गांडूळखत व्यवसाय विस्तारातून अर्थकारण बनवले भक्कम

गांडूळखत व्यवसाय विस्तारातून अर्थकारण बनवले भक्कम

लोहगाव (जि. परभणी) येथील अल्पभूधारक सीताराम ऊर्फ बबनराव देशमुख यांनी अत्यंत कमी खर्चात गांडूळ खतनिर्मिती व विक्री व्यवसाय यशस्वी केला आहे. वर्षाला सुमारे ५० टन खताची विक्री ते करतात. सोबत अंजिराची व्यावसायिक शेती व रोपवाटिका याद्वारे त्यांनी उत्पन्नाचे स्रोत वाढवले आहेत.   

सीताराम ऊर्फ बबनराव देशमुख यांची लोहगाव (ता. जि. परभणी) शिवारात दोन एकर जमीन आहे.विहिरी, बोअरची व्यवस्था आहे. पावसाचा अनियमितपणा, अल्प प्रमाण यामुळे सातत्याने दुष्काळी स्थिती उद्भवत आहे. या परिस्थितीत दोन एकरांतून संपूर्ण कुटुंबाची उपजीविका चालविण्याएवढे उत्पन्न पुरेसे होत नव्हते. मग सीताराम यांना सालगडी, जायकवाडी कालव्यावर पहारेकरी, शेतमजूर अशी अंगमेहनतीची कामे करावी लागली. आपल्या शेतीत ते कापूस, सोयाबीन आदी पिके घेत. 

ॲग्रोवनने दिली दिशा  
सन २०१२-१२ च्या दरम्यान कृषी विभागाच्या योजनेंतर्गत सिमेंटचे हौद बांधून गांडूळ खतनिर्मिती सुरू केली. त्याच्या वापरातून जमिनीची सुपीकता वाढू लागली. घरच्या शेतात वापरून शिल्लक खताची विक्री सुरू केली. दरम्यान सीताराम यांची यशकथा ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद येत व्यवसायाला अधिक चालना मिळाली. 

पूरक उद्योगांचा समर्थ आधार  
दुष्काळी स्थितीत अंजीर तसेच एक एकरांतील भाजीपाला उत्पादनावर परिणाम होतो. आर्थिक अडचणी येतात. मात्र, गांडूळखत व कल्चर विक्री, रोपवाटिका या पूरक उद्योगांतून उत्पन्नाचे स्रोत सक्षम केले आहेत. दोन मुलींचे विवाह केले. दोन मुले आणि एक मुलगी शिक्षण घेत आहे. पत्नी वनमालाताई यांची शेती, गांडूळ खतनिर्मितीसाठी खंबीर साथ मिळते. कधीकाळी शेतमजूर असलेल्या सीताराम यांच्याकडे आज शेती व पूरक व्यवसायांतील कामांसाठी एक सालगडी, दोन मजूर आहेत. लोहगाव शिवारातील एका शेतकऱ्याची दोन एकर शेती भाडेतत्त्वावर तर कौडगाव शिवारात पाच एकर शेती बटईने केली आहे. आगामी काळात रोपवाटिका, गांडूळ खतनिर्मितीचा अजून विस्तार करायचा आहे.

ॲग्रोवनमुळेच घर बांधले
काही वर्षांपूर्वी सीताराम यांची यशकथा ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या वेळी गांडूळ खतनिर्मितीची केवळ सुरुवात होती. ॲग्रोवनच्या माध्यमातून चारशेहून अधिक फोनकॉल्स आले. साठ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्या रकमेचा आधार घेऊन शेतात घर बांधले. पुढील काळात अंजिराची बाग दुष्काळात सापडली. अशावेळी बाग जगवण्यासाठी पैसा आवश्‍यक होता. बॅंक बाकी कशावरच कर्ज द्यायला तयार होईना. अशावेळी ॲग्रोवनमुळे बांधलेले घर पुन्हा मदतीला धावले. ते तारण ठेवले. त्यातून एक लाख रुपये कर्ज मिळाले. त्यातून अंजीर बाग चांगली जोपासली. त्यापुढील वर्षी ही बाग, गांडूळखत आदींच्या माध्यमातून आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. ॲग्रोवनसह कृषी विद्यापीठाचीही मोठी मदत झाल्याचे सीताराम सांगतात.     

