esakal | लॉकडाउनच्या काळातही 'या' बहाद्दराने केली कोट्यवधीची उलाढाल; संधीचं केलं सोनं
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाउनच्या काळातही 'या' बहाद्दराने केली कोट्यवधीची उलाढाल; संधीचं केलं सोनं

प्रगतिशील केळी उत्पादक व निर्यातदार किरण डोके यांनी ओळखली . लॉकडाउनच्या महिनाभराच्या काळात अनेक अडचणींवर मात करत तब्बल एक हजार टन केळी निर्यातीचा यशस्वी पल्ला त्यांनी गाठला.  

लॉकडाउनच्या काळातही 'या' बहाद्दराने केली कोट्यवधीची उलाढाल; संधीचं केलं सोनं

sakal_logo
By
मंदार मुंडले

पुणे - रमजान सणासाठी आखाती देशांत वाढलेली केळीची मागणी व संधी कंदर (जि. सोलापूर) येथील प्रगतिशील केळी उत्पादक व निर्यातदार किरण डोके यांनी ओळखली. लॉकडाउनच्या महिनाभराच्या काळात अनेक अडचणींवर मात करत तब्बल एक हजार टन केळी निर्यातीचा यशस्वी पल्ला त्यांनी गाठला. भागातील ४१ शेतकऱ्यांना निर्यात बाजारपेठ व समाधानकारक दर मिळवून देण्यात डोके यशस्वी ठरले. निर्यात व देशांतर्गत विक्री असा एक कोटींपर्यंत उलाढालीचा टप्पा त्यांनी साध्य केला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोलापूर जिल्ह्यातील कंदर (ता. करमाळा) येथील किरण डोके प्रगतिशील केळी उत्पादक व निर्यातदार म्हणून ओळखले जातात. भागातील सुमारे ६० शेतकरी सभासद असलेली ‘सन स्टार ए वन’ ही शेतकरी उत्पादक कंपनी त्यांच्या पुढाकाराने स्थापन झाली आहे. दरवर्षी ते आपल्याकडील केळींसह परिसरातील शेतकऱ्यांकडील केळी आखाती देशांत निर्यात करतात. मात्र कोरोना संकटामुळे मार्चपासून देशासह राज्यातही संपूर्ण लॉकडाउन सुरू झाला आणि केळी निर्यात साखळी अडचणीत आली. रमजानचा कालावधी तोंडावर येउन ठेपला होता. आखाती देशांकडून केळीला मागणी वाढत होती. निर्यात प्रक्रिया कोलमडली होती. संकटात भर म्हणून की काय स्थानिक बाजारपेठेत केळीला किलोला तीन ते चार रूपयांपुढे दर देण्यास व्यापारी तयार नव्हते. 

धैर्य, संयमातून शोधला मार्ग 
लॉकडाउनच्या काळात डोके यांनी धैर्य व संयमी वृत्ती यांच्या आधारे संकटांशी सामना करण्याचे ठरवले. कंदर या केळी पट्ट्यातील शेतकरी सहकारी, कृषी विभाग, निर्यातीशी संबंधित अधिकारी, आयातदार देशांतील खरेदीदार यांच्यासोबत वेळोवेळी सल्लामसलत करून निर्यातप्रक्रिया सुकर करण्याचे प्रयत्न केले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, फलोत्पादन विभागाचे तांत्रिक अधिकारी व निर्यात तज्ज्ञ गोविंद हांडे, केळीतज्ज्ञ के. बी. पाटील यांचे त्यांना चांगले सहकार्य मिळाले. 

Video : आठ बाय आठ फुटांच्या खोलीत, कसं पाळायचं डिस्टंसिंग?

रमजान काळात पटकावली संधी 
मोठ्या उमेदीने मार्चच्या २१ तारखेपासून आखाती देशांत केळीचे कंटेनर जाण्यास सुरूवात झाली. ६० टनांपासून सुरू झालेल्या निर्यातीत सातत्य ठेवत डोके यांनी २४ एप्रिलपर्यंत ५० कंटेनर्स (प्रति कंटेनर २० टन) म्हणजे तब्बल एक हजार टन निर्यातीचा पल्ला गाठला. नुकतीच त्यात ४० टनांची भर पडली आहे. रमजान सुरू झाल्यापासून आखाती देशांत केळीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. या पार्श्‍वभूमीवर इराण, सौदी अरेबिया, ओमान, कतार आदी देशांमध्ये प्रत्येक आठवड्याला १० कंटेनर्स केडी फ्रूट्स नावाने पाठवण्यात येत आहेत. 

शेतकऱ्यांना समाधानकारक दर 
डोके म्हणाले की, कोरोनाच्या काळात स्थानिक व्यापाऱ्यांकडून किलोला केवळ तीन ते चार दर देउन केळी उत्पादकांची अक्षरश- फसवणूक केली जात होती. अशावेळी निर्यातीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सावरण्याचा प्रयत्न केला आहे. निर्यातीसाठी किलोला सहा ते सात रूपये दर मिळाला. नुकताच तो साडेसात रुपयांवर गेला आहे. किलोला किमान तीन रूपये जास्त गृहीत धरले तरी प्रतिकंटेनर म्हणजे २० टनांमागे ६० हजार रूपये शेतकऱ्यांना जास्तीचे मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. 

स्थानिक बाजारात अकराशे टन विक्री 
डोके म्हणाले, की केवळ निर्यातीमुळे महिनाभराच्या कालावधीत सुमारे ६५ ते ७० लाख रूपयांची उलाढाल साधली. मुंबई, दिल्ली आदी बाजारपेठांमधूनही अकराशे टन केळींची विक्री केली. अशा प्रकारे संकटाच्या काळात निर्यात व देशांतर्गत मिळून शेतकरी स्तरावरील मालाच्या उलाढालीचा टप्पा एक कोटी रूपयांपर्यंत नेण्यात सामूहिक प्रयत्नांतून यश मिळाले. 

आत्तापर्यंतची केळी विक्री 
- निर्यात- १०४० टन 
- सहभागी शेतकरी- ४१ 
- दर (प्रति किलो)- ५६० टन (७ रूपये), ४४० टन (सहा रूपये) 

- देशांतर्गत विक्री- ११०० टन 
- सहभागी शेतकरी- ८० 
- दर - तीन ते साडेचार रूपये 

संपर्क- किरण डोके- ९०४९१२५१३३