गावच्या मातीची ओढ अन् त्याला व्यवसायाची जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer Agri tourism business

गावच्या मातीची ओढ अन् त्याला व्यवसायाची जोड

पुणे : ओढ लावती अशी जिवाला...गावाकडची माती... एका गीतातील या ओळी शहरातील नागरिकांची गावाकडे असणारी ओढ दर्शवितात. त्यातूनच गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण महाराष्ट्रात कृषी पर्यटनाची संकल्पना रुजली आहे. आज अनेक शेतकरी कुटुंबे या व्यवसायात आली आहेत. त्यात उच्च शिक्षित तरुणांचाही मोठा सहभाग आहे.

सर्जा-राजाच्या घुंगराच्या नादात बैलगाडीतून फेरी मारायची, गाई-वासरांशी खेळायचं, नदीत, विहिरीत किंवा शेततळ्यात मनसोक्त डुंबायचं. एखाद्या झाडाखाली बसकण मांडून मस्त हुरडा पार्टी रंगवायची. शेतातल्या ज्वारी-बाजरीच्या कणसाशी खेळायचं, या संकल्पना शहरी भागातील नागरिकांना कृषी पर्यटन केंद्रांकडे आकर्षित करत आहेत. त्यालाच सेंद्रिय शेतीची जोड दिली जात आहे. अशा शेतमालाची खरेदीही ग्राहक या केंद्रांतून करत आहेत. त्यामुळे शेती परवडत नाही, याला उत्तर मिळत आहे. त्यातूनच कृषी पर्यटन वाढत आहे. एकेकाळी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जात होते. आता कृषी पर्यटनातून या संधी मोठ्या असल्याचे दिसत आहे.

कृषी पर्यटन व्यवसायाची मोठी संधी

कृषी पर्यटन व्यवसायाची फार मोठी संधी राज्यात आहे. त्यामुळे राज्यात कृषी पर्यटन धोरणास मान्यता दिली आहे. या व्यवसायातून राज्यातील पर्यटनास चालना मिळू शकते. तसेच, तोट्यात असलेल्या शेती व्यवसायाला उभारीची मोठी संधी आहे. या ठिकाणांमधून कृषी उत्पन्नांना थेट ग्राहक उपलब्ध होत आहे. ग्रामीण संस्कृतीचे जतन या माध्यमातून होत आहे. शहरी नागरिकांची ग्रामीण भागाशी नाळ जोडण्याचा हा मुख्य दुवा होत आहे. ग्रामीण भागातील महिलांना आणि तरुणांना या व्यवसायातून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

राज्यातील कृषी पर्यटन केंद्र

  • ७३९ नोंदणीसाठी आलेले अर्ज

  • ३५० शासनाकडे नोंद झालेली केंद्रे

  • ४५० सध्या सुरू असलेली केंद्रे

कृषी पर्यटनातून फक्त व्यवसाय, असा हेतू नाही. तर ग्रामीण कृषी संस्कृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरी नागरिकांचा मातीशी नाते जोडण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना गावाकडच्या संस्कृतीची ओळख त्यातून होत आहे. आपल्याकडील संस्कृतीवर आधारित केंद्र सुरू करावे.

- पांडुरंग तावरे, सदस्य, महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन विकास समिती

शेतकऱ्यांच्या अपेक्षा

सामान्य शेतकऱ्याला पर्यटन केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्याची प्रक्रिया सोपी करावी. शासनाने कृषी पर्यटन केंद्राचे ब्रँडिंग करावे. सुविधांसाठी कृषी विभागाच्या योजनांना प्राधान्य हवे. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये याबाबतचा अभ्यासक्रम असावा. कृषी विद्यापीठांनी पर्यटनाचा डिप्लोमा सुरू करावा.

ग्राहकांची गरज ओळखा

आपला ग्राहक कोण आहे, याचा विचार करावा. त्याची आवड काय आहे, हे जाणून घ्यावे. शहरातील नागरिक या केंद्रामधून मामाचा गाव शोधत असतो. ग्रामीण संस्कृती व तेथील भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी ग्राहक येत असतो, त्याचे भान पाळावे. ग्राहकांना शेतीत काम करण्याचा अनुभव देण्याची संधी द्यावी. ग्राहकांचा निसर्गाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न असतो, तशी व्यवस्था करावी. सेंद्रिय उत्पादनाचा प्रयत्न करावा.

कृषी पर्यटन व्यवसायातून तरुणांना मोठी संधी आहे. त्यामध्ये गुणवत्ता आणि सेवाभाव असल्यास ग्राहक निश्चित अशा केंद्रांकडे आकर्षित होतो. त्यामुळे शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची मोठी संधी आहे. कृषी पर्यटनाच्या शासकीय धोरणात सुधारणा करावी. त्यातून व्यवसायिकांस सवलती व सुविधा द्याव्यात.

- रामचंद्र भूमकर, पर्यटन व्यावसायिक, मुळशी