व्यवसायाचा विस्तार 
   उंबराच्या दाट सावलीच्या झाडाखाली खतनिर्मिती. त्यासाठी पालापाचोळा, जनावरांचे शेण यांचा वापर.
   निर्मिती प्रक्रियेत सुधारणा करताना १०० बाय ५० फूट जागेचा वापर. त्यात सिमेंट पोल रोवले आहेत. लोखंडी पट्ट्याच्या सांगड्यावर नेट लावून खतनिर्मितीसाठी निवारा. त्याभोवती लोखंडी जाळी. 
   दोन म्हशी, एक गाय. त्यांचे शेण अपुरे पडत असल्याने प्रति ट्रॅाली अडीच हजार रुपयांप्रमाणे परभणी शहरातून दरवर्षी सुमारे ७०  ट्रॅाली शेणखताची खरेदी.  
   पूर्वी वर्षाला १२ चे २० बॅग्ज एवढेच गांडूळखत तयार व्हायचे. आता एकहजार बॅग्ज म्हणजे सुमारे ५० टन खताची (एक बॅग म्हणजे ५० किलो) निर्मिती व विक्री होते.
   प्रति क्विंटल ८०० रुपये दर. 
   परभणी जिल्ह्यासह शेजारील बीड, यवतमाळ, अमरावती, नागपूर आदी भागांतून गांडूळखतास मागणी.  
   सुमारे २०० ग्राहक शेतकऱ्यांचे नेटवर्क.  

गांडूळ कल्चरची विक्री 
   आत्माअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सेंद्रिय शेतकरी गट व अन्य शेतकऱ्यांना गांडूळ कल्चरची प्रति किलो ४०० रुपये दराने दरवर्षी १५० ते २०० किलो विक्री 
   परभणीसह लातूर, चंद्रपूर आदी जिल्ह्यांतून मागणी
   नव्याने खतनिर्मिती करू इच्छिणाऱ्यांना शेतकऱ्यांना सीताराम मार्गदर्शन करतात 

अंजिराची यशस्वी शेती
लोहगाव शिवारातील शेतकऱ्याकडे वाट्याने कामास असताना अंजीर शेतीची माहिती मिळाली. या भागात अंजीर लागवड फारशी नसल्याने प्रयोग करण्याचे ठरविले. सन २०१४ मध्ये दिनकर वाणाची एक एकरात लागवड केली. सुमारे २५६ झाडे आहेत. दरवर्षी तीन टनांपर्यंत उत्पादन मिळते. हंगाम फेब्रुवारी- मार्च ते जून -जुलै या कालावधीत चालतो. परभणी शहरात १०० रुपये प्रति किलो दराने स्वतः घरपोच विक्री करतात. शहरातील रसवंतीगृहाना ठोक स्वरूपात ५० ते ६० रुपये प्रति किलो दराने विक्री होते. रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद केला आहे. शेतात तयार केलेल्या निविष्ठा तसेच गांडूळखतांवर पोसलेल्या दर्जेदार गोड अंजिरांना ग्राहकांची पसंती असते. 

रोपवाटिका : सन २०१७ मध्ये रोपवाटिका सुरू केली आहे. छाटणीपूर्वी काही झाडांवर गुटीकलम बांधले जाते. पहिल्या वर्षी दोन हजार रोपे तयार केली. प्रति रोप ५० रुपये याप्रमाणे विक्री स्थानिक शेतकरी, पुणे, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना केली. गेल्यावर्षी चार हजार कलमे तयार करून विक्री साधली. नारायणगाव केव्हीके यांनाही रोपे पुरवली आहेत. उल्लेखनीय शेतीसाठी अंजीर परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या परभणी शाखेतर्फे गौरव करण्यात आला आहे.
   सीताराम देशमुख, ९९२२१७९३४०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com