करवंदाच्या नऊशे झाडांची शेती

करवंदाच्या नऊशे झाडांची शेती

मंगळूरपीर (जि. वाशिम) येथील उन्मेश उद्धवराव लांडे हे वयाची ६२ वर्षे पूर्ण झालेले शेतकरी आहेत. मात्र, त्यांची जिद्द, उत्साह एखाद्या तरुणाप्रमाणे आहे. आपल्या सुमारे ३४ एकर शेतीचे व्यवस्थापन ते करतात. परिसरात प्रयोगशील शेतकरी अशी अोळख त्यांनी मिळवली आहे. संत्रा, डाळिंब, सीताफळ, या फळपिकांसह कापूस व अन्य पारंपरिक पिकेही ते घेतात. 

करवंदाची बाग 
साधारणतः २० वर्षांपूर्वी लांडे यांनी अमरावती येथे राहणाऱ्या भावाच्या घरासमोर करवंदाचे झाड व त्याला लागलेली फळे पाहिले. ती घरी आणून त्याच्या बियांपासून रोपे तयार केली. करवंदाला बाजारात चांगली मागणी आहे, दरही चांगले आहे, असे अभ्यासाअंती त्यांना समजले. त्यातून आपण करवंदाची शेती केली तर? असा विचारही केला. त्यानुसार दीड एकरात लागवड केली. साधारणतः तीन वर्षांची झुडपे झाल्यानंतर फळे यायला सुरुवात झाली. सुरुवातीला ती कमी यायची. आता मात्र पाहता पाहता ही झाडे वीस वर्षांची झाली आहेत. 

बाग देते भरपूर   उत्पादन 
प्रतिझाडावर ३५ ते ४० किलोंपर्यंत टवटवीत गुलाबी करवंदे मिळतात. 
करवंदे हे मुळातच काटेरी, झुडूपवर्गीय डोंगरदऱ्यात येणारे जंगली फळझाड. मात्र, त्याची शेती करण्याचे धाडस लांडे यांनी केले. अकोला, बुलडाणा व वाशीम या तीनही जिल्ह्यांत अशा स्‍वरूपाची ही एकमेव बाग असावी, असा त्यांचा अंदाज आहे. 
या झाडाला काटे असल्याने कुठलेही जनावर खात नाही. झाडाचा उपयोग नैसर्गिक कुंपण म्हणूनही काही जण करतात. पिकाचे रानडुकरांसारख्या जंगली प्राण्यापासूनही संरक्षण होऊ शकते इतके ते काटक असते.  

अत्यल्प पाण्यात येणारी बाग  
मंगळूरपीर भागात पाण्याची पातळी खालावत चालली अाहे. दिवसेंदिवस पाण्याचे स्त्रोत कमी झाल्याने अडचणी उभ्या झाल्या. पाणी व वाढलेल्या खर्चामुळे सात एकर संत्रा व १० एकरांतील डाळिंब बाग काढून टाकणे पर्याप्त झाले. तेथे या वर्षी कपाशी लावली. 
 संत्रा, डाळिंब या पिकांच्या तुलनेत करवंदाला अत्यंत कमी पाणी लागते. जूनच्या सुमारास फूलधारणा सुरू होते. या काळात फूलगळ होऊ नये, यासाठी झाडांना पाणी द्यावे लागते.
 शेणखत, तसेच संयुक्त खताची एक मात्रा दिली जाते. आॅगस्टपासून झाडावर फळे दिसायला लागतात. मग महिनाभर काढणी सुरू होते.

अत्यंत कमी उत्पादन खर्च  
लांडे म्हणतात, की अन्य कोणतेही फळझाड लावले, तर व्यवस्थापनावर मोठा खर्च होतो. करवंद बागेला खर्च नगण्य लागतो. हे पीक शेतकऱ्यांना फक्त पैसे देते. मी संत्रा, डाळिंब, सीताफळ बाग घेऊन पाहिली. त्या तुलनेत करवंदासाठी दीड एकरासाठी पाच हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च लागत नाही, असे आढळले.  

चार एकरावर लावणार करवंद 
करवंदाची बाग अत्यंत कमी खर्चात दर वर्षी निश्चित उत्पन्न मिळवून देत अाहे. यामुळे अाता काळाची गरज अोळखून करवंदाची अाणखी चार एकरांत बाग लावणार अाहे. यासाठी लवकरच स्वतः रोपनिर्मिती सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.   

उत्पादन व दर   
एकरी १० टनांच्या आसपास उत्पादन मिळते. 
दर वर्षी किलोला २२, २८, ३० ते ३२ या श्रेणीमध्ये दर मिळतो.

जागेवरच विक्री  
यंदा साधारणतः ३० रुपयांपेक्षा अधिक दर मिळेल, अशी अपेक्षा लांडे यांनी व्यक्त केली. सध्या झाडावर गुलाबी फळे लगडली असून, तोडणीचा हंगाम सुरू होत अाहे. करवंदाला मागणी वाढत अाहे. लांडे अनेक वर्षांपासून मध्यस्थांच्या माध्यमातून बंगळूर येथील खरेदीदाराला करवंदे देत अाहेत. थेट शेतातून हा माल खरेदी केला जातो. स्थानिक पातळीवरदेखील मागणी अाहे. नागपूर, जळगाव अादी ठिकाणी खरेदीदार असून, ‘ॲडव्हान्स’ रक्कम देऊन करवंदांचे बुकिंग होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

पानमसाले व्यापारी या करवंदाचे मुख्य खरेदीदार आहेत. मागणी जास्त व पुरवठा कमी, अशी आपली अवस्था आहे. एकरी सुमारे तीन लाख रुपये तरी ही बाग देऊन जाते, असे ते म्हणाले.   

सीताफळाची  जात शोधली   
चिकित्सकपणा जपलेल्या लांडे यांनी सीताफळ पिकातही काम केले अाहे. त्याची रोपे तयार करून १० एकरांत लागवड केली अाहे. निवड पद्धतीने आपण सीताफळाचे वाण तयार केले असून, त्यास  ‘श्रीवर्धन’ असे नाव दिल्याचा दावा त्यांनी केला. लवकरच या फळाचे क्षेत्र २० एकरांपर्यंत विस्तारत असल्याचेही ते म्हणाले. 

करवंदाचे फायदेशीर पीक  
इतर कुठल्याही फळपिकापेक्षा कमी मेहनत व कमी खर्चात करवंद चांगला पैसा देणारे पीक असल्याचा अनुभव लांडे सांगतात. अद्याप शेतकऱ्यांचा या फळाकडे व्यावसायिकदृष्ट्या फारसे लक्ष गेलेले नाही, अशी खंत ते व्यक्त करतात. जे शेतकरी लागवडीकडे वळण्यास उत्सुक आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण तयार आहोत, असे त्यांनी सांगितले. 
 उन्मेश लांडे, ९५११२७८२२५

लांडे यांच्या करवंद शेतीवर दृिष्टक्षेप 
गुलाबी फळे असणारी सुमारे ९०० झाडे 
जवळपास सर्व उत्पादनक्षम
जून महिन्यात झाडांना लागतात फुले
पहिल्या पावसानंतर होते फळधारणा 
वर्षातून एकदा बहार येतो. 
कीड-रोग यांचा प्रादुर्भाव फारसा नाही
करवंदाला मागणी कायम 
मुरांबा, जॅम-जेली, लोणच्यासाठी वापर
व्यापारी थेट शेतावर येऊन करतात खरेदी 
तोडणीसाठीच लागतो मुख्य मजुरी खर्च

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com