शेततळ्याच्या जोरावर फुलली संत्रा बाग

Farm-Lake
Farm-Lake

संत्रा शेतीत अग्रेसर म्हणून वाशिम जिल्ह्यातील मुंगळा गाव प्रसिद्ध 
आहे. मात्र, दुष्काळ व पाणीसमस्या दर वर्षी भीषण होत चालली आहे. अशा परिस्थितीत गावातील गजानन केळे या प्रयोगशील शेतकऱ्याने शेततळ्याच्या माध्यमातून सिंचनाचा मोठा आधार शोधला आहे. जोडीला पाण्याचे काटेकोर नियोजन करीत आपली २५ एकर संत्रा बाग फुलवली आहे व दुष्काळातही आर्थिक आधार कमावला आहे.

वाशीम जिल्ह्यातील मुंगळा हे (ता. मालेगाव) संत्रा उत्पादनात वर्षानुवर्षे अग्रेसर असलेले गाव आहे.  गावात सुमारे ३०० हेक्टरवर संत्रा बागा उभ्या आहेत. सिंचनाची सोय असलेला प्रत्येक शेतकरी संत्रा लागवडीसाठी पुढाकार घेत असतो. या पिकातून गावात दर वर्षी कोट्यवधी रुपये येतात. गावाची आर्थिक सुबत्ता वाढण्यास या पिकाची मदत झाली आहे. परंतु, अलीकडे घटत चाललेल्या पर्जन्यमानाचा फटका बागांना बसतो आहे. पाण्याअभावी व वाढत्या उन्हामुळे मागील काळात अनेकांच्या बागांमधील झाडे वाळली होती. काहींना बागा तोडण्याचा कटू निर्णयही घ्यावा लागला. 

केळे यांचे शेती नियोजन 
गावातील गजानन केळे यांची २५ एकर संत्रा बाग आहे. सुमारे ३२०० झाडांचे व्यवस्थापन ते सांभाळतात. गेल्या दहा वर्षांत त्यांनी बागेचे क्षेत्र टप्प्याटप्प्याने वाढवत २५ एकरांपर्यंत नेले. सुरुवातीला कुटुंबाची केवळ २० एकर शेती होती. मात्र, बागेतून आलेल्या उत्पन्नाच्या जोरावर हे क्षेत्र ४२ एकरांपर्यंत पोचविण्यात ते यशस्वी झाले. अन्य पिकांमध्ये सोयाबीन व तुरीचे पीक ते घेतात. सोयाबीनचे एकरी आठ ते नऊ क्विंटल, तर तुरीचे चार ते पाच क्विंटलपर्यंत उत्पादन त्यांना मिळते. खरिपातील या पिकांची काढणी झाल्यानंतर दुसरे कोणते पीक या शेतात शक्यतो पाहण्यास मिळत नाही. संपूर्ण लक्ष संत्रा बागेवरच केंद्रित केले जाते.     

दुष्काळाची झळ; पण जिद्द कायम 
मुंगळा परिसरात दोन वर्षांपूर्वी तर बागेला देण्यासाठी पाणी शिल्लक नव्हते. अशा परिस्थितीत गजानन व अन्य काही शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातून टँकर आणले. दिवसरात्र मेहनत करीत २५ ते ३० किलोमीटरवरून पाणी आणून बाग वाचविली. यासाठी कित्येक हजारो रुपये खर्च केले. काही शेतकऱ्यांना त्या वेळी पाण्याची व्यवस्था न करता आल्याने बाग तोडावीही लागली. पण, गजानन यांनी जिद्दीने दुष्काळाला तोंड देत पाण्याचा शाश्वत स्त्रोत निर्माण करण्याचे ठरविले. 

डोळे उघडले; अन् शेततळे केले
वाशीम जिल्ह्यात अनेक वेळा पाणी प्रकल्प न भरल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत पाण्याचा शाश्वत स्त्रोत म्हणून शेततळ्याचा पर्याय समोर आला. गजानन यांनी क्षणाचाही विलंब न करता कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले. सध्या उभारलेले शेततळे ४४ बाय ४४ मीटर व १९ फूट खोल आकाराचे असून, त्याची एक कोटी २० हजार लिटर पाणी साठवणक्षमता आहे. कृषी खात्यानेही वेळेत अनुदान दिल्याने मोठा दिलासा मिळाला. 

पाण्याचा शाश्वत स्त्रोत निर्माण केला
गजानन यांनी ठिकठिकाणाहून म्हणजे मेडशी येथील ऊर्ध्व मोर्णा प्रकल्पापासून सहा किलोमीटर, कळंबेश्वर येथून चार किलोमीटर, तर मुंगळा धरणावरून दोन किलोमीटरवरून पाइपलाइन केली. या पाण्याची शेततळ्यात साठवणूक केली जाते. प्रामुख्याने पावसाळ्यात शेततळे भरले जाते. जोडीला सहा विहिरी आहेत. बागेला वेळेत पाणी मिळाले पाहिजे, यासाठी शेततळ्यावर सौरपंप बसविला. आता वीज नसली, तरी सिंचनासाठी समस्या येत नसल्याचे गजानन सांगतात. तळ्यातील पाणी ठिबकच्या साह्याने संत्रा बागेला दिले जाते. या भागात जमिनीत ३० ते ४० फुटांनंतर काळा दगड लागतो. त्याखाली पाण्याची शाश्वती कमी होते. अशा स्थितीत शेततळ्याचा पर्याय सक्षम असल्याचे गजानन सांगतात. 
 
अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा
गजानन यांच्यापासून प्रेरणा घेत गावातील तीन-चार शेतकऱ्यांनी शेततळी उभारली. काही शेतकरी त्या तयारीस लागले. गजानन गावच्या राजकारणात, सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. गावात संत्रा उत्पादकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी ते गटाने एकत्र येतात. मार्गदर्शनपर मेळावे घेण्यातही त्यांचा पुढाकार असतो.   

पाण्याचे काटेकोर नियोजन
संत्रा बाग फळांच्या अवस्थेत असताना प्रतिझाड १०० लिटर पाणी दिले जाते. पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यासाठी, तसेच ओलावा टिकवून राहावा, यासाठी पीक अवशेषांचे (सोयाबीनचे कुटार) आच्छादन ठिबकच्या ड्रीपर्सच्या अवतीभोवती करण्यात येते. प्रतिड्रीपरमधून तासाला १५ लिटर पाणी झाडाला मिळते. एका ठिकाणी चार ड्रीपर्स राहतात.  -हिवाळा सुरू झाला की आठवड्यातून एकदा पाणी दिले जाते. उन्हाळ्यात गरजेनुसार दररोज किंवा एक दिवसाआड पाणी देता येते. दिवाळीपर्यंत सहा विहिरींच्या भरवशावर बागेला पाणी पुरविण्यात येते. त्यानंतर शेततळ्याचा वापर सुरू होतो.

संत्रा उत्पादन व अर्थकारण 
एकूण बागेतून वर्षाला २० ते २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. प्रतिझाड सरासरी १० क्रेट फळे (प्रतिक्रेट २० ते २२ किलो) मिळतात. बागेची विक्री २० ते २५ रुपये प्रतिकिलो दराने व्यापाऱ्यांना केली जाते. यामुळे बाजारपेठेत विक्रीस नेण्याची आवश्यकता राहत नाही. वाहतुकीचा खर्चही वाचतो.

- गजानन प्रकाश केळे, ९६२३०२५८८०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com