव असले तरी नदीला अनेक वर्षांपासून पाणी आले नाही. या भागात तीव्र दुष्काळ आहे.

यंदा पाऊसच झाला नसल्याने भागात रब्बीची पेरणीच झाली नाही. गावातील देविदास रामहरी इंगळे हे देखील दुष्काळाशी लढा देत शेती कसताहेत. पण त्यांनी हिंम्मत सोडलेली नाही. उपलब्ध पाण्याचे नियोजन करत दुष्काळावर काही प्रमाणात मात करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. सध्या या परिसरात त्यांचे शिवार हिरवेगार दिसत आहे. 

मजूर कुटुंबाची वाटचाल 
इंगळे यांच्या आई-वडिलांनी मजुरी केली. वडिलांनी काही काळ सालगडी म्हणून काम केले. देविदास यांच्यावरही घरची जबबादारी पडल्याने दहावीनंतर शिक्षण घेता आले नाही. सन १९९३ मध्ये सेवा सहकारी सोसायटीत सचीव म्हणून त्यांनी नोकरी स्वीकारली. सध्या त्यांच्याकडे मलठण, निमगाव डाकू व पारेवाडी या तीन गावांच्या सोसायटीची जबाबदारी आहे.  

नोकरी असली तरी शेतीकडे जराही दुर्लक्ष केले नाही. गावाशेजारच्या आघी (ता. जामखेड) शिवारात वडिलोपार्जित चार एकरांत उसाचे चांगले उत्पादन घेतले. त्या वेळी (सोळा वर्षांपूर्वी) सीना नदीवरून पाइपलाइन केली. 

शेतीच्या जोरावरच २००८ मध्ये अडीच एकर, २०१० ते २०१३ या कालावधीत पाच एकर तर २०१२ मध्ये साडेसहा एकर जमीन खरेदी केली. क्षेत्रात टप्प्याटप्प्याने वाढ केली. 

पीकपद्धतीची घडी
  एकूण शेती- २६ एकर
  यात सीताफळ (२ एकर), जांभूळ (एक एकर), केळी (२ एकर) अशी फळबाग
  जून व सप्टेंबर अशा दोन हंगामात कलिंगड
  वांगी, मिरची, ढोबळी मिरची आदी भाजीपाला पिके 
  उसाचेही क्षेत्र  

पाणी व्यवस्थापन 
  जवळपास सर्व क्षेत्र ठिबकखाली
  दिघी व आघी अशा दोन वेगवेगळ्या भागात शेती. दोन्ही ठिकाणी विहिरी आणि आठ विंधनविहिरी.
या भागात आठ ते दहा वर्षांपासून पुरेसा पाऊस नसल्याने विहिरींनी तळ गाठला. सध्या विंधनविहिरींचे पाणी विहिरीत एकत्र करून पीकनिहाय दररोज दीड तास ते तीन तास दिले जाते.  

आंतरपिकांवर भर 
  सुमारे अडीच वर्षांपूर्वी सीताफळ लावले. त्यात कांद्याचे आंतरपीक घेत दोन एकरांत १८  टन उत्पादन घेतले. यंदा बागेत प्रत्येकी एक एकरावर गवार व मिरची. आत्तापर्यंत साठ रुपये प्रतिकिलो दराने दोन क्विंटल गवार तर त्याच दराने दीड क्विंटल मिरचीची विक्री 
  आंतरपीक वांग्याची दोन टन विक्री. मागील काही दिवसांपूर्वी किलोला २४ रुपये दर. सध्या तो १६ रुपये.  
  जांभूळबागेत सिमला मिरची व कलिंगडाचे आंतरपीक. जांभळाची २०० किलोपर्यंत विक्री. (१२० रुपये प्रतिकिलो दराने) 
  सिमला मिरचीची आत्तापर्यंत दोन टन विक्री.  
  कलिंगडाचे एकरी १६ टनांपर्यंत दरवर्षी उत्पादन. यंदा थंडीत दर मात्र कमी म्हणजे सात रुपये प्रतिकिलो मिळाला. 
  सीताफळाचे यंदा प्रथमच उत्पादन. दोन एकरांत साडेचार टन विक्री. दर किलोला १२० ते १६० रुपयांपर्यंत.  
  केळीचे एकरी ३० ते ३५ टन उत्पादन 
  सीताफळ, भाजीपाला- मुंबई येथे विक्री तर केळी, कलिंगडाला स्थानिक व्यापारी
  व्यापाऱ्यांशी सातत्याने संपर्क 

