निर्यातक्षम मिरची उत्पादनात हातखंडा

मिरचीच्या शेतात अशोक व प्रवीण हे पाटील पितापुत्र.
मिरचीच्या शेतात अशोक व प्रवीण हे पाटील पितापुत्र.

सुजालपूर (ता. जि. नंदुरबार) - येथील अशोक व प्रवीण या पाटील पितापुत्रांनी मिरची पिकाचे उत्कृष्ट व्यवस्थापन करून प्रतिकूल स्थितीत दर्जेदार व एकरी ३० टनांपर्यंत उत्पादन घेण्यामध्ये हातखंडा तयार केला आहे. अलीकडील दोन वर्षांत ३५ ते ५० टनांपर्यंत मिरचीची आखातात निर्यात करण्यात ते यशस्वी झाले आहेत.  

ओल्या लाल मिरचीचे उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून देशभरात नंदुरबारने ओळख तयार केली आहे. सुजालपूर (ता.नंदुरबार) शिवारही पपईपाठोपाठ मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. नंदुरबारपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर तापी नदीकाठी हा परिसर आहे. येथील अशोक बुद्धर पाटील व पुत्र प्रवीण यांची १० एकर शेती आहे. नदीकाठी शिवार असले, तरी भूगर्भात जलसाठे पुरेसे नाहीत. पाणी गुणवत्तापूर्ण नाही. एक कूपनलिका आहे. परंतु तापी नदीवरून जलवाहिनी करून घेतली आहे. प्रकाशा (ता.शहादा) येथील तापी नदीवरील बॅरेजचा लाभ गावातील शिवारास होऊ लागला आहे.

पाटील यांची शेती 
पाटील यांची जमीन हलकी व मध्यम प्रकारची आहे. अशोक हे पूर्णवेळ शेतीत असून, प्रवीण नंदूरबार येथे राष्ट्रीयीकृत बँकेत कार्यरत आहेत. नोकरी सांभाळून व सुट्ट्यांमध्ये तेही शेतीचे व्यवस्थापन सांभाळतात. मिरची हे पाटील यांचे मुख्य पीक आहे. अशोक यांना अनेक वर्षांपासून या पिकाचा अनुभव असला तरी अलीकडील काळात तंत्रज्ञान, व्यवस्थापन व वाण सुधार करून ते या पिकाची निर्यातक्षम शेती करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  

