प्रयोगशील भाजीपाला शेतीतून अर्थकारण उंचावलेले गिरणारे

प्रयोगशील भाजीपाला शेतीतून अर्थकारण उंचावलेले गिरणारे

नाशिक जिल्हा जसा प्रगतशील द्राक्ष, डाळिंबासाठी अोळखला जातो तसाच तो भाजीपाला पिकासाठीही विशेषत्वाने प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारपेठेत सर्वाधिक भाजीपाला हा याच जिल्ह्यातून जातो. त्यामुळे नाशिकला मुंबईची परसबाग म्हणून ओळखले जाते. भाजीपाला उत्पादनात आघाडीवर असलेल्या गावांमध्ये नाशिक तालुक्‍यातील गिरणारे गाव ठळकपणे पुढे येते. या गावातून नाशिक शहराबरोबरच मुंबईसह देशाच्या विविध बाजारपेठेत वर्षभर भाजीपाला पाठविला जातो.  

भाजीपाला अनुषंगाने गिरणारे गावाची वैशिष्ट्ये 
हवामान भाजीपाला पिकांना अधिक अनुकूल
वर्षभर भाजीपाला पिकांचे उत्पादन 
खरीप टोमॅटोचे आगर
जिल्ह्यातील सर्वात मोठा मजूर अड्डा 
लोखंडी अवजारांची जुनी बाजारपेठ
जिल्ह्यातील सर्वात मोठे सौदा मार्केट
सुमारे ५२ आदिवासी खेड्यांची प्रमुख बाजारपेठ
गिरी म्हणजे डोंगराच्या पायथ्याला वसलेले म्हणून "गिरणारे'' हे नाव

 गावाच्या शेतीची ओळख  
 प्रमुख पिके : सर्व प्रकारचा भाजीपाला, द्राक्ष, पेरू
 क्षेत्र (हेक्टरमध्ये)
 टोमॅटो : ४००  
 अन्य भाजीपाला - २५०  
 द्राक्ष- १००  
 अन्य हंगामी पिके : १००  
प्रमुख पिके : टोमॅटो, वांगी, कारली, भोपळी, गिलके, दोडके, तोंडले, काकडी, हिरवी मिरची, सिमला मिरची, कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक, मुळा. 
इथल्या शेतीचं वेगळेपण

रसायनांचा कमी वापर
सुपीक मातीमुळे गुणवत्ता व मालाची टिकवण क्षमता अधिक 
मल्चिंग, ठिबक तंत्रज्ञानाचा वापर
हिरवळीच्या खतांचा वापर
निर्यातक्षम उत्पादनात सातत्य
शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड 
गटशेतीतून तंत्रज्ञानाचा प्रसार

सिंचनाला धरणांचा आधार  
गिरणारे गावाच्या पूर्वेस गंगापूर, पश्‍चिमेस काश्‍यपी, दक्षिणेस आळंदी, दक्षिण पश्‍चिमेस नाईकवाडी तसेच साप्ते ही धरणे आहेत. याच पाच धरणांतून त्या-त्या भागातील शेतकऱ्यांनी पाइपलाइन केली आहे. लाडची धरणातून मिळणाऱ्या पाण्यासाठी पाणी वापर संस्थाही स्थापन केली आहे. शेतकऱ्यांनी छोटे मोठे बंधारे बांधून पाणी अडविले आहे. त्यामुळे सिंचनासाठी बारमाही पाणी उपलब्ध होते. साहजिकच भाजीपाला पिकांचे बारमाही उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहिला    आहे.

फळबागांना भाजीपाल्याचा आधार 
गिरणारे परिसरात भाजीपाला आणि द्राक्ष हे समीकरण अधिक आहे. द्राक्ष हे बहुवर्षायू व खर्चिक पीक बनले आहे. मागील काही वर्षात अनेकवेळा नैसर्गिक आपत्तीमुळे येथील द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात सापडला. मात्र कमी मुदतीच्या भाजीपाला पिकांची जोड दिल्याने भाजीपाला पिकांनी अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना सावरले. त्यातही गावालगतच टोमॅटो मार्केट असल्याने वाहतूक खर्चातही बचत  झाली.  

