प्रयोगशील शेतकरी यांनी पारंपारिक शेतीपद्धती बदलून फळबागेतून लाभले आर्थिक स्थैर्य

custard-apple
custard-apple

पांगारे (ता.पुरंदर,जि.पुणे) येथील प्रयोगशील शेतकरी बापू यशवंत शेलार यांनी कुटुंबाच्या सहकार्याने माळरानावर सीताफळाची चांगली बाग जोपासली आहे. दर्जेदार उत्पादन घेत राज्याच्याबरोबरीने गुजरात, कर्नाटक बाजारपेठेत सीताफळांची विक्रीकरून चांगला दर त्यांनी मिळविला आहे. 

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याच्या पश्‍चिम भागात असलेल्या पांगारे गावशिवारात पाऊसमान चांगले आहे. पावसाच्या पाण्यावर या भागात ज्वारी, बाजरी, हरभरा, पावटा या पिकांची लागवड होते. मात्र या पिकांतून किफायतशीर आर्थिक उत्पन्न मिळत नसल्याने पांगारे गावातील शेलार कुटुंबाने २००५ साली नगदी पीक म्हणून अडीच एकरावर सीताफळाची लागवड केली. पहिल्यापासून चांगले व्यवस्थापन ठेवल्याने सीताफळाने त्यांना चांगली आर्थिक साथ दिली. या दरम्यान त्यांनी शेतीसाठी तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणले. पाण्याची उपलब्धता झाल्याने आठ एकर क्षेत्र बागायती झाले. शेती उत्पन्नातून त्यांनी ट्रॅक्टर आणि अवजारे घेतली आहेत. शेलार यांचे एकत्र कुटुंब आहे. संजय, बापू आणि जितेंद्र तिघे बंधू शेती नियोजन पाहतात. कुटुंबातील सर्वजण शेती नियोजनात असल्याने फारसे मजूर घ्यावे लागत नाहीत. शेलार बंधूंना शेती नियोजनात वडील यशवंत आणि आई शालन यांचेही मार्गदर्शन लाभते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

फळबाग लागवडीकडे कल 
शेलार यांच्याकडे आठ एकर क्षेत्र असून, यांपैकी चार एकर क्षेत्रावर सीताफळाची बाग आहे. २००५ साली शेलार यांनी अडीच एकरावर सीताफळाच्या पुरंदर स्थानिक या जातीची १४ बाय १४ फुटावर लागवड केली. बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन शेलार यांनी २०१७ मध्ये दीड एकरावर सीताफळाची नवीन लागवड १२ बाय १४ फुटांवर केली. याचबरोबरीने तीन वर्षापूर्वी पेरूची एक एकर लागवड केली आहे. हंगाम, पाण्याची उपलब्धता पाहून उर्वरित क्षेत्रावर झेंडू, टोमॅटो, कांदा, गहू, हरभरा लागवड केली जाते. बागेच्या बांधावर शेलार यांनी आंब्याची ३५ कलमांची लागवड केली आहे. सध्या सीताफळाच्या जुन्या बागेतून उत्पादन सुरू झाले आहे. 

शेलार यांच्या शेतीमध्ये दोन कूपनलिका आहेत. पुरेशा पाणी पुरवठ्यासाठी शेलार कुटुंबीय आणि परिसरातील दोन शेतकऱ्यांनी मिळून २००८ मध्ये एकत्रपणे खर्च करून पिलानवाडी धरणातून तीन किलोमीटरची पाइपलाइन करून शेतात पाणी आणले. या धरणातून आठ महिने पाणी पुरवठा होतो. या भागात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने तीन-चार महिने पिकांना पाणी द्यावे लागत नाही. उन्हाळ्यात दोन महिने काटेकोर पाणी व्यवस्थापन केले जाते. सीताफळ बागेला पाटपाणी दिले जाते. मिरची, टोमॅटो आदी पिकांना ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. 

अॅग्रोवनची मोलाची मदत 
शेलार कुटुंबीय अॅग्रोवनचे नियमित वाचक आहेत. पारंपारिक शेतीपद्धती बदलून फळबागेकडे वळण्यात अॅग्रोवनमधून मिळालेली माहिती त्यांना मार्गदर्शक ठरली. अॅग्रोवनच्या माध्यमातून भाजीपाला, फळ उत्पादनातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली, शेतीपद्धतीत सुधारणा करताना अॅग्रोवनचे बहुमोल मार्गदर्शन मिळाल्याचे बापू शेलार सांगतात. 

