वातावरणातील बदलाचे रोगकिडीवर होणारे परिणाम

डॉ. प्रल्हाद जायभाये
सोमवार, 25 मे 2020

रोगकीडींचा उद्रेक होण्यामागे अन्य काही गोष्टी असल्या तरी बदललेले वातावरण हे मुख्य कारण आहे.
    विशेषतः खरीप हंगामात उशिरा येणारा पाऊस, हंगामपूर्व आणि हंगाम मध्यावर येणारा शुष्कता काळ यामुळे तापमानात वाढ होते. सापेक्ष आर्द्रता अधिक असते. त्यात बागायती क्षेत्रामध्ये तर सिंचनामुळे आर्द्रता अधिकच वाढते. परिणामी कीड रोगांचा उद्रेक होण्याची स्थिती उद्भवते.
    उष्णता किंवा थंडीची लाट येणे किंवा गारपीट यामुळे वातावरणात अचानक होणारे बदल. तापमानातील वाढीसोबच आर्द्रतेमध्ये होणारी वाढ म्हणजे रोगकीडीच्या वाढीसाठी सुयोग्य वातावरण.
    औद्योगिकरणामुळे वाढलेले कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण, त्याच्या जोडीला तापमान व आर्द्रता ही घटक पातळी वर्षभर राहत असून, ती रोग किडीच्या वाढीला हातभार लावते. 
    २००७ मधील अतिवृष्टी, २००९ चा दुष्काळ, २०१४ व २०१५ या दोन वर्षातील शुष्कता काळ यावरून मॉन्सूनची अनियमितता दर्शवते. नेहमीच मान्सून उशिरा येणे, लवकर अथवा उशिरा होणारी त्याची माघार, उष्णतेच्या किंवा थंडीचा वाढत्या लाटा, त्याला अवकाळी पावसासह गारपिटीची जोड अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यातून भविष्यात रोग किडीच्या उद्रेकाला आपल्याला सातत्याने तोंड द्यावे लागणार आहे, हे स्पष्ट दिसत आहे.

वातावरणातील घटकांचे ज्या प्रमाणे मानवावर परिणाम होतात, त्या प्रमाणेच ते किटक व रोगकारक सूक्ष्मजीवांवरही होत असतात. पिकांच्या उत्पादनामध्ये रोग किडींमुळे होणारे नुकसान स्पष्ट दिसून येते.

कोणत्याही सजीवाला किंवा वनस्पतीला होणारा रोग हा जिवाणू किंवा विषाणूंच्या माध्यमातून होत असतो. या सूक्ष्मजीवांच्या प्रादुर्भाव आणि वाढीचा वेग हा अनेक वेळा वातावरणातील अनेक घटकांवर अवलंबून असतो. वातावरणाचे ऋतुचक्र बदलल्यास त्याचा परिणाम या घटकांवर होत असतो. आंतरराष्ट्रीय वातावरण बदल समिती (आयपीसीसी), भारतीय राष्ट्रीय वातावरण बदल समिती (आयएनसीसी) , भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्था (आयआयटीएम) यांच्या मार्फत वातावरणातील ऋतुचक्रासोबत त्याच्या होणाऱ्या विविध घटकांवरील परिणामांचा अभ्यास केला जातो. पिकावरील अभ्यासासाठी कृषी विद्यापीठामध्ये कृषी हवामानशास्त्र विभाग आहेत. या विभागामध्ये स्थानिक हवामान बदल आणि पिकांवरील रोग किडी यांतील परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो. 

महाराष्ट्रातील वातावरणामध्ये घडलेले बदल 
 गेल्या शंभर वर्षामध्ये राज्यातील वातावरणामध्ये फारसा बदल झालेला नाही. अलीकडच्या तीस वर्षामध्ये हवामानातील बदलांचे 
आपल्या राहणीमानावर, शेतीवर, शेतीपूरक व्यवसायावर होताना दिसत आहेत. त्यातील रोग किडींवरील परिणामांचा विचार या लेखामध्ये आपण करणार आहोत. 
    हवेतील धुलीकण, वायू प्रदूषणाचे प्रमाण वेगाने वाढलेल आहे. पावसाळ्यात झड लागण्याचे (हलक्या पावसाचे) प्रमाण कमी झाले आहे, असे म्हणता येईल.
    हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढले असून, रात्रीच्या वार्षिक सरासरी तापमानात वाढ झाली आहे. उन्हाळ्यातील सरासरी तापमानात वाढ झाल्याचे आढळले आहे. उष्णतेच्या लाटा येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याच्या विपरीत स्थितीत म्हणजे थंडीच्या लाटांचेही प्रमाण वाढले आहे. 
    गेल्या काही वर्षामध्ये गारपिटीच्या संख्येत वाढ झाली आहे. वादळी वारे व अवकाळी पावसाच्या घटनाही वाढल्या आहेत.
    मान्सून उशीरा येण्यासोबतच कधी लवकर तर कधी उशिरा परतणे घडत आहे. या बरोबरच हंगामपूर्व, मध्य आणि उत्तरार्धामध्ये शुष्कता काळामध्ये वाढ होत आहे.
    जून, जुलैमध्ये  पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात अगदी थोडी घट झाली असून, सप्टेंबर व पूर्वमौसमी हंगामामध्ये पावसाच्या प्रमाणामध्ये किचिंत वाढ दिसून आली आहे. 

