दुष्काळात पाझरला माणुसकीचा झरा

अशोक पवार व बाळासाहेब बिराजदार (उजवीकडे)
अशोक पवार व बाळासाहेब बिराजदार (उजवीकडे)

दुष्काळात शेतीची अक्षरक्षः होरपळ सुरू आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न उभा आहे. अशा भीषण संकटात आपल्याकडील पाणी दुसऱ्याला देऊन स्वतःबरोबर दुसऱ्यांची शेती जगवण्याचे मोलाचे कार्य भुयार चिंचोली (जि. उस्मानाबाद) येथील काही शेतकरी मंडळींनी केले आहे. दुसऱ्यांसाठी दूत झालेल्या या मंडळींनी हरवत चाललेल्या माणुसकीचे जिवंत दर्शनच घडवले आहे. करपून गेलेल्या पिकांनी म्हणूनच पुन्हा उभारी घेत गावाचे शिवार हिरवेगार केले आहे.

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर उस्मानाबाद जिल्ह्यात भुयार चिंचोली (ता. उमरगा) गाव लागते. पाच हजार लोकसंख्येच्या या गावचे भौगोलीक क्षेत्र एक हजार हेक्‍टरपर्यंत आहे. सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ऊस, गहू, हरभरा अशी पिके गावात दिसून येतात. साठवण तलावाच्या पाणलोट क्षेत्रात गाव येत असले तरी सरसकट त्याचा लाभ गावाला होत नाही. त्यामुळे गावचा निम्मा भाग कोरडवाहूच असतो.  

पाण्यावरच शेतीचं गणित
विहीर व बोअर हे पाण्याचे मुख्य स्त्रोत असले तरी पावसावरच गावच्या शेतीचे गणित अवलंबून आहे. थोडा पाऊस पडला तरी काही शेतकऱ्यांकडे विहीर आणि बोअरची पाणी पातळी टिकून असते. यंदा दुष्काळात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गावात तेवढाच गंभीर झाला. खरीप हातचा गेला. रब्बीही जाण्याच्या मार्गावर होता. पण अशा परिस्थितीत एक शेतकरी दुसऱ्याच्या मदतीला धावला आणि हे भीषण संकट टळलं. 

पवार यांच्या माणुसकीचे दर्शन 
गावातील अशोक पवार यांची सुमारे ३० ते ३५ एकर शेती आहे. तीन एकर ऊस, पाच एकर ज्वारी, तीन एकर गहू, सात एकर हरभरा अशी पिके आहेत. सगळी शेती विहिरीच्या पाण्यावर. चाळीस फूट खोल विहीर आहे. यंदा दहा फुटांपर्यंत पाणी होते. गेल्या महिन्यात ऊस कारखान्याला गेला. गहू आणि हरभऱ्यालाही पाणी यापूर्वीच दिले. ज्वारीला पाण्याची त्वरित गरज नव्हती. केवळ उसाला पाणी लागणार आहे. सध्याच्या पाण्यावर उन्हाळा सरेल अशी स्थिती होती. या उलट शेजारचे अल्पभूधारक बाळासाहेब बिराजदार यांच्या शेतीची अवस्था मात्र बिकट होती. त्यांची एक एकर ज्वारी जळून चालली होती. त्यांची शेतीच मुळात एक एकर. ज्वारी संपली तर सगळंच संपणार होते. अशा बिकट प्रसंगी आपल्यासाठीच्या पाण्याची पर्वा न करता पवार हे बिराजदार यांच्यासाठी जणू दूत म्हणूनच धावून गेले. त्यांनी आपले पाणी बिराजदार यांच्या शेतीला देण्याचे ठरवले. या पाण्यावरच बिराजदार यांची करपू लागलेली ज्वारी पुन्हा फुलू लागली. शिवारात हिरवा रंग खुलू लागला. दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्वारीचे १० ते १२ कट्टे उत्पादन मिळेल अशी आशा बिराजदार यांच्या मनात आता पल्लवीत झाली आहे.

अमर यांची मोलाची मदत 
गावातील अमर पवार यांचीही २० ते २५ एकर शेती. ते अशोक यांचे मोठे बंधू. त्यांच्या विहिरीतही १० फुटांपर्यंत पाणी आहे. करडई, ऊस, हरभरा, गहू अशी पिके आहेत. ऊस तोडणी झाली आहे. त्यांनीही भावाचाच आदर्श गिरवला. आपले शेजारी सुरेश बिराजदार यांना पाणी दिले. सुरेश यांच्याकडे दुभत्या गाईसह दोन बैल आहेत. आता कडवळाची चिंता मिटली आहे. ऐन उन्हाळ्यात चाऱ्याची उपलब्धता होणार आहे.

डोळ्यात आले पाणी 
बाळासाहेब आणि सुरेश अल्पभूधारक असल्याने घर चालवण्यासाठी तिसऱ्या हिश्‍श्‍याने अन्य शेतकऱ्यांची शेती त्यांना करावी लागते. अशावेळी पवार बंधूंनी मदत फार मोलाची ठरली. साहजिकच त्यांच्या डोळ्यात आनंदाने पाणी उभे राहिले आहे.  

यंदा उत्पादनाचे काही खरे नाही 
भुयारचिंचोलीत सुमारे ६०० विहिरी तर ४०० बोअर्स आहेत. काही मोजक्‍याच विहिरी, बोअर्सना पाणी आहे. गावात दरवर्षी सरासरी ३५० हेक्‍टरवर ज्वारी, १०० हेक्‍टरवर ऊस, प्रत्येकी ५० हेक्‍टरवर गहू व  करडई, ३०० हेक्‍टरवर गहू   व अन्य चारा आदी पिके असतात. यंदा त्यात जवळपास निम्म्याने घट झाली आहे. उत्पादनाचा अंदाज देणे शक्य नाही. केवळ एकमेकांनी केलेल्या मदतीमुळे यंदाचा हंगाम व शेतकरी तरुन जातील हेच वास्तव आहे.

इतरांनी घेतली प्रेरणा 
पवार बंधू गावातील अन्य शेतकऱ्यांसाठीही प्रेरणास्थान ठरले. दुष्काळाच्या दाहात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यातूनच मदतीचे हात उभे राहू लागले. गावातील संजय पाटील यांनी महादेव बिराजदार यांना, विजय पाटील यांनी भीमाशंकर हिरमुखे, श्रीरंग बिराजदार यांनी बंकाबाई बिराजदार यांना आपल्याकडील पाणी देत त्यांचा रब्बी सुखकर केला. आपल्याला झेपेल तशी एकमेकांना मदत करण्याच्या या वृत्तीमुळे एकमेकांविषयीचा आदर, प्रेम वाढले. दुष्काळातही माणुसकीला पाझर फुटला.

शेजारधर्म पाळणे ही आपली संस्कृती आहे. संकटाच्या वेळी तर दुसऱ्यांसाठी धावून जाणे हे कर्तव्यच आहे. त्याचेच पालन आम्ही करतोय.  
- अशोक पवार, ८२०८९१६३४४, भुयारचिंचोली 

दुष्काळात ज्वारी हातून जाणार अशीच स्थिती होती. मात्र पवार यांनी केलेल्या मोलाच्या मदतीमुळे आमच्या शेतीचे चित्रच पालटून गेले. 
- बाळासाहेब बिराजदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com