असे आहे हंगाम नियोजन 
सीताफळ बागेच्या नियोजनाबाबत बापू शेलार म्हणाले की, मी १५ फेब्रुवारी ते १ एप्रिल बागेला ताण देतो. साधारणपणे १५ मार्च रोजी छाटणी केली जाते. त्यावेळी प्रती झाड १५ किलो शेणखत आळ्यात मिसळून देतो. पाणी देण्यापूर्वी बागेत काकऱ्या घेऊन धेंचा किंवा तागाचे बियाणे पेरून देतो. यानंतर झाडाच्या खोडावर बोर्डोमिश्रणाची फवारणी केली जाते. पिढ्या ढेकूण किडीच्या नियंत्रणासाठी जमिनीपासून झाडाच्या खोडावर दीड फूट उंचीवर अडीच इंची चिकट टेप खोडाभोवती गुंडाळतो. यामुळे पिठ्या ढेकूण किडीची पिल्ले झाडावर जात नाहीत. त्यामुळे पुढे झाडावर किडीचा प्रादुर्भाव होत नाही. 

१) साधारणतः: १ एप्रिल रोजी झाडांना पाणी सोडण्यात येते. एप्रिल व मे महिन्यात उन्हाचा चटका वाढला तरी हिरवळीच्या पिकामुळे जमीन अधिक तापत नाही. बागेत तापमान नियंत्रित राहिल्यामुळे झाडाला कळी चांगली येत. झाडांना गरजेनुसार पाणी दिले जाते. 

२) सीताफळाचे उत्पादन घेताना सेंद्रिय निविष्ठांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेणखत, शेणस्लरी बरोबरच ताग, धेंचा या हिरवळीच्या खतांचा वापर केला जातो. 

३) पहिले पाणी दिल्यानंतर २० दिवसांनी २०० लिटर पाण्यात चार लिटर देशी गाईचे मूत्र मिसळून फवारणी केली जाते. त्यानंतर दहा ते १५ दिवसांनी याच प्रमाणात देशी गाईच्या दुधापासून तयार केलेल्या ताकाची फवारणी (२०० लिटर पाण्यात ४ लिटर ताकाचे मिश्रण) घेतली जाते. यामुळे कळी गळत नाही, झाडाची जोमदार वाढ होते. चांगली फळधारणा होण्यास मदत होते. 

४) पाण्यातूनही बागेत दोन वेळा शेण स्लरी दिली जाते. यामुळे जमीन भुसभुसीत होते. झाडाला अन्नद्रव्यांचा चांगला पुरवठा होतो. फळवाढीच्या टप्यात बागेचे काटेकोर व्यवस्थापन ठेवल्याने कीड,रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या सल्याने व्यवस्थापन केले जाते. 

५) बागेत १ ऑगस्टपर्यंत फळे तयार होतात. साधारणपणे १५ सप्टेंबरपर्यंत सीताफळाचा हंगाम पूर्ण होतो. या काळात सीताफळाला दर चांगले मिळतात. 

६) हंगाम संपल्यानंतर दर महिन्याला झाडांना पाणी दिले जाते. १५ फेब्रुवारीनंतर पाणी देणे बंद केले जाते. १५ मार्चपासून नव्या हंगामाची तयारी सुरू होते. 

७) सध्या झाडाची उंची सात फूट आहे. दरवर्षी एका झाडापासून २० किलो फळे मिळतात. 

स्वत:च करतो फळांची विक्री 
बापू शेलार यांना सीताफळ बागेच्या व्यवस्थापनाबाबत तत्कालीन आत्मा संचालक सुनील बोरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. शेलार यांनी बंगळूरू, सुरत, अहमदाबाद येथील बाजारपेठेत सीताफळ पाठविण्यास सुरुवात केली. स्थानिक बाजारापेक्षा परराज्यात चांगला दर मिळाल्याने स्वत: बरोबरच इतर शेतकऱ्यांची सीताफळे, डाळिंबाची खरेदी करून त्यांनी विक्री सुरू केली आहे. यामुळे शेतीबरोबरच आणखी एक उत्पन्नाचे साधन मिळाले. 

हंगाम सुरू झाल्यानंतर दररोज सीताफळ व डाळिंब चार टन ते सहा टन माल राज्याबाहेर पाठविला जातो. रोखीने व्यवहार होत असल्याने शेतकऱ्यांनाही फायदा होतो. सीताफळाचे बॉक्समध्ये पॅकिंग केले जाते. त्यामुळे फळे चांगली राहतात. एका क्रेटमध्ये २० किलो फळे बसतात. शेलार यांना बाजारपेठेत वीस किलो फळांना ५५० ते २२०० रुपये दर मिळालेला आहे. गेल्यावर्षी खर्च वजा जाता शेलार यांना सीताफळ बागेतून चार लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. 

संपर्क - बापू शेलार, ९९२२१४०१४८ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com