
सध्या बागेत खुंटावर नवीन जातींचे कलम करण्याचा कालावधी आहे. या काळात कलम करण्यापूर्वी खुंट काडी, सायन काडी योग्य निवडणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे आपल्या उद्देशाप्रमाणे योग्य द्राक्षजातीची निवड करावी. यातील प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा असून, त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बागेमध्ये कलमाच्या यशस्वितेसाठी खुंट रोप, सायन काडी नेमकी कशी असावी, याची माहिती घेऊयात.
खुंट रोपांची परिस्थिती
खुंट काडी सरळ, सशक्त व रोगमुक्त असावी.
खुंट काडी अर्ध परीपक्व असावी.
खुंट काडी रसरशीत असावी.
जमिनीपासून एक ते सव्वा फूट अंतरावर खुंट काडीची जाडी ८ ते १० मि.मी. असावी.
द्राक्ष जातींची ओळख
आपल्या उद्देशाप्रमाणे द्राक्ष जातींची निवड करावी.
हिरव्या गोल व लंबगोलाकार द्राक्षजाती ः थॉमसन सीडलेस, तास ए गणेश, क्लोन टू ए, सुधाकर सीडलेस, मांजरी किशमीश (बेदाण्यासाठी), मांजरी नवीन इ.
लांब मण्याच्या हिरव्या द्राक्षजाती ः सोनाका, सुपर सोनाका, माणिक चमन, दणाका इ.
रंगीत, गोल व अॅबलॉंग द्राक्षजाती ः शरद सीडलेस, फॅण्टसी सीडलेस, नानासाहेब पर्पल, क्रिमसन सीडलेस, रेडग्लोब (बिया असलेली), मांजरी मेडिका, मांजरी श्यामा इ.
लांब मण्याच्या रंगीत जाती ः कृष्णा सीडलेस, सरिता सीडलेस, ज्योती सीडलेस इ.
क्रिमसन सीडलेस
ही जात बिनबियांची, रंगीत (लाल) आहे.
संजीवकांच्या वापराची गरज नाही.
साधारण व्यवस्थापनातही मण्याचा १८ ते १९ मि.मी. आकार मिळतो. मण्याचा एकसारखा रंग छाटणीच्या व्यवस्थापनातून मिळवता येतो.
वाढीचा वेग जास्त असल्यामुळे पाणी कमी लागेल.
निर्यातीसाठीही उपयुक्त ठरू शकेल.
परिपक्वता १३० ते १३५ दिवसाचा कालावधी.
फॅण्टसी सीडलेस
काळी, बिनबियाची द्राक्षजात
संजीवकांच्या वापराशिवाय सुटसुटीत मणी असलेला घड मिळू शकतो.
१३० ते १३५ दिवसांचा कालावधी
१८ ते २० अंश ब्रिक्स गोडी सहज मिळते.
तापमान वाढत असलेल्या परिस्थितीमध्ये घडाचा एकसारखा काळा रंग दिसून येतो.
वेलीच्या वाढीचा जोम जास्त असल्याने कमी पाणी व्यवस्थापनामध्ये उत्पादन घेणे शक्य.
कलम यशस्वी होण्याकरिता व्यवस्थापन
निवडलेली सायन काडी ही कार्बेन्डाझीम (३ ते ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी) द्रावणामध्ये दोन ते तीन तास बुडवून ठेवावी.
वेलीच्या ओलांड्यावर निघालेल्या काडीवर पाचव्या ते सहाव्या डोळ्यापासून सबकेनच्या चार ते पाच डोळ्यांपर्यंत सायन काडी निवडावी.
सरळ काडी असल्यास पाच ते अकराव्या डोळ्यांपर्यंत काडी निवडावी. या भागातून निवडलेल्या काडीमध्ये अन्नद्रव्य पुरेसे असते. कलम फुटण्याकरिता डोळ्याची परिस्थिती चांगली असते. कलम करतेवेळी बागेत ८० टक्क्यापेक्षा अधिक आर्द्रता, ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमान असावे.
कलम यशस्वी होण्यामध्ये कलम करणाऱ्यांची कुशलता महत्त्वाची असते.