सूक्ष्म वातावरणाचा परिणाम 
पृथ्वीतलावर वाढणाऱ्या सजीवांसह वनस्पतींमध्ये रोगास कारणीभूत सूक्ष्मजीव (जिवाणू किंवा विषाणू) आणि कीटक उपलब्ध असतात. कोणत्याही रोग किडीस सूक्ष्म वातावरणीय पातळीची आवश्यकता असते. या सूक्ष्म वातावरणाची पातळी परिसरातील हवामानावर अवलंबून असते. रोगकिडीचे 
जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वातावरणातील घटकांसोबत कमाल आणि किमान मरणोक्त वातावरण घटक निश्चित असतात. हे सूक्ष्मजीव 
कार्यरत राहण्यासाठी कमाल व किमान कार्यरत वातावरणीय घटक, सुयोग्य वातावरण या तीन पातळीवरील हवामान घटकांचा समावेश 
होतो. 
    सुयोग्य वातावरण घटक पातळी 
    यामध्ये सरासरीहून किमान व कमाल वातावरण घटकांच्या उपलब्धीमध्ये रोग किडींची वाढ, विकास आणि प्रसार झपाट्याने होतो. कधी कधी हे रोग अथवा कीड नियंत्रणाबाहेर जाऊन त्याचा उद्रेक होतो. यातून कधी स्थानिक पातळीवरील उद्रेक (इनडेमिक), तर कधी साथ किंवा महामारी (पॅनडेमिक) मध्ये त्याचे रूपांतर होते. 
    कमाल व किमान कार्यरत पातळी 
    या वातावरणीय पातळीमध्ये रोगकिडीची वाढ व विकास दर कमी होत जातो. नंतर तो पूर्णतः कमाल व किमान हवामान घटकांच्या अंतिम पातळीवर येऊन थांबतो. शून्यावर येतो. यानंतर त्याची वाढ पूर्णपणे थांबते. 
    अधिकतम व न्यूनतम मरणोक्त पातळी  
    कमाल व किमान हवामान घटकांच्या अंतिम मर्यादेत वाढ झाल्यास, पातळी ओलांडल्यास रोग कीड समूळ नष्ट होत नाही. त्याची वाढही होत नाही. ते सुप्तावस्थेत जातात. आणखी कमाल किंवा किमान हवामान घटकात वाढ झाली तर समुळ नष्ट होतात किंवा कमाल, किमान पातळीच्या आत वातावरणीय घटक आल्यास पुन्हा यांची वाढ आणि विकास होण्यास प्रारंभ होतो. 

रोगकिडींचा वातावरणाशी परस्पर संबंध
रोग किंवा किडीच्या प्रादुर्भाव व प्रमाण वाढण्याची खालील अजैविक कारणे आहेत.
    तापमान व कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण अधिक असल्यास
    तापमान अधिक असल्यास.
    हवेतील आर्द्रतेचे प्रमाण (सापेक्ष आर्द्रता) आणि तापमान अधिक असल्यास.
तापमान अधिक असल्यास रोगनाशक किंवा कीटकनाशकांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी शेतकऱ्यांकडून ती शिफारशीपेक्षा अधिक वापरली जातात. त्यातून आणखी प्रतिकारशक्ती तयार होऊन त्यांच्या कार्यक्षमतेत आणखी घट होते. 
    वनस्पती, प्राणी किंवा माणसांमध्ये रोगांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. उदा. माणसांमध्ये येणारे चिकनगुणिया, कांजिण्यांसारखे रोग. पाळीव प्राण्यांमध्ये लाळ्या खुरकूत, गोचीड ताप या सारखे आजार. 
    पिकांवर रोग आणि किडींचा दोन्ही प्रादुर्भाव वाढताना दिसून येतो. उदा. कापूस, सोयाबीन, ऊस या पिकांमध्ये २००७ मध्ये आलेली पिठ्या ढेकणाची (मिलीबग) लाट. २००९ मध्ये वेगाने वाढत गेलेला लष्करी अळीचा प्रादुर्भाव. २०१६ पासून कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा वेगाने वाढत चाललेला प्रादुर्भाव. त्याच प्रमाणे डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त करणारा तेलकट डाग रोग असे त्याचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. 
- डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९ (सहाय्यक प्राध्यापक, कृषी हवामानशास्त्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Effects of climate change on pests