आता चारा बी नाय अन् पैसे बी नाईत

माणिक रासवे
रविवार, 2 जून 2019

नागपंचमीपासून पाऊस गायब झाला त्यो आलाच नाही. येलदरी धरण कितीतरी वर्षांपासून भरलं नाही. चारा विकत घेऊन आजवर जनावरं सांभाळली. आता चारा बी नाय अन् पैसे बी नाईत. यंदा पाऊस लवकर आला तर ठीक, नाहीतर चाऱ्यापायी उरली सुरली जनावरेदेखील विकून टाकावी लागतील. पेरणीसाठी पीककर्ज वेळेवर दिले तर बरं, नाही तर सावकारी कर्ज काढल्याशिवाय गत्यंतर नाही. दुष्काळामुळे औंदा बक्कळ माणसं गाव सोडून दुसरीकडं कामाला गेलीत.

हिंगोली - नागपंचमीपासून पाऊस गायब झाला त्यो आलाच नाही. येलदरी धरण कितीतरी वर्षांपासून भरलं नाही. चारा विकत घेऊन आजवर जनावरं सांभाळली. आता चारा बी नाय अन् पैसे बी नाईत. यंदा पाऊस लवकर आला तर ठीक, नाहीतर चाऱ्यापायी उरली सुरली जनावरेदेखील विकून टाकावी लागतील. पेरणीसाठी पीककर्ज वेळेवर दिले तर बरं, नाही तर सावकारी कर्ज काढल्याशिवाय गत्यंतर नाही. दुष्काळामुळे औंदा बक्कळ माणसं गाव सोडून दुसरीकडं कामाला गेलीत. पाऊस लांबला तर समद्यांनाच कामधंद्यासाठी दुसरीकडं जावं लागेल, त्यामुळं गावे ओस पडतील, अशा शब्दांत सातत्याने दुष्काळाचे चटके सोसत असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी या तालुक्यांतील डोंगराळ भागातील शेतकऱ्यांची वर्षभराची भिस्त केवळ खरीप हंगामातील सोयाबीन या प्रमुख पिकावर असते. चारा तसेच अन्नधान्य पीक म्हणून ज्वारीची लागवड केली जाते. खरिपाच्या सुगीनंतर शेती कामे संपतात, त्यामुळे दिवाळी सणानंतर अल्पभूधारक, मजूर कुटुंब उपजीविकेसाठी शहरे गाठतात. वर्षातील चार ते सहा महिने स्थलांतर हा या भागातील लोकजीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. गेल्या काही वर्षातील सततच्या दुष्काळी स्थितीमुळे गाव सोडून जाणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढत आहे. गावे ओस पडत आहेत.

येलदरी, सिद्धेश्वर धरणांनी गाठला तळ
परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या दक्षिण पूर्णा नदीवर येलदरी आणि सिद्धेश्वर ही दोन मोठी धरणं आहेत. येलदरीच्या वरच्या भागात बुलडाणा जिल्ह्यात खडकपूर्णा धरण बांधल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून येलदरी धरण भरत नाही. त्यामुळे सिद्धेश्वर धरणातून औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेना झाले आहे. परिणामी हळद, ऊस, केळी या पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. सद्यःस्थितीत या दोन्ही धरणांतील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने पाणी तळाशी गेले आहे. धरणाच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही धरणे भरण्यासाठी येत्या पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस होण्याची गरज आहे.

गाळ पेऱ्यात खरिपाचा पेरा; पण आमदनी नाही
येलदरी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर जसजसे बुडित क्षेत्र उघडे पडते तसे परिसरातील शेतकरी छोट्या क्षेत्रावर रब्बीमध्ये करडई, गहू, हरभरा पिकांचे उत्पादन घेतात. परंतु गेल्या तीन ते चार वर्षांपासून धरण पूर्ण भरत नसल्याने लिंबाळा, भंडारी, खैरी, होलगिरा आदी गाव परिसरातील धरणांचे बुडित क्षेत्र मोठ्या प्रमाणावर उघडे राहात आहे. त्यामुळे जमिनी धरणात जाण्यापूर्वी वहिवाटीप्रमाणे शेतकरी खरीप हंगामातदेखील सोयाबीन, तूर आदी पिकांची पेरणी करीत आहेत. परंतु पाऊस कमी पडत असल्याने माळरानावरील अत्यंत हलक्या, दगडगोट्यांच्या जमिनीवर पीक उत्पादन मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाया जात आहे.