मुंबईच्या बाजारपेठेत वर्चस्व 
गिरणारेतून वर्षभर दररोज सरासरी सहा ट्रक भाजीपाला राज्याची राजधानी मुंबईला पाठविला जातो. वाशी, कल्याण, दादर या बाजारांसह तो पुढे अन्य उपनगरांत पाठविला जातो. मुंबईतील व्यापाऱ्यांचे येथील शेतकऱ्यांशी जुने संबंध बनले आहेत. मागणी वाढतच असल्याने मागील १० वर्षांत मुंबईला  जाणाऱ्या भाजीपाल्यात दुपटीने वाढ झाल्याचे सिध्दीविनायक ट्रान्स्पोर्टचे गणेश धोंडगे यांनी सांगितले. मालविक्रीनंतर तिसऱ्या दिवशी स्थानिक अडतदारामार्फत शेतकऱ्यांना हिशेबपट्टी व पेमेंट मिळते. यामुळे गावात अडतीचा रोजगार वाढला आहे. रिटेल क्षेत्रातील नामवंत खासगी कंपनीने गिरणारे परिसरात शेतमाल खरेदी केंद्र सुरु केले आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांचा ताजा माल कंपनीच्या देशभरातील विक्री केंद्रात पाठविला जातो.

टोमॅटो शेतीचे व्यवस्थापन  
गावशिवारात अनेक पिढ्यांपासून नागपंचमीच्या सणाच्या कालावधीत टोमॅटोची लागवड केली जाते.
दसऱ्याच्या आसपास उत्पादन सुरू होते. ही प्रथा इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अंगवळणी पडून गेली आहे.  जुलैच्या पहिल्या आठवड्यात रोपवाटिका तयार केली जाते. अलीकडे परिसरातील खासगी रोपवाटिकेत ‘ऑर्डर’ देऊन रोपे घेण्याकडे कल वाढला आहे. खास टोमॅटोसाठी म्हणून परिसरात काही  शेतकऱ्यांनी रोपवाटिका व्यवसाय सुरू केला आहे.  खरिपातील काळ सर्वात कसोटीचा असतो. या काळात पाऊस कोसळत असतो. याचा अंदाज अाधीच घेऊन जमिनीला उतार ठेवणे, चर काढून पाणी जाईल अशी व्यवस्था करणे हे नियोजन अाधीच केले जाते. पाऊस काळात पाण्याचा निचरा केला जातो. किडी-रोगांपासून पीक वाचविण्यासाठी एकात्मीक कीड नियंत्रण केले जाते.  टोमॅटोच्या पूर्ण हंगाम काळात गिरणारेच्या टोमॅटो उत्पादकांना अजिबात उसंत नसते.
अर्थात बाजारभाव ही आवाक्‍यातली बाब नसते. चांगला दर मिळाला तर दसरा, दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो. दर असमाधानकारक असेल तर दिवाळीचा अवघा उत्साहच काळवंडून जातो. 

महिला बचत गटांचे सबलीकरण, बालकांची कुपोषणमुक्ती, वीज, दिवे या बाबींवर आम्ही अनेक कामे पूर्ण केली. अजूनही अनेक महत्त्वाची कामे बाकी आहेत. आळंदीत झालेल्या "ॲग्रोवन सरपंच महापरिषदेत मी सहभागी झाले होते. तेथील मार्गदर्शनाचा गाव कारभारात मोठा उपयोग होत आहे. 
- अलकाताई दिवे, ९९२१३२४०४५, सरपंच, गिरणारे

गावाचा सर्वांगीण विकास हेच आमच्यापुढील ध्येय आहे. यातही शेती आणि शेतकरी हा आमच्या प्राधान्याचा विषय आहे. येत्या काळात या संदर्भात विविध उपक्रम राबविण्याचे ग्रामपंचायतीने ठरविले आहे.
- तानाजी गायकर, ९४२३९६४८७७, उपसरपंच, गिरणारे