ज्या बागेत खुंट रोपाच्या काडीमध्ये रस निर्मिती कमी झाली आहे, किंवा मुळीच रस नाही, अशा स्थितीत बागेत तात्पुरते कलम करण्याचे टाळावे. कलम करण्याच्या दोन ते तीन दिवसापूर्वी बागेत पाणी द्यावे. त्यामुळे काडीमध्ये रस निर्मिती होईल. आर्द्रताही वाढण्यास मदत होईल.
बऱ्याचवेळा सायन काडी बाहेरून तपकिरी रंगाची दिसत असली तरी त्यातील पीथ पांढऱ्या रंगाचा असतो. अशा काडी कलम करण्यासाठी वापरल्यास कलम पाच ते सहा दिवसात फुटेल. मात्र, त्यानंतर निघालेली फूट सुकायला सुरुवात होते. कच्च्या सायनकाडीमुळे ही स्थिती निर्माण होते. हे टाळण्याकरिता सायन काडी निवडत असलेल्या बागेत पालाशची पूर्तता फवारणी (४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर), तसेच जमिनीच्या माध्यमातून (सव्वा ते दीड किलो प्रति एकर या प्रमाणे) दोन ते तीन वेळा करावी. जवळपास सहा ते बारा दिवस काडी काढण्याचे टाळावे.
सूर्यप्रकाश प्रत्येक काडीवर पडेल, याची खबरदारी घ्यावी.
पाचर कलम केल्यावर ६ बीए च्या १५ ते २० पीपीएम द्रावणात दोन मिनिटे काडी बुडवून ठेवावी.
सायन काडी (द्राक्षजातींची काडी)
सायन काडी ही पूर्णतः परिपक्व असावी.
निवडलेली काडी गोल व ठिसूळ असावी.
काडीमध्ये अन्नद्रव्याचा साठा पुरेसा असावा.
सायन काडी ही अधिक उत्पादन देणाऱ्या व रोगमुक्त वेलीपासून घेतलेली असावी.
सायन काडीचा काप घेतल्यानंतर त्यामधील पीथ पूर्णपणे तपकिरी रंगाचा असावा.
मांजरी श्यामा
ही द्राक्ष जात (पूर्वीची) ए-१८/३ आहे.
ब्लॅक चंपा आणि थॉमसन सीडलेस पासून केलेले संकरण.
एकसारख्या काळ्या रंगाचे द्राक्षघड
लवकर परिपक्वता (फळछाटणीपासून १२५ ते १३० दिवस)
एकसारख्या आकाराचे मणी. सूक्ष्मघड निर्मिती भरपूर.
थंडीमुळे येणारी मण्यांच्या क्रॅकींगची समस्या जाणवत नाही.
साधारण परिस्थितीत फवारणी केल्यानंतरसुद्धा अन्य द्राक्षजातींच्या तुलनेत रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्याचे दिसून येते.
या जातीमध्ये अॅण्टी ऑक्सिडेण्टसुद्धा भरपूर
आहे.
मांजरी किशमिश
हिरव्या रंगाची जात, किशमीश रोझावीस या जातीपासून क्लोनल सिलेक्शनच्या माध्यमातून निवड पद्धतीने तयार केली आहे.
बेदाणा निर्मितीकरिता शिफारशीत जात.
या जातीपासून बेदाणा उतारा २६ ते २७ टक्के मिळतो. बेदाणा सुमारे ३ ते ३.५ टन प्रति एकर मिळतो.
सूक्ष्मघडनिर्मिती भरपूर असून, १३५ ते १४० दिवसात फळकाढणीस तयार होते.
मांजरी मेडिका
पुसा नवरंग व फ्लेम सीडलेस या जातीपासून संकरणाने तयार केलेली ही जात आहे.
रसनिर्मितीसाठी महत्त्वाची म्हणून ओळखली जाते. रस निर्मिती सुमारे ६५ ते ७० टक्क्यापर्यंत असते.
थंड वातावरणात फळकाढणी होत असल्यास एक सारखा रंग मिळतो.
घडनिर्मिती भरपूर असून, रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात असतो.१३० ते १३५ दिवसाच्या कालावधीत फळ काढणीस तयार होते. या द्राक्षजातीचे वैशिष्ट्य म्हणजे मण्याची साल व गर हे दोन्ही रंगीत आहे.
अॅन्थोसायनिन पिगमेंट आणि अॅण्टी ऑक्सिडेंट
गुणधर्म जास्त असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर
ठरते. मण्यात बी असल्यामुळे संजीवकांच्या वापराची गरज नाही.
- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ ( राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.