चारा छावणीला धरणातील उघड्या जमिनीचा आधार
हत्ता नाईक (ता. सेनगाव) येथे गोशाळा आहे. दरवर्षी या भागातून कामासाठी स्थलांतर करणारे शेतकरी खरिपाच्या सुगीनंतर गोशाळेत जनावरे आणून सोडतात. गोशाळेत ११० बैल आणि २२५ गायी आहेत. परंतू यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यावर मार्च महिन्यात चारा छावणी सुरू झाली. त्यामुळे जनावरांची संख्या वाढू लागली. त्यात हिंगोली पोलिसांनी वाहतूक करताना पकडलेले मध्य प्रदेशातील ४३ बैलदेखील या चारा छावणीत दाखल झाले आहेत. सद्यःस्थितीत या चारा छावणीतील जनावरांची संख्या ५५० पर्यंत वाढली आहे. हत्ता या ठिकाणी एवढ्या जनावरांच्या पाण्याची व्यवस्था होत नव्हती. त्यामुळे या ठिकाणाहून सुमारे पाच ते सहा किलोमीटरवरील भंडारी या गावाजवळ येलदरी धरणाच्या उघड्या पडलेल्या क्षेत्रावर चारा छावणी स्थलांतरीत करण्यात आली.

धरणामधून वाहत येणाऱ्या एका ओढ्याच्या मुखाजवळ हिरवे गवत उगवलेले होते. या गवतावर चारा छावणीतील जनावरे सकाळीच्या वेळी चरावयास सोडली जातात. त्यामुळे चाऱ्याची बचत झाली. आजवर या गवतावर गुजराण झाली. परंतु हे गवतदेखील वाळून गेले आहे. ओढ्यामध्ये खोदलेल्या डोहातील पाणी पाइपलाइनद्वारे आणून जनावरांना पिण्यासाठी वापरले जात आहे. गोशाळेमधील कडबा आणि सोयाबीनचे कुटार जनावरे छावणीमध्ये असताना दिले जाते. परिसरातील शेतकरी कामासाठी बैल घेऊन जातात. काम झाले की परत छावणीत आणून सोडतात, असे छावणीचे संचालक शिवाजी महाराज गडदे यांनी सांगितले.

वडहिवराची रेशीम शेती उद्ध्वस्त
अन्य पिकांच्या तुलनेत कमी पाण्यावर येणाऱ्या तुती पिकाची लागवड करून महिन्याकाठी शाश्वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेती उद्योगाकडे वडहिवरा (ता. सेनगाव) येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळले. गावशिवारात तुतीचे क्षेत्र सव्वाशे एकरांपर्यंत वाढले. दर्जेदार रेशीम कोष उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली. डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावाच्या शिवारातील विहिरींना मुबलक पाणी राहात असे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आजवर दुष्काळ अनुभवला नव्हता. परंतु यंदा तब्बल दोन महिने आधी पावसाळा संपल्याने गावात दुष्काळाची दाहकता दिसत आहे. शेतकऱ्यांना ५० ते ६० एकरांवरील तुती उपटून टाकावी लागली. जनावरांच्या चाऱ्यासाठी सोयाबीनचे कुटारदेखील शिल्लक राहिले नाही. त्यामुळे गावातील १५० हून अधिक जनावरे विकून टाकली. हंडाभर पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. गावात पाणीपुरवठ्यासाठी टॅंकर सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

फळबागा होरपळल्या
सेनगाव, हिंगोली, औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी तालुक्यांतील
 संत्रा, मोसंबी, आंबा, पेरू, पपई, केळी बागा वाचविण्यासाठी शेतकरी 
प्रयत्न करत आहेत. परंतु सिंचनासाठी पाणी नसल्याने फळबागा होरपळत 
आहेत.

आमच्या गावाला आजवर दुष्काळ ठाऊक नव्हता. पण औंदा मात्र हंडाभर पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. रेशीम शेतीमुळे महिन्याला पगाराप्रमाणे उत्पन्न मिळू लागल्याने गावात समृद्धी आली होती. नवीन बांधकामे झाली. पण औंदा पाण्याअभावी गावातील शेतकऱ्यांनी निम्म्याहून अधिक जमिनीवरील तुती मोडून टाकली. होत्याचे नव्हते झाल्याने रेशीम उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत.
- उचितराव पोले, रेशीम उत्पादक शेतकरी, वडहिवरा, ता. सेनगाव, जि. हिंगोली