मिरचीचे सुधारित व्यवस्थापन असे

  • नाजूक व खर्चिक पीक म्हणून मिरचीची ओळख आहे. हिरव्या मिरचीचा बाजार अनेकदा अस्थिर असतो. अशा स्थितीत पाटील लालपेक्षा हिरव्या मिरचीच्या उत्पादनावर अधिक भर देतात. 
  • १० एकर शेतीपैकी ५ एकरांत मिरची.
  • गुजरात राज्यातील पिंपळोद (ता.निझर, जि.तापी) येथील प्रसिद्ध मिरची उत्पादक योगेशभाई पटेल यांचे मार्गदर्शन  
  • जूनच्या सुमारास लागवड. पाच बाय सव्वा फूट अंतर. एकरी सुमारे सहाहजार झाडे बसतात.
  • पावसाळ्यात शेतात पाणी वा ओल साठू नये यासाठी चारी काढून पाण्याचा व्यवस्थित निचरा केला आहे. त्यामुळे मातीतील रोगांना प्रतिबंध केला आहे. 
  • योगेशभाई यांच्यासोबत नंदुरबार, नाशिक भागातील दर्जेदार मिरची उत्पादकांच्या शेतांना भेटी दिल्या.  रोगराईचा काळ कुठला, अतिपावसात किती हानी होते, प्रतवारीचे महत्त्व आदी बाबी जाणून घेतल्या. फवारणी, खत व्यवस्थापनाचे वेळापत्रक, जमिनीतील अन्नघटकांची कमतरता यावर काम केले. 
  • दरवर्षी एकरी तीन ते चार ट्रॉली शेणखत. उत्तम कंपोस्ट. त्यानंतर गादीवाफे तयार केले जाते. 
  • त्याचवेळी एनपीके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, निंबोळी पेंड एकरी ५० किलो यांचा वापर
  • त्यानंतर ठिबक व पॉली मल्चिंग 
  • एकाच क्षेत्रात वारंवार मिरची पीक टाळतात. पीक फेरपालटीवर भर. मिरचीनंतर पपई किंवा कपाशी.
  • विषाणूजन्य रोगांची समस्या लक्षात घेऊन प्रादुर्भावित अवशेष जाळले जातात. 
  • लागवडीपूर्वी एप्रिलमध्येच शेत खोल नांगरले जाते. तापू दिले जाते. 
  • पिकाला मजबूत आधार म्हणून प्रत्येकी दहा फुटांवर बांबू. एकरी संख्या सुमारे ७००.
  • आंतरमशागत करीत नाहीत. कारण त्यामुळे मुळांना धक्का बसतो. 
  • शंभर मजूर कायमस्वरूपी. 
  • पॉली मल्चिंगमुळे तणनियंत्रण फक्त दोनवेळा करावे लागते. अधिकचा पाऊस असला तरच तणनाशकाचा वापर होतो. निर्यातीसाठी रासायनिक अवशेषांची समस्या लक्षात घेऊन हिरव्या, निळ्या त्रिकोण रंगांच्या कीडनाशकांवर भर राहतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विक्री व निर्यात 
मागील वर्षी सुमारे ३५ टन मिरची योगेशभाई पटेल यांच्या सहकार्यातून आखातात पाठवली. यंदा ५० टनांपर्यंत निर्यात झाली आहे. काही कालावधीसाठी किलोला ८० ते ८५ रुपये दर मिळाला. मात्र सरासरी दर २० रुपयांपासून ते ४० रुपयांपर्यंत मिळतो. निर्यातक्षम दर्जा असल्याने जागेवरून गुजरातमधील निझर (जि.तापी) येथील खरेदीदार उचल करतात. मिरचीची आवक अधिक झाली तर बाजारात दबाव असतो. बाजार अनेकदा अस्थिर असतो. परंतु गेले दोन वर्षे दर टिकून राहिल्याचा लाभ झाला आहे.

लागवडीपासून खर्चाचे गणित बसवावे लागते. त्यासाठी गुंतवणूक करण्याचे धाडस पाटील यांनी केले. मिरचीचे चांगले उत्पादन देणाऱ्या वाणाची रोपे नाशिक जिल्ह्यातून ते दीड रुपये प्रतिरोप दराने खरेदी करतात. पाच एकरांत ३० हजार रोपांची गरज भासते. काढणी लागवडीनंतर सुमारे ५० दिवसांत सुरू होते. काढणीसाठी प्रति किलो किमान चार रुपये खर्च येतो. 

वाणाचा वापर   
अलीकडील काळात लांबट, हिरव्या वाणाची लागवड करू लागले आहेत. पाटील म्हणाले, की हिरवी मिरची विकायची तर या वाणाची निवड योग्य ठरते. थोडी तिखट, लांबट आहे. लांब वाहतुकीस चालते. आखातात व हॉटेल व्यवसायातून मागणी असते. या वाणाला नोव्हेंबरपर्यंत आखातात मागणी असते. त्यानंतर स्थानिक बाजारपेठेत विकली जाते. 

निर्यातक्षम उत्पादन, उत्पन्न   
पाटील सांगतात, की जूनमध्ये लागवड केलेल्या मिरचीचा प्लॉट एप्रिलपर्यंत चालतो. एकरी सुमारे ३० टनांपर्यंत उत्पादन मिळते. एकरी खर्च सुमारे दोन लाख रुपये येतो. यंदा एकूण चार लाख रुपये उत्पन्न साध्य झाले. गेल्या वर्षी दर कमी असल्याने उत्पन्न यापेक्षा कमी होते. जेवढे एकूण उत्पन्न हाती आले त्यातील खर्च वजा करून ५० ते ६० टक्के निव्वळ नफा मिळाला.

- प्रवीण पाटील : ९०११४७१८१८

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com