पूर्वमोसमीच्या सरींचाही दुष्काळ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 May 2019

उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. धरणे तळाशी गेल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच आता चाराटंचाईचे संकटही उभे राहिले आहे. यातच पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी काहीसा दिलास मिळण्याची अपेक्षाही फोल ठरली आहे.

पुणे - उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. धरणे तळाशी गेल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच आता चाराटंचाईचे संकटही उभे राहिले आहे. यातच पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी काहीसा दिलास मिळण्याची अपेक्षाही फोल ठरली आहे. राज्यात यंदा पूर्वमोसमी पावसाचाही दुष्काळ असल्याचे दिसून येत असून, १ मार्च ते २४ मे या कालावधीत सरासरी ६.६ म्हणजे अवघा २६ टक्के पाऊस झाला आहे. 

नगर, पालघरमध्ये वळवाच्या सरी पडल्याच नाहीत, तर सोलापूर, उस्मानाबाद, परभणी, भंडारा, गोंदिया वगळता उर्वरित सर्वच जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने तीव्र ओढ दिली आहे. गतवर्षी सुरवातीच्या दोन महिन्यांत झालेल्या पावसाने धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला होता. मात्र परतीच्या पावसाने ओढ दिल्याने हा पाणीसाठा यंदा अपुरा पडला. काही जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाईने डोकेवर काढले. त्यानंतर सातत्याने पाणीटंचाईत वाढ होतच राहिली. सध्या राज्यातील तब्बल चार हजार सहाशे १५ गावे आणि सुमारे दहा हजार वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पूर्वमोसमीच्या सरींनीही पाठ फिरविल्याने टंचाईची तीव्रता वाढतच असल्याचे चित्र आहे. 

पूर्वमोसमी हंगाम संपण्यास शेवटचे काही दिवस शिल्लक आहे. २४ मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्याच्या दक्षिण भागात असलेल्या कोल्हापूर, सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि पूर्व भागातील भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांतच काही प्रमाणात पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. गोंदियात सर्वाधिक २४.७ मिमी (७८ टक्के) पाऊस पडल्याचे दिसून आले आहे. तर नगर, पालघर जिल्हे, मुंबई शहर, उपनगरांत एक टक्काही पाऊस झाला नाही. तसेच ठाणे, हिंगोली, धुळे, नंदूरबार येथील पावसाची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. तर दहा जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या १० टक्केही पाऊस पडलेला नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

कोकण विभागात सर्वांत कमी पाऊस
महाराष्ट्राकडे यंदा पूर्वमोसमीच्या सरींनी चांगलीच पाठ फिरविली आहे. वादळी वारे, गारपिटीसह झालेल्या काही सरी वगळल्या तर वळवाच्या पावसाने हजेरी लावली नाही. महाराष्ट्रातील चार हवामान विभागांचा विचार करता कोकणात यंदा सर्वांत कमी ०.८ मिलिमीटर (४ टक्के), विदर्भात ६.८ मिमी (२५ टक्के), मराठवाड्यात ६.१ मिमी (२७ टक्के), तर मध्य महाराष्ट्रात ८.३ मिलीमीटर (३० टक्के) पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवर स्पष्ट होत आहे. 

देशातही सरासरीपेक्षा कमी पाऊस
१ मार्च ते ३१ मे या कालावधीत पूर्वमोसमी पावसाचा हंगाम असतो. या काळात देशात सरासरी ११५ मिलिमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ८८.९ मिलिमीटर (७७ टक्के) पाऊस पडला आहे. यातही राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये सरासरीपेक्षा अधिक, पंजाब, हरियाना, बिहार, सिक्कीम, आसाम, मेघालय, त्रिपुरा, ओडिशा राज्यांत सरासरी इतका, तर उर्वरित सर्वच राज्यांत सरासरीपेक्षा अपुरा पाऊस पडला आहे. यातही महाराष्ट्र, गुजरात मिझोराम, तमिळनाडूमध्ये पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे.

फणी वादळाने पूर्व भारतात स्थिती सुधारली
बंगालच्या उपसागरात २५ एप्रिलच्या दरम्यान तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन त्याचे २७ एप्रिल रोजी फणी चक्रीवादळात रूपांतर झाले. पूर्व किनारपट्टीलागत उत्तरेकडे सकरत असलेली ही प्रणाली अतितीव्र होऊन तीन मे रोजी सकाळच्या सुमारात या महावादळाने ओडिशाच्या किनाऱ्याला धडक दिली. त्यानंतर वादळाची तीव्रता कमी होऊन वादळ बंगाल, बांगलादेशकडे सरकून गेले. या दरम्यान पूर्व किनाऱ्यावरील विशेषत: ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडला. तर पश्चिमी चक्रावातांच्या प्रभावामुळे राजस्थानसह, मध्य प्रदेशासह उत्तर आणि वायव्य भारतातील राज्यात पूर्वमोसमी पावसाची स्थिती सुधारली. उर्वरित राज्यात मात्र पावसासाठी पोषक हवामान तयार झाले नाही. 

यंदाच्या पूर्वमोसमी हंगामात कमी दाब क्षेत्र आणि कमी दाब पट्ट्यांची निर्मिती खपूच कमी प्रमाणात झाली. त्यामुळे समुद्रावरून बाष्प उपलब्ध होऊ शकले नाही. पूर्वमोसमी पावसाच्या काळात महाराष्ट्रात हवेची दिशा ही पश्चिमेकडून अपेक्षित असते. मात्र यंदा ती खूप कमी काळ पश्चिमेकडून, तर अधिक काळ उत्तरेकडून होती. यामुळेही पावसाच्या प्रमाणावर परिणाम झाला. यातच महाराष्ट्रात काळी जमीन असून, पूर्वमोसमी पाऊस न पडल्याने त्यातील आर्द्रता कमी होऊन उष्णतेच्या लाटा अनुभवायला मिळाल्या. 
- डॉ. अनुपम कश्यपी, वरिष्ठ शास्त्रज्ञ, हवामान विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drought of pre-monsoon