दुष्काळातही फुलली प्रयोगशील संत्रा शेती

Pravin-Belkhede
Pravin-Belkhede

अत्यंत अभ्यासूवृत्ती, प्रयोगशीलता, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, त्यातून साकारलेले काटेकोर बाग, पाणी, रोग व्यवस्थापन या घटकांच्या जोरावर वाघोली (ता. मोर्शी, जि. अमरावती) येथील प्रवीण बेलखेडे यांनी सुमारे पाच एकरांतील संत्रा झाडांचे उत्पादन व त्याचा दर्जा सातत्याने उत्तम राखण्याचा प्रयत्न केला आहे. आदर्श संत्रा उत्पादक अशी ओळख मिळवली आहे. दुष्काळातही आपली बाग चांगल्या प्रकारे ठेवली आहे.

अमरावती जिल्ह्यात वाघोली (ता. मोर्शी) येथील हा भाग संत्रा पिकासाठी प्रसिद्ध आहे. येथील प्रवीण बेलखेडे यांची सात एकर शेती आहे. यातील पाच एकरांवर संत्रा लागवड आहे. मोर्शी तालुक्‍याचा समावेश पूर्वीपासूनच ‘ड्राय झोन’मध्ये आहे. त्यामुळे नव्या बोअरवेल्स घेण्यावर निर्बंध आहेत. भूगर्भात पाण्याची उपलब्धता कमी असल्याने उन्हाळ्यात बागा जळण्याचे प्रमाण वाढते.

बेलखेडे यांचे काटेकोर नियोजन
शून्य मशागत 

  या प्रयोगात १५ वर्षांपासून सातत्य. त्यातून खर्चात २० टक्‍के बचतीचा उद्देश
  नांगरणी, मशागत होत नसल्याने ‘रूट झोन’ चांगल्या प्रकारे विकसित होतो. 
  झाडांच्या मुळ्या वरच्या सहा इंच भागात विकसित होतात. त्या हवेच्या सान्निध्यात राहतात. त्यामुळे फायटोप्थोरा रोगनियंत्रणासाठी होतो असा अनुभव. 

खत देण्याची पद्धत 
  खतांचा विघटन कालावधी लक्षात घेऊन म्हणजे पाणी देण्याच्या पंधरा दिवस आधी स्फुरद, पालाश यांचा वापर. यांचा विघटन कालावधी १५ ते २० दिवस असल्याने खतांचा अपेक्षित परिणाम साधता येतो. हवेच्या ओलाव्याचाही संबंध राहतो. 
  दीड बाय दीड फुटाचा खड्डा, त्यात शेणखत, डीएपी, ह्युमिक ॲसिड व बुरशीनाशक यांचा  वापर करून खड्डा बुजवून घेतात. मे महिन्यात हे काम होते. जुलै, ऑगस्टमध्ये रोपांची लागवड. या वेळी खड्डा केवळ सहा ते सात इंचच खोदावा असे बेलखेडे सांगतात. पारंपरिक पद्धतीत एक- दीड फूट खोदून अशा खड्ड्यात रोपे लावतात. यामुळे जास्त खोल ‘रूट झोन’ गेल्यास तो सडण्याची भीती राहते. मुळांवरील हल्ल्यामुळे पाने पिवळी पडून वाळतात. दीड फूट उंचीचा बेड केल्यास पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होतो. त्याद्वारे फायटोप्थोरा व तत्सम रोगांवर नियंत्रण मिळविता येते असे बेलखेडे सांगतात. 

फळफांद्यांची वाढ 
लहान झाडांच्या वरच्या बाजूस वाढणाऱ्या फांद्या दोरींच्या साह्याने खालच्या बाजूस बांधतात. यामुळे शाकीय वाढ न होता फळफांद्या व फळांची संख्या वाढते. 