कामांची कसरत
सकाळी सहाला इंगळे यांचा दिवस शेतात राबण्यापासून सुरू होतो. सकाळी दहा वाजेपर्यंत शेती पाहिल्यानंतर ते नोकरीच्या ठिकाणी जातात. उर्वरित वेळेत पत्नी सौ. सविता शेतीचे कामकाज सांभाळतात. नोकरीहून घरी आल्यानंतरही शेतीचा ध्यास सुटत नाही. सध्या आठ मजूर कायम असतात.  
ऊस, केळीत प्रयोगशीलता
दिघी परिसरात पूर्वी सीना नदीला मुबलक पाणी असायचे. त्यामुळे ऊस महत्त्वाचे पीक होते.  भागात पारंपरिक सरी पद्धतीने लागवड असताना इंगळे यांनी १९९२-९३ मध्ये दोन एकरांत पट्टा पद्धतीने ऊस घेतला. एकरी ८० टन उत्पादन घेतले. आता पाणीटंचाईमुळे दोन एकर ऊस कमी केला आहे. जळगाव येथे केळी लागवड तंत्रज्ञानाचे पाच दिवसांचे प्रशिक्षण घेतले. जळगाव येथून ग्रॅंड नैन रोपे आणून २०१० मध्ये दोन एकरांत तर २०१३ साली तीन एकरांत लागवड केली. यंदा आत्तापर्यंत ११ रुपये प्रतिकिलो दराने स्थानिक व्यापाऱ्यांना ५० टन विक्री केली आहे. 

दुष्काळात उमेद कायम  
कर्जत तालुक्‍याला सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. तरीही इंगळे यांनी शेतीतील उमेद व सकारात्मक वृत्ती कायम ठेवली आहे. पाणी उपलब्ध नसल्याने सुमारे दहा एकर क्षेत्र त्यांना कोरडे ठेवावे लागले. यंदाही सुमारे आठ एकर क्षेत्राला फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

ॲग्रोवन मार्गदर्शक 
देविदास म्हणाले, की यंदा दुष्काळात रब्बीची पेरणी नाही. सगळा शिवार कोरडा आहे. मी उपलब्ध पाण्याचे नियोजन केल्यामुळे दुष्काळातही बऱ्यापैकी आधार मिळाला. ॲग्रोवनचा खूप दिवसापासूनचा वाचक असून त्यातील यशकथा व लेख उपयोगी ठरतात.

मुलाचे क्रिकेटमध्ये नैपुण्य
देविदास यांना शेतीत आई निलावती यांचे मार्गदर्शन तर पत्नी सौ. सविता यांची मोलाची साथ मिळते. मुलगा निखिल डाळमिल व्यवसाय सांभाळतो. त्यातून महिन्याला चांगले उत्पन्न मिळते.  मोठा मुलगा स्वप्नील अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून पुण्यात शिकताना त्याने क्रिकेटमध्ये नैपुण्य मिळवले. सध्या त्याच्याकडे हिगोंली जिल्ह्याच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. सिक्कीम राज्याच्या संघाकडून प्रशिक्षणासाठी निवड झाली असून जम्मू-काश्‍मीर राज्य संघाकडूनही तो खेळला आहे.

- देविदास इंगळे- ७३८५४५२२२२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com