टोमॅटो हीच अर्थवाहिनी
टोमॅटोचे पीक इथल्या शेतकऱ्यांच्या जीवनाशी एकरुप झालेले आहे. गावातील बहुतांश घटकांची ही  अर्थवाहिनी आहे. शेतकरी, व्यापारी, मजूर, वाहतूक व्यावसायिक, चहा विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, कपडा दुकानदार, कृषी निविष्ठा विक्रेते, सोसायटी, बॅंक शाळा या प्रत्येक घटकाचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष संबंध टोमॅटो शेतीतील अर्थकारणाशी जोडलेला आहे. टोमॅटो बांधणीच्या काळात मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज असते. या काळात मजुरीचे दरही वाढतात.

असे राहते टोमॅटो पिकाचे अर्थकारण
टोमॅटोचा उत्पादन खर्च एकरी दीड लाख रुपयांपर्यंत येतो. 
एकरी उत्पादन -१५०० ते ३००० तर सरासरी २००० क्रेट ((प्रति क्रेट २० किलो)

मार्केट 
 पंचवीस वर्षांपासून अडत नाही
  रोख ‘पेमेंट’ देणारे खरेदीदार
 दररोजची २० हजार क्रेट आवक 
 पिंपळगावनंतर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची उलाढाल
 देशभरातील खरेदीदार उपलब्ध 
 बांगलादेशासह अन्य देशांत निर्यात
 स्थानिकांना मिळतो रोजगार 
 ग्रामपंचायत पुरवते सुविधा 

कृषी विज्ञान केंद्राचे साह्य 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र गिरणारे गावापासून अवघ्या सहा किलोमीटरवर आहे. केंद्राचे प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील यांच्यासह विशेषज्ज्ञांचे मार्गदर्शन विविध प्रात्यक्षिके व चर्चासत्रांमधून शेतकऱ्यांना सातत्याने मिळते.  

कृषी विभागाचे उपक्रम 
कृषी विभागाकडूनही विविध उपक्रम राबविले जातात. मंडळ अधिकारी एस. एच. धायडे, कृषी पर्यवेक्षक दिलीप सुरवाडे सातत्याने शेतकऱ्यांच्या संपर्कात असतात. शिवारातील मातीची सुपीकता टिकविण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. यात माती परीक्षण, आरोग्य पत्रिका, अन्नद्रव्य व्यवस्थापन यांवर विशेष भर दिला जातो.

गटशेतीचे उमजले महत्त्व
शिवारात अन्नदाता व माउली कृपा हे शेतकरी गट कार्यरत आहेत. ‘अन्नदाता’चे अध्यक्ष योगेश घुले म्हणाले की शेतीतील आव्हानांचा जवळून सामना करीत असताना एकत्र येण्याचे महत्व समजले.  गटामार्फत सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरु केले आहेत. परस्परांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी गटाची मदत होत आहे.

अध्यात्माचे अधिष्ठान 
गिरणारे गावालगत असलेली ग्रामदैवत खंडोबाची टेकडी हे श्रद्धेचे केंद्रस्थान आहे. पर्यटनस्थळ असेही त्यास म्हणता येईल. महंत फक्कडदास यांनी स्थापन केलेला बालाजी मठ हे येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. गुरुवर्य ह.भ.प. माधव महाराज घुले यांच्या अध्यात्मिक मार्गदर्शनाचा येथील आबालवृद्धांवर मोठा प्रभाव आहे. 

युवकांचा ग्रामविकास मंच 
सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून येथील युवकांना "गिरणारे ग्रामविकास मंच'' स्थापन केला आहे. त्या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छता, पंचायतराज प्रशिक्षण, बचत गटांचे बळकटीकरण, परिसंवाद, उद्योजकता विकास या विषयांवर कार्यक्रम घेतले जातात. लोकसहभागातून स्वच्छता व वृक्षारोपण उपक्रमही राबविले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com