टप्प्याटप्प्याने पाणी कमी करणे 
बागेला ताण देताना काही शेतकरी दोन महिने पाणी देत नाहीत. यामुळे फुलांची संख्या अधिक मिळत असली तरी नवीन पाने येण्यासाठी जागा राहत नाही. परिणामी, झाड सुदृढ राहत नाही. फळांचा आकार योग्य मिळत नाही. बाग ताणावर सोडताना पाणी एकदम बंद करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने ते कमी करतात. 

टॅंकर केला खरेदी
ऑक्‍टोबर २०१८ पासूनच वाघोली परिसरात दुष्काळ पडला. बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी टॅंकरने पाणी विकत घेण्यास सुरवात केली. चार हजार लिटर क्षमतेचा टॅंकर ८०० रुपये दराने उपलब्ध होतो. एकरी तीन टॅंकरची गरज भासते. त्यामुळे पाण्यावरच मोठा खर्च होतो. यावर शाश्‍वत उपाय म्हणून बेलखेडे यांनी १४ हजार लिटर क्षमतेचा टॅंकर खरेदी केला. परिसरातील निंबी, विष्णोरा या गावांतून पाणी आणून ते बागेला दिले.

व्यवस्थापनातील काही मुद्दे 
  सुमारे ३७ वर्षांची ७०० झाड, तसेच १८ व सहा वर्षे वयाचीही झाडे. एकूण संख्या १३०० एकर.
  लागवड अंतरे- १६ बाय ८ फूट, २० बाय १० फूट
  दहा दिवसांनंतर १९-१९-१९ ठिबकद्वारे. पुढे दहा दिवस त्यात सातत्य 
  पावसाची झडी असल्यास नत्र कमी करण्यासाठी ०-५२-३४ खत 
  मार्च, एप्रिल, मेमध्ये पालाशची गरज नसते. अशावेळी १२-६१-० चा वापर
  अशा नियोजनातून बाग लवकर उत्पादनक्षम होते असा अनुभव
  बुंध्याला हुंडी (माती) न लावण्याबाबत मत. कृषी विद्यापीठाची खोडाला माती लावण्याची शिफारस. मात्र त्यामुळे मुळे तयार होतात. पुढे त्यांना पाणी न मिळाल्यास ती वाळतात. परिणामी, पाने पिवळी पडतात असे बेलखेडे सांगतात
  झाडांवरील फळांची संख्या, कॅनोपी, झाडाचे वय या बाबी लक्षात घेऊन खतांचे डोसेस 
  मागील हंगामातील खतांचा ‘बॅकलॉग’ ही विचारात घेतात.
  पूर्वी दिलेले शेणखत, सेंद्रिय किंवा अन्य खतांमधील ‘एनपीके’च्या प्रमाणाचा विचार करून खतांचे नियोजन 
  झाडापासून दीड फूट अंतरावर एक मीटर रुंद पॉलिमल्चिंगचा वापर 
  मल्चिंगखाली लॅटरल. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यास मदत.
उत्पादन
  पाच एकरांत ७० टनांपासून ते ९० टनांपर्यंत. कमाल १०० ते १३० टनांपर्यंतही एखादे वर्ष उत्पादन. 
  शक्यतो आंबेबहार. एकरी खर्च किमान ६० हजार रुपये. 
  विक्री व्यापाऱ्यांना. चार वर्षांपूर्वी बाजारात तीन रुपये प्रति किलो दर असताना पुण्यात काही संत्रा उत्पादकांच्या सहकार्याने थेट विक्री. त्या वेळी किलोला ३० रुपये दर मिळाला.

शेतकऱ्यांत प्रसार 
‘जे जे आपणांसी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करुनी सोडावे सकल जन’ या संत विचाराप्रमाणे बेलखेडे यांनी आपल्याकडील माहिती व तंत्राचा प्रसार केला आहे. माती, पानांचे परीक्षणही करण्याचा सल्ला ते शेतकऱ्यांना देतात.

- प्रवीण बेलखेडे - ९४२००७५२२४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com