एक एकर तुती आणि एकर एकर ऊस लावला होता. नागपंचमीपासून पाऊस झाला नाही. विहिरीचं पाणी कमी झालं. एकरात कसाबसा १५ टन ऊस निघाला. एका बॅचचे रेशीम कोष उत्पादन घेतले. पण त्यानंतर तुती मोडून टाकावी लागली.
- तुकाराम पोले, वडहिवरा, ता. सेनगाव, जि. हिंगोली

आठ एकर हलकी जमीन आहे. पाणी असलं तर पिकते. गेल्या काही वर्षापासून धरण भरना झालयं. त्यामुळं उन्हाळी भुईमूग घेता येईना. तीन महिने आधीच रानं नांगरून पडली आहेत. पेरणी, पाण्यासाठी पावसाची वाट पाहतोय.
- देवराव कांबळे, लिंबाळा, ता. सेनगाव, जि. हिंगोली

चांगला पाऊस झाल्यावर मनगटावानी होणारी तुरीची धसकटं गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यानं करंगुळीवानी झाली. पाणी असल्यावर भुईमूग पेरले तर धुऱ्यावर चारा होतो. तीन महिन्यांपासून ओढ्याच्या पाझऱ्यांवर गाव पाणी भरतयं. पाऊस लांबला तर पाझरे बंद झाल्यावर पाण्यावाचून गावाचे हाल होतील. 
- गजानन गडदे, लिंबाळा, ता. सेनगाव, जि. हिंगोली

पाच एकर शेती आहे. बैलजोडी, गाय, एक म्हैस आहे. २८०० रुपये शेकड्यानं चारशे पेंढ्या कडबा विकत घेतला. आता चारा बी नाय अन् पैसं बी नाहीत. जनावरांचे हाल सुरू आहेत. पाऊस लवकर पडला तर हिरवं होईल.
- कानबाराव गडदे, लिंबाळा, ता. सेनगाव, जि. हिंगोली

सात एकर शेती आहे. पाऊस लईच कमी झाल्यानं काहीच आमदानी झाली नाही. चारा नसल्यामुळे बैलजोडी विकली. एक गाय आणि म्हैस चारा विकत घेऊन सांभळत आहे. पेरणीसाठी बैलजोडी पाहिजे त्यासाठी चारा छावणीत आलोय. 
- राजाराम गायकवाड, हिवरखेडा, ता. सेनगाव, जि. हिंगोली

दीड एकर शेती आहे. दुसऱ्याची सहा एकर शेती करतो. पण गेल्या वर्षी खर्चही निघाला नाही. दुष्काळाचं अनुदान बॅंकेत येऊन पडलंय. परंतु अजून मिळाले नाही. देतो-देतो म्हणतायंत, कव्हा देणार, पेरणीपस्तोर दिलं तरं बरं होईल.
- सुदाम हराळ, हिवरखेडा, ता. सेनगाव, जि. हिंगोली

दहा एकर जमीन येलदरी धरणात गेलेली आहे. त्यामुळे दुसरीकडे अडीच एकर जमीन घेतलेली आहे. धरण भरत नसल्यामुळे तीन ते चार वर्षांपासून उघड्या पडलेल्या जमिनीवर सोयाबीन पीक घेत आहे. धरणातलं पाणी मागं मागं जात आहे. समद्या हळदीचं हुमणीनं नुकसान केलं. कुठल्याच जमिनीवर आमदनी होईना झाली. 
- सरसाबाई माळोदे, भंडारी, ता. सेनगाव, जि. हिंगोली

हत्ता येथील गोशाळेला चारा छावणी मंजूर झाल्यावर मार्चपासून ती 
सुरू आहे. पण गोशाळेत पाण्याची व्यवस्था नसल्याने भंडारी 
गावाजवळ येलदरी धरणाच्या उघड्या जमिनीवर चारा छावणी हलवावी लागली. 
- शिवाजी महाराज गडदे, चारा छावणी संचालक, हत्ता, ता. सेनगाव, जि. हिंगोली

गेल्या वर्षी पाऊस नाही अन् सिद्धेश्वर धरणाचे पाणीही मिळाले नाही. हळदीच्या उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट आली. केळी, 
पपईच्या बागा होरपळून गेल्या आहेत. उत्पादनातून खर्चही निघाला 
नाही.  
- बाळासाहेब राऊत, तेलगाव, ता. वसमत, जि. हिंगोली

केळी लघू तलाव भरला नव्हता. त्यामुळे हरभरा, गव्हाला पाणी 
मिळाले नाही. महिनाभरापूर्वी तलाव आटला तेव्हापासून गावात पाणी नाही.
 शेतामधून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. 
- काशिनाथ सांगळे, येळी, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drought Fodder Agriculture Loss Water Shortage Money